केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणेंनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर माथा टेकवून केली. त्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडुन व दुधाचा अभिषेक करून स्म्रुतीस्थळाच्या जागेचे शुद्धीकरण केले. स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवसेनेवर टिका करताना देवेंद्र फडणवीस एक गोष्ट विसरले की जनआशीर्वाद यात्रा हा सरकारी कार्यक्रम नसुन भारतीय जनता पक्षाचा पक्षीय कार्यक्रम आहे. बाळासाहेब ठाकरे हे जरी हिंदुह्रुदयसम्राट असले तरी ते शिवसेनाप्रमुख आहेत, ही गोष्ट राजकारणात विसरून चालणार नाही. एरव्ही निव्वळ श्रद्धेपोटी कोणत्याही पक्षाच्या नेत्याने शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंच्या स्म्रुतीस्थळावर आदराने माथा टेकवणे किंवा नतमस्तक होणे यात काहीही वावगे नाही. त्यावर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला किंवा अगदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र जनआशीर्वाद यात्रा या भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय कार्यक्रमाची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्म्रूतीस्थळावर माथा टेकवून होणार असेल तर भाजपच्या या क्रुतीचा एकच अर्थ निघतो की ज्या नेत्याच्या स्म्रुतीस्थळावर डोके टेकवून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करता येईल असा एकही नेता दुर्दैवाने भाजपमध्ये किंवा संघाच्या विचारधारेत आजतागायत निर्माण झालेला नाही. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कुबड्या घेऊनच भारतीय जनता पक्ष मोठा झाला आणि आजही जगातील नंबर वनचा पक्ष म्हणुन बढाया मारणाऱ्या भाजपला जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांच्याच समाधीवर माथा टेकवावा लागतोय. शिवसेनाप्रमुखांच्या कुबड्या घेतल्याशिवाय आजही महाराष्ट्रातील भाजप राजकारण करू शकत नाही. मला वाटत हा भारतीय जनता पक्षाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा सर्वात मोठा पराभव आहे. केशव हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख किंवा माधवराव गोळवलकर गुरुजी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेतेमंडळी संघाच्या स्वयंसेवकांना किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रातःस्मरणीय असली तरी त्यांना सर्वसामान्य जनतेतून कधीही जनाधार मिळाला नाही किंवा ते लोकप्रिय ठरून देशाच्या तळागाळात सर्वदूर पोहचू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत अटल बिहारी वाजपेयी हा एकमेव असा नेता निर्माण झाला, जो जनतेमध्ये लोकप्रिय ठरला व तळागाळापर्यंत पोहोचला. मात्र वाजपेयींची सर्वसमावेशक उदारमतवादी प्रतिमा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा अगदी भाजपच्या देखील गळ्यातील काटा बनते. त्यामुळे वाजपेयींच्या स्म्रुतीस्थळावर माथा टेकवून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करावी, असे भाजपच्याच कार्यकर्त्यांना वाटत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. जेव्हा प्रश्न कट्टर हिंदुत्वाचा येतो तेव्हा नजरेसमोर एकच नाव येते- हिंदुह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...! त्यांच्या स्म्रुतीस्थळावर माथा टेकवल्याशिवाय हिंदुत्वाची चौकट पूर्णच होऊ शकत नाही, याची जाणीव असल्यामुळेच भाजपला जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात बाळासाहेबांच्या स्म्रुतीस्थळावर माथा टेकवून करावी लागली.
भारतीय जनता पक्षाकडे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा नसणे, हे त्यांचे अगदी सुरुवातीपासूनचे अवघड जागेचे दुखणे आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काडीचेही योगदान नाही. त्यामुळे कॉंग्रेसकडे असलेला महात्मा गांधींसारख्या व्यापक व सर्वसमावेशक प्रतिमेचा नेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उभ्या हयातीत कधी उभा करता आला नाही. हीच सल त्यांच्या स्वयंसेवकांच्या मनात नेहमीच बोचत असल्यामुळे गांधींनी मुसलमानांचे लांगुलचालन केले, पाकिस्तानला ५५ कोटी दिले अशा कंड्या पिकवण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच धन्यता मानली. त्याच गोबेल्सनीतीचा भाग म्हणजे कॉंग्रेसचे दोन नेते असलेल्या महात्मा गांधी व सरदार पटेल यांच्यातील काल्पनिक शीतयुद्ध रंगवुन सरदार पटेलांच्या प्रतिमेचा उपयोग जहाल हिंदुत्ववादी नेता म्हणुन करण्यात आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसचे नेते असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारण्यासाठी देशभरातून लोखंड गोळा करण्याचा संकल्प केला. 'स्टेच्यु ऑफ युनिटी'चा पुतळा उभारता यावा एवढ्या भव्यदिव्य प्रतिमेचा नेताच भाजपपाशी उपलब्ध नसल्याने शेवटी कॉंग्रेसचे नेते असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांनाच आपले नेते भासवून त्यांचा पुतळा उभारण्याची केविलवाणी वेळ भारतीय जनता पक्षावर आली. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणुन मिरवत असलेल्या भारतीय जनता पक्षाची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही किती दरिद्री आहे हे दाखवुन देण्यासाठी स्टेच्यु ऑफ युनिटी'चा पुतळा आणि शिवसेनाप्रमुखांच्या स्म्रुतीस्थळावर माथा टेकवून केलेल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात ही दोन उदाहरणे देता येतील.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोणत्याही एका पक्षाचे नेते नव्हेत. ते पक्षभेदांच्या पलीकडे गेलेले उत्तुंग व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या स्म्रुतीस्थळाचे दर्शन घेण्यास नारायण राणेंना विरोध करणे हे मनाच्या कोतेपणाचे लक्षण आहे, असेही बोधाम्रूत भाजपच्या काही नेत्यांनी पाजळले. मुळात बाळासाहेब ठाकरे हे पक्षाच्या पलीकडे गेलेले राष्ट्रपुरुष आहेत, हे सांगण्यासाठी भाजपच्या नेत्यांची काहीच गरज नाही. त्यांचे देहावसान झाले तेव्हा मुंबईत जमलेली गर्दीच त्यांच्या कार्यकर्तुत्वाची साक्ष देत होती. उद्या अहिंसेचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांचे कुणी स्मारक उभारणार असेल तर त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. मात्र ज्याची उभी हयात खुन व बलात्कार करण्यात गेली तो दाऊद इब्राहिम जर गौतम बुद्धांचे स्मारक उभारणार असेल तर त्यावर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित केले जाणार. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्म्रुतीस्थळावर माथा टेकवतोय कोण...? तर ज्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना सर्वात जास्त त्रास व मानसिक यातना दिल्यात.... ज्याने खाल्ल्या ताटात घाण केली... ज्याने मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळूनही पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली... ज्याची दोन्ही पोरं दिवसरात्र ठाकरे कुटुंबियांवर गरळ ओकत असतात...! अशा कलुषित मनाचा नेता आदरणीय बाळासाहेबांच्या स्म्रुतीस्थळावर माथा टेकवण्याची राजकीय नौटंकी करत असेल तर कडवट शिवसैनिकांनी विरोध नाही करायचा तर काय या पितापुत्रांची शिवतीर्थावर जाऊन आरती ओवाळायची का...? शिवसेना पक्षामधुन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि देशाचे रेल्वेमंत्रीपद भुषविणाऱ्या सुरेश प्रभुंनीही मुंबईत आल्यानंतर सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब यांच्या स्म्रुतीस्थळाला अभिवादन करून त्यांनी ठाकरे कुटुंबियांप्रती असलेली क्रुतज्ञता दर्शवलीच होती. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जावुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली. त्यावेळी कोणत्याही शिवसैनिकांनी किंवा शिवसेना नेत्यांनी सुरेश प्रभुंना बाळासाहेबांच्या स्म्रुतीस्थळावर जाण्यापासून रोखले नव्हते कारण सुरेश प्रभुंना शिवसेनाप्रमुखांविषयी व ठाकरे कुटुंबियांविषयी वाटत असलेला आदर हा मनापासून होता, याची शिवसेनेच्या नेत्यांना व महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना खात्री होती. तत्कालीन शिवसेना व भाजप पक्षातील कुरघोड्यामुळे त्यांना पक्ष बदलुन भाजपमधुन केंद्रीय मंत्रीपद भुषवावे लागले. त्यानंतर सहा वर्षे लोटली पण सुरेश प्रभुंनी कधीही ठाकरे कुटुंबियांविरोधात किंवा शिवसेनेविरोधात चकार अपशब्द काढला नाही किंवा गरळ ओकली नाही. त्यामुळे वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या स्म्रुतीस्थळावर कोणत्याही विरोधी पक्षाचा नेता आदराने माथा टेकवणार असेल तर शिवसैनिक आजही त्याचा सन्मानच करतात. मात्र शिवसेनाप्रमुख व ठाकरे कुटुंबाविषयी ज्यांच्या मनात काडीचाही आदर नाही अशा नापक नेत्यांनी आदरणीय बाळासाहेबांच्या स्म्रुतीस्थळावर माथा टेकवताच त्या पवित्र स्थळाचे गोमूत्र शिंपडुन व दुधाचा अभिषेक करून शुद्धीकरण करत त्या जागेचे पावित्र्य जपतात.
दोन आठवड्याभरापुर्वीच प्रसाद लाड यांनी भाजप आमदार व नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली होती. शिवसेना भवन हे फक्त शिवसेना पक्षाचे कार्यालय नाही. शिवसेना नावाच्या चळवळीचा तो इतिहास आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. हे शिवसेना भवन फोडण्याची भाषा ज्या नितेश राणेंच्या उपस्थितीत केली गेली. त्यांच्या मनात बाळासाहेबांविषयी आदर आहे असे मानायचे का...? मातोश्री ही अशी वास्तु आहे ज्यामध्ये आदरणीय हिंदुह्रुदयसम्राटांनी वास्तव्य केले. नारायण राणेंचे थोरले चिरंजीव निलेश राणे यांनी मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर काय चालते...? असा सवाल उपस्थित केला होता. त्यासाठी सोनु निगमचा दाखला सुद्धा दिला होता. इतकेच कशाला तर आनंद दिघेंची हत्या आदरणीय बाळासाहेबांनीच केली असा सनसनाटी आरोप सुद्धा केला होता. त्या आरोपनंतर बापाने जनतेची माफी मागून प्रकरणावर पांघरून टाकले असले तरी आजतागायत निलेश राणेंनी आपल्या या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितलेली नाही. ज्या आदित्य ठाकरेंना बाळासाहेबांनी लहानपणी अंगाखांद्यावर खेळवले त्यांचा डीएनए तपासायची भाषा करणारे नितेश राणेच होते. आणि काय तर म्हणे हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक...! ही असली वक्तव्ये करून राजकीय नौटंकी करताना जनाची नाहीच पण निदान मनाची तरी लाज वाटायला हवी...!! आडातच नाही तर पोहऱ्यात तरी कुठून येणार...? त्यामुळे जी गत दोघा पोरांची आहे, तीच बापाची...! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे दर्शन घेऊन झाल्यावर नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केले की, "एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहे तिथे कुणी जाऊ शकत नाही. पँट वर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिली. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करावा." त्यांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर वाटते नक्की हा माणुस चाळीस वर्षे शिवसेनेतच होता ना...? शिवसेनेत राहून ज्या माणसाला शिवतीर्थाची महती समजली नाही तो चाळीस वर्षे शिवसेनेत असुन नसल्यासारखाच होता. शिवतीर्थ ही तीच जागा आहे ज्याठिकाणी शिवसेनाप्रमुखांनी लाखोंच्या सभा गाजवल्या. बाळासाहेबांच्या गर्जंनांनी हा परिसर दुमदुमून गेला. त्या शिवतीर्थाच्या पवित्र जागेला हा माणुस दलदल म्हणतोय...! अरे बाबा, इथल्या चराचरात बाळासाहेबांची वाणी घुमतेय आणि ज्याला तुम्ही दलदल समजताय ती माती सुद्धा बाळासाहेबांच्या चरणस्पर्शाने पावन झाली आहे. त्यात करून शिवतीर्थ दादरलाच आहे, वाळवंटात नाही...! याठिकाणी पावसाळ्यात पाऊस जास्त असल्याने चिखलच असणार. तुमची पँट त्या चिखलात खराब होत असेल तर कशाला गेला होता बाळासाहेबांच्या स्म्रुतीस्थळावर माथा टेकवायला...? कुणीही तूम्हाला शिवतीर्थावर भेटीला या असे निमंत्रण दिले नव्हते...! लॉन आणि फुलझाडे लावायला ते काय शहाजहानच्या मुमताजचे स्मारक वाटले की काय...? ज्या ठिकाणी या जगातल्या सर्वोत्कृष्ट वक्त्याने लाखोंच्या सभांमध्ये भाषणांची उधळण करून हिंदुत्वाचा विचार मनामनात रूजवला ती जागा ही जागतिक किर्तीचीच आहे. त्यासाठी लॉन व फुलझाडे लावुन काचेचे महाल उभारण्याची काहीही गरज नाही. त्या जागेत बाळासाहेब ठाकरे नावाचा हिंदुह्रुदयसम्राट लाखोंच्या भरगच्च सभा घेत होता, ही एकच गोष्ट शिवतीर्थाला जागतिक किर्तीची बनवते. नारायण राणे म्हणाले की, "साहेब मला आशीर्वाद देण्यासाठी आज तुम्ही हवे होता हे एकच वाक्य मी शिवसेनाप्रमुखांच्या स्म्रुतीस्थळाजवळ बोललो." खरं तर प्रश्न असाच उपस्थित होतो की शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी नारायण राणेंना खरोखरच आशीर्वाद दिला असता...? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यावर केलेली भाषणे, अग्रलेख व व्यंगचित्रे तपासावी लागतील. बाळासाहेब एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते की, "माझी मलाच लाज वाटली...! काय म्हणेल ओ तो फॉरेनर...? कोणत्या येड्झव्याला मुख्यमंत्री केलय...?" त्यानंतर त्यांनी मालवण पोटनिवडणुकीदरम्यान 'सामना'मध्ये व्यंगचित्र काढुन त्यात खलनायक चित्रपटातील संजय दत्तच्या वेशात नारायण राणे दाखवुन खाली लिहिले होते की- "नायक नही... खलनायक हूँ मै...!" 'सामना' वर्तमानपत्रातच बाळासाहेबांनी पहिल्या पेजवर "नववधू प्रिया ही बावरते" हा स्त्रीच्या वेषातील नारायण राणेंचा फोटो पहिल्या पानावर प्रसिद्ध केला आणि त्यानंतर संतापलेल्या राणेंनी सामनावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. एकदा प्रचारसभेत बाळासाहेबांनी "मै का करू राम मुझे बुढ्ढी मिल गयी" या गाण्यावर नाच करून प्रभा राव व मार्गारेट अल्वा यांच्या मागे फिरणाऱ्या राणेंची खिल्ली उडवली होती. त्यांच्या प्रत्येक भाषणात 'पादरा पावटा' हा ठेवणीतला शब्द नारायण राणेंसाठी राखुन ठेवलेला असायचा. एकदा जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष सोडुन गेलेल्या शिवसैनिकांसाठी "या चिमण्यांनो परत फिरा रे..." अशी हाक दिल्यानंतर कॉंग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवुन गंडवले गेलेले नारायण राणे शिवसेनेत पुन्हा परतण्यासाठी इच्छुक होते. तशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. त्यावेळी 'सामना'मध्ये अग्रलेख लिहुन बाळासाहेबांनी लगेचच ठणकावून सांगितले- "मी चिमण्यांना साद घातलीय... अपशकूनी घुबडांना नाही...!" शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची ही सर्व वक्तव्ये, व्यंगचित्रे आणि अग्रलेख आजही रेकॉर्डवर आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी आशीर्वाद मागणाऱ्या राणेंना आपल्या ठाकरी शैलीत शिव्याच हासडल्या असत्या, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. एकंदरीतच शिवतीर्थ व शिवसेनाप्रमुख या दोन्ही गोष्टी समजणे राणे पितापुत्रांच्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे. त्यासाठी धमन्यांतून वाहणारे रक्तसुद्धा भगवेच असावे लागते. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्म्रुतीस्थळावर माथा टेकवलात किंवा माथा आपटून जरी कपाळमोक्ष झालात तरी तुमच्या विचारांमध्ये तसूभरही फरक पडणार नाही.
शिवतीर्थाची महती समजण्यासाठी "प्रासाद इथे भव्य परि मज भारी, आईची झोपडी प्यारी" या सावरकरांच्या ओळींचा अर्थ समजावा लागतो. मात्र सावरकारांच्या विचारांशीही राणे परिवाराचा दुरान्वयेही संबंध नाही. तरीसुद्धा काल राणे पितापुत्रांनी सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनन्यसाधारण योगदान असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल दिनांक ४ डिसेंबर २०१५ रोजी ट्वीट करताना नितेश राणेंनी म्हटले होते की, “Savarkar apologized four time to the British empire. Such a man can never be a example for the youth but a disgrace to every generation…!” देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानातल्या काळ्या पाण्याच्या कोठडीत ब्रिटीशांच्या नरकयातना भोगलेल्या सावरकरांसारख्या महापुरुषासाठी ‘माफीवीर’ हा शब्द वापरताना आपण त्यांच्या दैदीप्यमान कारकीर्दीवर शिंतोडे उडवतोय, याचे किमान भान नितेश राणेंना राहिले नव्हते. साक्षात सूर्यावर थुंकी उडवण्यातलाच हा प्रकार होता. देशातील तरुणांनी सावरकरांसारख्या देशभक्ताचा आदर्श नाही घ्यायचा तर मग काय तुमच्यासारख्या ब्राह्मणद्वेषाने पछाडून महापुरुषांची बदनामी करणार्या लोकप्रतिनिधींचा आदर्श घ्यायचा...? आज तुम्ही कोणत्या अधिकाराने त्याच सावरकरांच्या स्मारकावर माथे टेकवत आहात...? नरेंद्र मोदींना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रातःस्मरणीय असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही आणि त्यांचा राज्यात इतरत्र कुठेही सत्कार करू देणार नाही” अशा जाहीर धमक्या देणारे आमदार नितेश राणे होते. त्यांचा जाहीर सभांमध्ये ‘बाब्या पुरंदरे’ अशा एकेरी शब्दात उल्लेख करण्यात आला. अगदी नारायण राणेंनी सुद्धा बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर “महाराष्ट्रात कुठेही बाबासाहेबांचा सत्कार आम्ही होऊ देणार नाही आणि करायचाच झाल्यास तुम्हाला तो पिंजर्यात करावा लागेल” अशी जाहीर धमकी दिली होती. नितेश राणेंनी राम गणेश गडकरींचा संभाजी उद्यानातील पुतळा पाडला होता. एवढेच कशाला तर आज केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राणे पितापुत्र उदोउदो करत आहेत, त्यांचे नग्न कार्टून या नितेश राणेंनीच काढले होते. जातीने ब्राम्हण असणारे देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण काय देणार...? अशी टिका करणारे सुद्धा नितेश राणेच होते. सगळ्यात कहर तर तेव्हा झाला जेव्हा भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर दिनांक २५ जानेवारी २०१७ रोजी ट्वीट करून टिका करताना नितेश राणेंनी म्हटले होते की, “हे भाजप आणि आरएसएसवाले स्वतः लग्न करत नाहीत आणि दुसर्याची बायको किती सुंदर आहे यावर लक्ष ठेवतात. दहा मुलांना जन्माला घाला असे सल्ले देतात." आज तेच राणे पितापुत्र भारतीय जनता पक्षासाठी जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत. विरोधाभासाचे यापेक्षा चांगले उदाहरण आणखीन कुठे पाहायला मिळेल...?
