महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संशयित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ.- कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली कारवाई
सातारा :- प्रतिनिधी
फलटण येथे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संशयित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात बदने याच्या नावाचा उल्लेख आल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून, पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते. आत्महत्येस पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हा जबाबदार आहे. त्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला होता. तसेच प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा मानसिक छळ केला, अशी तक्रार या महिला डॉक्टरने केली होती. गोपाल बदने हा गेल्या दोन वर्षांपासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्या आधी बरड (ता. फलटण) पोलीस ठाण्यामध्ये त्याने सेवा बजावली. गोपाल बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावाचा रहिवासी आहे. डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाची तपासाची कमान आता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे आहे.
