🟥कितीही टार्गेट केले तरी ओबीसींच्या हक्कासाठी मी लढतच राहणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
🟥कोकण रेल्वे मार्गावर रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या धावणार!
🟥जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिकेची राहत्या घरी हत्या. – महिलेचे हातपाय बांधून निर्घृण खून.
🟥कितीही टार्गेट केले तरी ओबीसींच्या हक्कासाठी मी लढतच राहणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
पणजी :- प्रतिनिधी
माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोललो म्हणून टीका केली जाते, पण मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मला कितीही टार्गेट केले तरी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी लढतच राहणार आहे. एका समाजासाठी आवाज उठवला म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात बोलतो आहे असं म्हटलं जातं. पण माझं धोरण तसं नाही. जोपर्यंत ओबीसी समाज प्रगतीच्या मुख्य प्रवाहात येत नाही, तोपर्यंत प्रगत भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गोव्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, प्राध्यापक डॉ. बबनराव तायवाडे, आमदार परिणय फुके, माजी मंत्री विजय वड्डेटीवर, माजी मंत्री महादेव जानकर, आमदर किसन कथोरे, आमदार अभिजीत वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर मनोगत व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, ‘आज इथे ७६ मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी २४ मागण्या केंद्राकडे करण्यात आल्या आहेत. त्या आपण केंद्राकडे पाठवू. २५ ते २६ मागण्या महाराष्ट्राकडे तर बाकीच्या मागण्या गोवा सरकारकडे करण्यात आल्या आहेत. मागण्यांवर आपण काम करु. काही झालं तरीही ओबीसी समाजासाठी काम करणारच, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या कार्क्रमादरम्यान आपले विचार मांडले. ‘ओबीसींनी सादर केलेल्या रिप्रेझेंटेशनवर महाराष्ट्र, गोव्यासह केंद्र सरकार विचाराधीन असून ओबीसींना न्याय, हक्क आणि आरक्षण मिळालेच पाहिजे,’ असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. मंडळ आयोगापासून आजपर्यंत आपल्या हक्कांसाठी ओबीसी समाज लढत आहे. भाजपा सरकार ओबींसींच्या हक्कासाठी तत्पर असून सरकारद्वारा ओबीसी समाजासाठी चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. मागील काही वर्षात ओबीसींच्या नावावर फक्त राजकारण करण्यात आले. समाजाचा वापर करून काहींनी फक्त पदे उपभोगली. मात्र ओबीसींना न्याय आणि घटनात्मक हक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
🟥कोकण रेल्वे मार्गावर रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या धावणार!
रत्नागिरी :- प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावणार आहेत.
यामध्ये, गाडी क्र. ०११२५ लोकमान्य टिळक ट. ते मडगाव ही गाडी १४ ऑगस्ट ३०२५ रात्री १०.१५ वाजता सुटून मडगाव येथे १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ वाजता पोहचणार आहे. गाडी क्र. ०११२६ मडगाव ते लोकमान्य टिळक ट. ही गाडी १५ ऑगस्ट २०२५, दुपारी १.४० वा. सुटणार आहे. तसेच लोकमान्य टिळक ट. येथे १६ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०५ वाजता पोहचणार आहे. गाडी क्र. ०११२७ लोकमान्य टिळक ट. ते मडगाव ही गाडी १६ ऑगस्ट २०२५, रात्री १].१५ वाजता सुटून मडगाव येथे १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ वाजता पोहचेल. गाडी क्र.०११२८ मडगाव ते लोकमान्य टिळक ट. ही गाडी १ ऑगस्ट २०२५, दुपारी १.४० वाजता सुटून लोकमान्य टिळक ट. येथे १८ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०५ वाजता पोहचेल. यासर्व गाड्या ठाणे, पनवेल, पेन, रोहा, मंगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहेत.या गाड्यांचे आरक्षण ९ ऑगस्ट २०२५ पासून सर्व बुकींग केंद्रांवर, कोकण रेल्वे वेबसाइटवर आणि इंटरनेटद्वारे सुरु होणार आहे. अधिक माहितीसाठी कोकण रेल्वेची वेबसाईट पहाण्याचे आवाहन जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.
🟥जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिकेची राहत्या घरी हत्या. – महिलेचे हातपाय बांधून निर्घृण खून.
चिपळूण :- प्रतिनिधी
तालुक्यातील धामणवणे गावात आज सकाळी उघडकीस आलेल्या एका थरारक घटनेने परिसर हादरून गेला आहे. एका ६८ वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तींनी हातपाय बांधून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पोलीस जिल्हा अधीक्षक ‘नितीन बगाटे ‘घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अधिक्षकांकडून तपास सुरु केला आहे.यावेळी डॉगस्कॉड देखील घटनास्थळी दाखल झाले होते..
चिपळुणात थरारक हत्या!
महिलेचे हातपाय बांधून निर्घृण खूनामूळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.चिपळूण तालुक्यातील धामणवणे गावात आज सकाळी उघडकीस आलेल्या एका थरारक घटनेने परिसर हादरून गेला आहे. एका ६८ वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तींनी हातपाय बांधून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने चिपळूण शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.खून झालेल्या महिलेचे नाव वर्षा जोशी (वय ६८) असे असून त्या एकट्याच घरात राहत होत्या. सकाळी काही शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता त्यांना तिचा मृतदेह सापडला. हातपाय घट्ट बांधलेले होते आणि शरीरावर गंभीर जखमांचे निशाण होते. खून करण्यापूर्वी महिलेने प्रतिकार केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र प्रत्यक्षात हत्या कुणी आणि का केली? यामागे आणखी कोणते धागेदोरे आहेत का? हे अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपासाच्या सुत्रांनुसार काही संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, या खुना मागचे गुंतागुंतीचे रहस्य उलगडण्यासाठी तपास अधिक वेगात सुरू आहे.
