🟣आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला अटक.
🟣७५ वर्षीय महिलेचे मृत्यू नंतर अंगावरील दागिने – घरातील २० ते २५ हजार रुपयांची रोकड गायब.
🟣आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला अटक.
मुंबई :- प्रतिनिधी.

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरला अटक केली असून त्याचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र हादरले आहे.
पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी सिकंदर शेखला अटक केली आहे. पपला गुर्जर टोळीला शस्त्रपुरवठा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी कुस्तीपटू सिकंदर शेखसह पंजाब पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे कुस्तीक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल, चार पिस्तुल, काडतुसांसह स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्याही जप्त केल्या आहेत. याप्रकरणी खरड (पंजाब) पोलिस ठाण्यात आर्म्स अँक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियाणा आणि राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीतून दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. संबंधित शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती, असे समजते. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
🟣७५ वर्षीय महिलेचे मृत्यू नंतर अंगावरील दागिने – घरातील २० ते २५ हजार रुपयांची रोकड गायब
पुणे.- प्रतिनिधी.
धनकवडी परिसरातील शंकर महाराज वसाहतीतील एका घरात ७५ वर्षीय महिला मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुसुम पन्हाळे (वय ७५) असे मृत महिलेचे नाव असून त्या फुलांच्या व्यवसायात होत्या व एकट्याच राहत होत्या. त्यांच्या अंगावरील दागिने आणि घरातील २० ते २५ हजार रुपयांची रोकड गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. तरीसुद्धा त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टरांनी व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला आहे.
घटनेची माहिती अशी की, कुसुम पन्हाळे या गेल्या दोन दिवसांपासून आजारी होत्या. त्यांनी गुरुवारी काहीही खाल्ले नव्हते आणि घरात विश्रांती घेत होत्या. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांचा आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा ढकलून पाहिले असता दार उघडे दिसले. आत त्या झोपलेल्या अवस्थेत होत्या.
काही वेळानंतरही त्या न उठल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या मुलीला फोन करून बोलावले. मुलगी व नातू घरात पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुसुम पन्हाळे यांना ससून रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक चौकशीत घरातील कोणत्याही वस्तूंची उचकापाचक झाल्याचे निदर्शनास आले नाही, मात्र दागिने व रोकड बेपत्ता असल्याने पोलिसांना चोरीचा संशय आहे.
सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पवार यांनी सांगितले की, “घराची पाहणी आयकार आणि फॉरेन्सिक पथकाने केली असून कोणतेही ठोस संशयास्पद पुरावे अद्याप हाती आलेले नाहीत. मृत महिलेच्या गळ्यात साडेतीन तोळ्यांची मोहनमाळ होती, ती सध्या सापडत नाही. तसेच घरात असलेली सुमारे २० ते २५ हजार रुपयांची रोकडदेखील दिसत नाही.” पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, २९ ऑक्टोबर रोजी त्या बाहेर पडताना दिसल्याचे आढळले.
त्या वेळी त्यांनी गळ्याभोवती पांढरा कपडा बांधलेला असल्याने मोहनमाळ गळ्यात होती की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी सध्या या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, वृद्ध महिलेच्या मृत्यूभोवतीचे रहस्य व घरातील रोकड आणि दागिने गायब होण्याची बाब लक्षात घेता पोलिसांनी या घटनेचा तपास अधिक गतीने सुरू केला आहे.

