🟥जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक.
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान शहीद.- 10 जवान जखमी.
( एका दहशतवाद्याचा खात्मा.)
श्रीनगर :- वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर येथील कुलगाम येथे भारतीय सैन्यात आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली आहे. या चकमकीत भारतीय सैन्याचे 2 जवान शहीद झाले, तर अन्य 10 जवान जखमी झाले आहेत. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात देखील एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सध्या सुरक्षा दल कुलगाममधील दुर्गम जंगल परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि इतर सर्व आवश्यक साधनांचा वापर करत आहे. ही चकमक अद्यापही सुरू असून, परिस्थितीवर सैन्याचे बारीक लक्ष आहे. कुलगामच्या अलाख भागात दहशतवाद्यांशी चकमकीचा आज नववा दिवस आहे. रात्रभर या भागात गोळीबाराचा आवाज ऐकायला येत होता. वीर लेफ्टनंट कर्नल प्रीतपाल सिंग आणि सिपाही हरमिंदर सिंग हे शहीद झाले आहेत. चिनार कोरने एक्सवर (ट्वीट) पोस्ट करत या घटनेची पुष्टी केली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘ऑप अखल, कुलगाम… चिनार कोर राष्ट्रासाठी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या वीर लेफ्टनंट कर्नल प्रीतपाल सिंग आणि सिपाही हरमिंदर सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करते.
🟥त्यांचे शौर्य आणि समर्पण आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. भारतीयसेना शोकाकुल कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करते आणि त्यांच्या दुखात सहभागी आहे’, असं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. या जंगल भागात नैसर्गिक गुहांचा आधार घेत तीन ते चार दहशतवाद्यांना आसरा घेतला होता. गेल्या ९ दिवसांपासून हे दहशतवादी भारतीय सैन्यावर गोळीबार करत आहेत. यावरुन त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा असल्याचं समोर आलं आहे.
