भारताच्या सर्वांगीण विकासाचे महामेरू:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर. – ( जी.डी.कांबळे. आजरा हायस्कूल)
काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांची उंची काळालाही मोजता येत नाही. ज्यांच्या विचारांचा वेध आकाशी घेऊ शकत नाही. ज्यांचे देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा काळाच्या कसोटीवर सोन्यासारखे लख्ख उजळून निघालेले असते व त्यांचे कार्य उभ्या राष्ट्रासाठी दीपस्तंभा सारखे प्रेरणादायी ठरते. अशा महान योग्यतेचे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय.
आज ६ डिसेंबर हा दिवस भारतीय इतिहासातील एक महान नेते, थोर समाज सुधारक, जगातील एक महान विद्वान, सामाजिक क्रांतीचे प्रणेते, युगपुरुष, विश्वरत्न महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस समर्पित आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले. या दिवशी जगभरातील लाखो अनुयायी त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी,आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी येथे जमतात. हा दिवस सामाजिक न्याय, समता आणि या देशातील मानवी हक्कांसाठी केलेल्या लढ्याची व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देणारा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन हा केवळ त्यांच्या निधनाचा दिवस नसून त्यांनी दिलेल्या महान विचारांचा त्यांच्या कार्याचा उत्सव आहे. हा दिवस आपल्याला त्यांच्या आदर्शांप्रती आणि त्यांनी दाखवून दिलेल्या सामाजिक समतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारतीयांचे उद्धार करते, मानवतेचे मित्र, थोर समाज सुधारक, स्त्रियांचे, उपेक्षितांचे कैवारी, शोषितांचे कुशल संघटक, अन्यायविरुद्ध धैर्याने लढणारे अजिंक्य योद्धे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या जीवन मूल्यांचे प्रबळ समर्थक, आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते, भारताचा सर्वांगीण विकास साधू शकेल अशा भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, महान विचारवंत,संसदपटू, प्रभावी वक्ते,थोर लेखक ग्रंथ प्रेमी, निष्णांत कायदे पंडित, जनहितासाठी ज्ञानाचा उपयोग करणारे महान विद्वान, सर्वश्रेष्ठ बुद्धिवंत होते.
भारतीय संविधानातून सर्व नागरिकांचे जीवनमान उंचवणारे, सर्वांना समान हक्क अधिकार, कायद्याने बहाल करणारे, अनुसुचित जाती, जमाती, जनजाती, धार्मिक,अल्पसंख्याक, आर्थिक व सामाजिकदृष्टा मागासवर्गाच्या कल्याणासाठी उपाययोजना करणारे, शिक्षण, आरोग्य, सरंक्षण, व्यवसाय, कंपनी, विद्यापीठे, न्यायालय,संसद, संघटना यांना मार्गदर्शन करणारे, तरतुदीनुसार नियोजन, संघटन,निंयत्रण, संदेशवहन, प्रशासन निर्माण करणारे, भारताचा वैधानिक, औद्योगिक शैक्षणिक व आरोग्य विषयक, मूल्य विषयक सर्वांगीण विकास गतिमान करणारे, भारताला सर्वार्थाने स्वावलंबी बनविणारे, देशातील कुपोषण, दारिद्र्य शोषण, विषमता नाहीशी करणारे, रोजगार निर्मिती करून भारत देश संपूर्ण जगात एक विकसित देश बनविणाऱ्या महान संविधानाचे थोर शिल्पकार म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.*
*हिराकुड, दामोदर व सोन नदीवरील प्रकल्प या मुख्य भारतातील धरणांची पायाभरणी करणारे, इ.स १९४५ रोजी केंद्रीय जल आयोगाची स्थापना करणारे थोर जलतज्ञ. इ.स १९१८ रोजी 'स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज' हे शेती समस्या वरील मार्गदर्शक पुस्तके लिहिणारे आधुनिक शेतीपद्धतीचे पुरस्कर्ते, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेते, खोती प्रथे विरोधात १० जानेवारी १९३८ रोजी २० हजार शेतकऱ्यांचा विधीमंडळावर मोर्चा काढणारे, देशात कुळ कायदा अस्तित्वात आणणारे थोर शेतीतज्ञ म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.
*'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथातून भारताच्या आर्थिक व्यवस्थे संबंधित मुलगामी चिंतन करणारे व या ग्रंथाच्या तत्त्वज्ञानातून देशातील भारतीय रिझर्व बँकेची उभारणी करणारे, अर्थशात्रात परदेशात डाॅक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय व थोर अर्थतज्ञ. 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देशात शिक्षणाचा प्रसार करणारे, सर्वांना शिक्षणाचा मूलभूत हक्क कायद्याने बहाल करणारे थोर शिक्षणतज्ञ म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.
आपल्या लेखणीतून देशातील वंचित, शोषितांचा आवाज बुलंद करणारे, जनता, मूकनायक, समता, बहिष्कृत भारत, या वृत्तपत्राचें संपादक, थोर पत्रकार. एकूण ३२ ग्रंथ, १० शोधनिबंध, १० निवेदने एवढ्या मोठ्या ग्रंथ संग्रहाचे थोर लेखक, जगातील, मराठी, संस्कृत,पाली, इंग्रजी, फ्रेंच, हिंदी,जर्मनी, गुजराती, बंगाली, तमिळ, कन्नड, फारसी अशा अनेक भाषा जाणारे थोर बुद्धिवंत. जगातील एकूण सर्वाधिक ३२ पदव्या प्राप्त करणारे महान विद्वान, कोलंबिया विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचे नाव असलेले महान विद्यार्थी, युनेस्कोच्या मुख्यालयात २६ नोव्हेंबर या संविधान दिनी पुतळ्याचे अनावरण झालेले एकमेव भारतीय म्हणजे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.
*जगातील १५२ देशांमध्ये ज्यांची जयंती साजरी होते असे एकमेव महापुरुष, संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालय जयंती साजरी होणारे एकमेव युगपुरुष. जगातील एक महान तर्कशास्त्रज्ञ व कायदे पंडित. ज्यांच्या शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो असे आदर्श विद्यार्थी (७ नोव्हेंबर १९००), स्त्रियांच्या हक्क व स्वातंत्र्यासाठी संसदेत हिंदू कोड बिल मांडणारे, स्त्रियांना मतदान, शिक्षण समान वेतनाचा, आरक्षणाचा, भर पगारी प्रसुती रजा मिळवून देणारे स्त्रियांचे खरे उद्धारकर्ते. राजगृहात स्वतः हजारो पुस्तकांचे ग्रंथालय उभे करणारे जगातील एकमेव ग्रंथ प्रेमी म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.*
*देशातील कामगारांना बारा तासां ऐवजी आठ तास कामाचा कायदा करणारे, कामगारांना बोनस, ग्रॅज्युटी, पेन्शन कायद्याने बहाल करणारे कामगारांचे नेते. इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठाच्या अहवालानुसार जगातील पहिल्या प्रतिभावान व्यक्तीमध्ये अव्वल स्थान मिळवणारे थोर प्रज्ञावंत. भारतात सर्वाधिक पुतळे असणारे महापुरुष.

अमेरिकेतील मेरीलँड राज्यात ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ या नावाने ओळखला जाणारा पुतळा असणारे महान विद्वान. चवदार तळ्याच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी जगातील एकमेव सत्याग्रह करणारे थोर सत्याग्रही म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.
अशा अनेक कर्तुत्वाने सजलेले, नावाजलेले बाबासाहेबांचे जीवन, व्यक्तिमत्व, कर्तुत्व राष्ट्राच्या व अखिल जगाच्या आणि विश्वात्मक मानवतेच्या कल्याणकारी इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिले जावे अशा महान योग्यतेचे आहे. कारण आपल्या असामान्य व अलौकिक आणि आदरणीय गुणामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगातल्या कुठल्याही सुज्ञ व जिज्ञासू व्यक्तीच्या चिंतनाचा, मननाचा ,आदराचा, लेखनाचा विषय होत आहे, हे आवर्जून समजून घ्यावी ही वास्तविकता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार डॉ. ज्ञानराज गायकवाड लिहितात एक महत्त्वकांक्षी, लक्षवेधी, जिद्दी, निश्चयी, धोरणी ,धाडसी ,कष्टाळू, अभ्यास, विचारी,स्वाभिमानी, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, बहुज्ञानी, जनहितासाठी ज्ञानाचा उपयोग करणारे लोकहितदक्ष महानायक,थोर सत्याग्रही, झुंझार जन आंदोलनकारी, न्यायाचा कडवा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू मानवतेचा मित्र, भारत राष्ट्र सर्व दृष्टीने समर्थ होण्यासाठी संसदीय लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते, ज्यांचे नाव सोनेरी अक्षरांनी कोरावे अशा महान योग्यतेचे, भारताच्या सर्वांगीण विकासाचे महामेरू म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. अशा या महामानवाने आपल्या निधना पूर्वी म्हणजे १४आक्टोबर १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह जगातील सर्वश्रेष्ठ, शांतीचा, समतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माचा स्विकार केला. व या महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले. अशा महामानवास महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
( जी.डी.कांबळे. आजरा हायस्कूल)
