जनता सहकारी गृहतारण संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.
आजरा.- प्रतिनिधी.
आजऱ्यातील जनता सहकारी गृहतारण संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ५५ लाख ५८हजार ५९४ इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लांभाश देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे यांनी संस्थेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधरण सभेत जाहिर केले. संस्था रौप्यमहोत्सवात पदार्पण करत असून संस्थेने कमी कालावधी मध्ये १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला. यंदा संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने संस्थेकडून सर्व सभासदांना प्रत्येकी रूपये पाचशेचे बोनस शेअर्स देणेचा निर्णय घेतला आहे तसेच सभासदांना प्रवासात उपयुक्त अशी ट्रॅव्हलर बॅग भेटवस्तू व कर्मचाऱ्यांना एक जादा वेतनवाढ दिली जाणार आहे. शिवाय रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीन वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रम राबविले जाणार आहेत व नवीन शाखा विस्तार करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
संस्थेने सर्व संस्था प्रवर्तकांचे, तसेच ७५ वर्ष पूर्ण झालेले सभासद, तसेच बढती मिळालेल्या व जि. प. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार प्राप्त व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. तसेच ४ थी, ५ वी शिष्यवृत्ती, १० वी व १२ वी, पदवीधर, वेगवेगळया क्षेत्रातील नाविण्यपूर्ण प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संस्था अध्यक्ष श्री. मोरे यांनी करुन संस्थेच्या आजपर्यंतच्य सांपत्तिक स्थितीचा आढावा सभासदासमोर सादर केला. श्रध्दांजली ठरावाचे वाचन संचालिका प्रो. (डॉ.) संजीवनी पाटील यांनी केले.
संस्थेच्या प्रवर्तकांचे सत्कार चेअरमन मारूती मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. विषय पत्रिका, मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक, शासकीय लेखापरीक्षण व संचालक मंडळ कर्ज यादीचे वाचन संस्थेचे मॅनेजर मधुकर खवरे यांनी केले. सभेमधील चर्चेमध्ये बंडोपंत चव्हाण, इनास फर्नांडीस, महादेव मोरूस्कर, विष्णू जाधव, सावंत, विजय बांदेकर व कृष्णा येसणे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर संस्थेने १०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केलेबददल संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करणेत आला.
संस्थेकडे आजअखेर १०७ कोटी ९० लाख हजारांच्या ठेवी असून ६६ कोटी ३५ लाख इतके कर्ज वाटप केले आहे. संस्थेला आयएसओ मानांकन ९००१ : २०१५ प्राप्त झालेले आहे. आपली संस्था स्व-भांडवलावर सुरु असून कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता व्यवहार सुरु आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. सभासदांनी या पुढील काळातही सहाकार्य करावे असे आवाहन उपाध्यक्ष प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर यांनी केले.
सभेचे सूत्रसंचालन प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर यांनी केले व आभार प्रा. आनंद चव्हाण यांनी मानले. यावेळी आजरा शाखेचे संचालक प्राचार्य, डॉ. अशोक सादळे, दिनकर पोटे, प्रा. आनंद चव्हाण,कृष्णा डेळेकर, युवराज शेटके, प्रा. (डॉ.) तानाजी कावळे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, प्रो. (डॉ.) सौ. संजीवनी पाटील, प्रा. सौ. क्रांती शिवणे उपस्थित होते. संस्थेचे मॅनेजर मधुकर खबरे व प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व सर्व शाखांचे चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
