🟣अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा. वैभव नाईक
🟥दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला.- राजकीय वर्तुळात खळबळ.- हल्लेखोर पोलीसांच्या ताब्यात.
🟥अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा. वैभव नाईक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी बक्षीस योजना.- पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेणार.- माजी आम. वैभव नाईक
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट अदानी कंपनीचे हजारो स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले आहेत. या स्मार्ट मिटरमुळे विजेचे अचूक बिल येणार असे भाजप महायुतीचे नेते आणि महावितरणकडून सांगण्यात येत आहे. मात्र वीज बिल पूर्वीपेक्षा तिप्पट,चौपट वाढून येत आहे. वीज ग्राहकांची परवानगी नसतानाही जबरदस्ती स्मार्ट वीज मीटर बसविले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनता मेटाकुटीस आणि आर्थिक संकटात आली असून ठिकठिकाणी वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करीत आहे. मात्र तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार हे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करीत नाहीत.
अदानी स्मार्ट वीज मीटर आणि वाढीव बिलाबाबत तोंडातून ‘ब्र’ सुद्धा काढत नाहीत त्यामुळे याचा निषेध म्हणून “अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा” हि बक्षीस योजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहे. आणि या योजनेच्या बक्षीस वितरणासाठी पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर पालकमंत्री व आमदार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे अशी माहिती कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
🟥दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला.- राजकीय वर्तुळात खळबळ.- हल्लेखोर पोलीसांच्या ताब्यात
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत होत्या, तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाला. यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थानी आज बुधवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी अनेक नागरिक तक्रार आणि समस्या घेऊन दाखल झाले होते. तेव्हा हल्लेखोर सुद्धा तक्रार देण्यासाठी जनता दरबारात हजर झाला. त्यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांना चापट मारली. तो जोरजोराने आरडाओरड करू लागला. अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळेच गडबडून गेले. पोलिसांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेतले. दिल्लीचे भाजपचे प्रवक्ते प्रविण शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनता दरबारात तक्रार देण्याच्या बहाण्याने हा तरुण सीएम गुप्ता यांच्या जवळ पोहचला. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे काही कागदपत्र दिली. मग तो आरडाओरड करू लागला आणि त्याने गुप्ता यांना चापट मारली.
पोलिसांकडून या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले आहे, त्यानंतर त्यांना किती जखमा झाल्या आहेत हे स्पष्ट होईल. हल्लेखोर न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देत होता असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे वय 35 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. भाजप नेते रमेश बिधुरी म्हणाले की, रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न सार्वजनिक सुनावणीला अडथळा आणण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे असे मला वाटते.
