🟣शेळप ग्रामपंचायत कर्मचारी शंकर नवार यांचा प्रामाणिकपणा
सापडलेले पैसे परत देऊन दाखवला चांगुलपणा.
🔴ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल?महाविकास आघाडीच्या भवितव्यावर.- काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांचे मोठे विधान
🟣ग्रंथालय शास्त्राचे जनक पदमश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी
🟣शेळप ग्रामपंचायत कर्मचारी शंकर नवार यांचा प्रामाणिकपणा
सापडलेले पैसे परत देऊन दाखवला चांगुलपणा…
आजरा – प्रतिनिधी.

शेळप ग्रामपंचायत कर्मचारी शंकर नवार यांनी सापडलेले पैसे प्रामाणिकपणे परत करत आजही समाजात चांगुलपणा टिकून आहे. हे दाखवून दिले. कॉम्रेड संपत देसाई, तानाजी देसाई, रवींद्र भाटले हे शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चाच्या तयारीसाठी शेळप येथे गेले असता संपत देसाई यांचे पाकीट तिथंच पडले. रात्री दोनतीन बैठका करून कॉ. देसाई घरी परत आल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. सावंतवाडी येथील मित्र आणि कार्यकर्ते राजेंद्र कांबळे यांनी परवा दुपारी मित्राला देण्यासाठी वीस हजार रुपये कॉम्रेड देसाई यांचे कडे दिले होते. ते तसेच खिशात तसेच ठेवून कॉ देसाई शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चाच्या तयारीसाठी खेडगे, पारपोली, शेळप आणि दाभिल येथे गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर पैसे आणि पाकीट हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या गावातील कार्यकर्त्यांना पैसे हरवल्याचे सांगून, सापडले तर कळवा म्हणून कॉम्रेड देसाई जेऊर येथे मोर्चाच्या बैठकीसाठी निघाले. त्याचवेळी शंकर नवार यांचा त्यांना फोन आला व आपले पाकीट आणि पैसे माझ्याकडे असल्याचे सांगितले. सापडलेले पैसे परत करणाऱ्या शंकर नवार या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सगळीकडे होत आहे.
🔴ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल?महाविकास आघाडीच्या भवितव्यावर.- काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांचे मोठे विधान
पुणे :- प्रतिनिधी

मराठीच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यातील सर्व मतभेद विसरून एकत्र आले होते. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटामधील युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्यास मनसेचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मोठं विधान केलं आहे.
पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवासी कार्यशाळेत रमेश चेन्नीथला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चेन्नीथला म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र येत असतील, तर आम्हाला त्यात कोणतीही अडचण नाही. आगामी निवडणुकीत त्यांच्यात युती होईल की नाही, हे आम्हाला माहीत नाही. मात्र, त्यांच्या एकत्र येण्याला आमचा विरोध नाही. या वक्तव्यमुळे ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
चेन्नीथला यांनी पुढे स्पष्ट केले की, राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा (एमव्हीए) भाग नाहीत. “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीबाबत कोणतीही चर्चा झाली असेल, तर ती आमच्या माहितीत नाही. पण दोन्ही नेते एकत्र येत असतील, तर आम्हाला त्यात काही हरकत नाही. मात्र, अंतिम निर्णय चर्चेतून घेतला जाईल. याशिवाय, त्यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही भाष्य केले आणि आघाडीच्या भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी काँग्रेस पक्ष विचारमंथन करत असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, या कार्यशाळेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. “आता फक्त अॅक्शन, अॅक्शन आणि अॅक्शन,” असा मंत्र देत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, आगामी निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास येईल.
🟣ग्रंथालय शास्त्राचे जनक पदमश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी
आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक, पदमश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांचा जन्मदिवस हा देशभरात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ग्रंथालयाचे कार्यवाह कुंडलिक नावलकर यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. १२ ऑगस्ट १८९२ रोजी मद्रास प्रांतातील शियाली या गावी जन्मलेल्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी देशातीय ग्रंथालय चळवळ वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. ग्रंथालय शास्त्राचे नियम, शास्त्रीय व्दिबिंदू ग्रंथ वर्गीकरण पध्दती, ग्रंथालय कायदा व सार्वजनिक ग्रंथालय चळवळ या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. यावेळी ग्रंथालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक विजय राजोपाध्ये, बंडोपंत चव्हाण, महंमदअली मुजावर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, समीर चॉद, संतोष कांबळे, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार व शालेय विद्यार्थी उपस्थीत होते.
