🛑पुण्यात खळबळ! – पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा – एकनाथरावाच्या – जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक
🔴टीम इंडियाने इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावला.- मँचेस्टर कसोटी ड्रॉ.- इंग्लंडचे गर्वहरण करत टीम इंडियाने गड राखला
🛑बिबटया कोंबड्यांच्या शिकारीसाठी गेला अन् खुराड्यात अडकला.
🛑पुण्यात खळबळ! – पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा – एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!
( गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन यांची व्हिडिओ क्लिप बाहेर काढतो असे सांगणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या बाबतीत बोलायचे म्हणजे त्यांच्या जावयाचीच आता क्लिप आली बाहेर.)
पुणे :- प्रतिनिधी

पुण्यातील एका धक्कादायक घटनेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येथील खराडी परिसरात पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. एका लॉजच्या रुममध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती.पोलिसांनी घटनास्थळी ड्रग्ज, दारू आणि गुटखा जप्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही या पार्टीत समावेश असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी प्रांजल यांना अटक केली असून गुंड बॉबी यादवचा भाऊ श्रीपाद यादवच्याही मुसक्या आवळल्या आहेत.या प्रकरणात पोलिसांनी प्रांजल खेवलकरसह इतर आरोपींना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास करण्यात आली. या पार्टीबाबत सर्वात आधी क्राइम ब्रांचला माहिती मिळाली त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या पार्टी २ .७ ग्रॅम कोकेन, १ ० मोबाईल, दारू, बियर बॉटल, हुक्का , हुक्का पॉट सापडले आहे.तर 2 महिलांसह 5 पुरुषांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही रेव्ह पार्टी खराडी परिसरात असलेल्या एका स्टुडिओत सुरु होती. या रेव्ह पार्टीवर छापा टाकून दोन महिलांसह पाच पुरुषांना पुणे पोलिसांनी अटक केली. तसच पुणे पोलिसांनी या छाप्यात वीड आणि कोकेन जप्त केलं. एनडीपीएस कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलीय.खराडी परिसरातील स्टे बर्ड नावाच्या लक्झरी गेस्ट हाऊसमध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केले. पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. या रेव्ह पार्टीत सामील असलेले लोक अंमली पदार्थांचं सेवन करत होते. यामध्ये कोकेन, एमडी ड्रग्ज आणि महागडे मद्याचा समावेश असल्याचं समोर आलंय. दरम्यान, या रेव्ह पार्टीत आणि अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे.
⭕या छापेमारीनंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला.
मध्यरात्री पुणे पोलिसांनी खराडीमध्ये छापेमारी करून रेव्ह पार्टी उधळून टाकली. मात्र, या छापेमारीनंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडण्यात आले.खडसेंची लेक रोहिणी खडसे यांचा प्रांजल खेवलकर पती असून घटस्फोटानंतर त्यांनी बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजलसोबत लग्न केले. प्रांजल हे मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबियांसोबतच राहतात.यापूर्वीही प्रांजल खेवलकर हे मोठ्या वादात गाडीमुळे सापडले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केली होती. रेव्ह पार्टीमध्ये पुणे पोलिसांनी काही पुरूषांसोबतच महिलांना देखील ताब्यात घेतले आहे. रेव्ह पार्टीमधून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मेडिकल करण्यात आल्याचीही माहिती मिळतंय. पोलिसांना पार्टीच्या ठिकाणी हुक्का, दारू आणि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडली आहेत.
प्रांजल खेवलकर कोण? त्यांचा व्यवसाय नेमका काय हे सर्व जाणून घ्या. रोहिणी खडसे या राजकारण सक्रिय आहेत तर प्रांजल खेवलकर हे एक व्यावसायिक आहेत आणि त्यांचे रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम आहे. त्याच्या काही कंपन्या देखील आहेत. प्रांजल हे जरी मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबियांसोबत राहत असले तरीही त्यांचे पुण्यात कायमच येणे जाणे सुरू असते. पतीला ताब्यात घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी यावर काहीही भाष्य केले नाही.जावयाला ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सांगितले की, माझे त्यांच्यासोबत काही बोलणे झाले नाही आणि ते पोलिसांच्या ताब्यात असल्याने मला काही माहिती मिळू शकली नाही. जर ही रेव्ह पार्टी असेल आम्ही जावई गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर शासन व्हावे. पुण्यातील रेव्ह पार्टीमधून पुणे पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोकेन आणि गांजा मिळालाय. यासोबतच पार्टीच्या ठिकाणीहून दारूच्या बाटल्याही मिळाल्या आहेत. रेव्ह पार्टीमधून अटक करण्यात आलेल्या सर्वांचे मेडिकल झाले असून पोलिस पुढे काय कारवाई करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या पार्टीदरम्यानचा एक व्हिडीओ देखील पुढे आला.
🟥कसला हानी आणि कसला ट्रॅप?
यानंतर आता राजकीय नेत्यांकडून याप्रकरणी प्रतिक्रिया समोर येत आहेत. गिरीष महाजन यांनी या पार्टीचे आयोजन त्यांच्याच जावयाने केल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रपच्या प्रकरणावरून विरोधकांकडून आवाज उठवला जात आहे. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नाना पटोले यांनी पेनड्राइव्ह दाखवत हनी ट्रपवर मोठा दावा केला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसला हानी आणि कसला ट्रॅप? असे म्हटले होते.
🅾️अहवाल पॉझिटिव्ह
शनिवारी मध्यरात्री पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील खराडी भागातील उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ही पार्टीवर छापा टाकला. यामध्ये ५ पुरुष आणि २ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिला पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. रोहिणी खडसे यांचे पती प्राजंल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्या रक्ताच्या तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
विद्येच्या माहेरघरात रेव्हीचा पार्टीचा धक्कादायक प्रकार
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात हाऊस अॉफ पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टीचा धक्कादायक प्रकार समाेर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या रेव्ह पार्टीमुळे पुण्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या वापरामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच रेव्ह पार्टीच्या घटनेमुळे खराडी परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
🔴कोण आहे डॉ. प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर हे शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंचे जावई आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे दुसरे पती आहेत. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर बालपणीचा मित्र प्रांजल यांच्याशी रोहिणी खडसे यांनी विवाह केला. खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. पत्नी रोहिणी खडसे या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र पती प्रांजल राजकारणापासून दूर आहेत.
खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे.
🔴टीम इंडियाने इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावला.- मँचेस्टर कसोटी ड्रॉ.- इंग्लंडचे गर्वहरण करत टीम इंडियाने गड राखला
मँचेस्टर :- वृत्तसंस्था
भारतीय संघ चौथा सामना गमावेल, असे इंग्लंडला कदाचित वाटले असेल. इंग्लंडचा संघ विजयाचे सेलिब्रेशन करण्यात गुंग होता. पण त्याचवेळी भारतीय संघाने इंग्लंडचे गर्वहरण केले आणि मँचेस्टरचा गड राखला. भारतावर यावेळी पराभवाची नामुष्की ओढवली होती. पण भारताने पाचव्या दिवशीही दिमाखदार खेळ केला आणि हा सामना ड्रॉ राखण्यात त्यांना यश आले. या सामन्यात गिलनंतर (१०३) रवींद्र जडेजा (नाबाद १०७) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद १००) यांनीही शतक झळकावत इंग्लंडला हतबल करून सोडले. भारताने ४ बाद ४२४ अशी धावसंख्या करत आपला डाव घोषित केला. इंग्लंडनेही यावेळी हार मानली.
इंग्लंडने या सामन्यात ६०० धावांचा पल्ला ओलांडला. भारतावरर ३११ धावांची आघाडीही घेतली होती. त्यानंतर इंग्लडने भारताने दोन फलंदाज शून्यावर बाद केले. त्यामुळे भारताचा चौथ्याच दिवशी पराभव होईल, असे म्हटले जात होते. पण त्यानंतर मैदानात शुभमन गिल आणि केएल राहुल समर्थपणे उभे राहीले. या दोघांनी चौथा दिवस खेळून काढला. पण त्यानंतरही पाचव्या दिवशी भारतीय संघावर पराभवाची टांगती तलवार होती. पण पाचव्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला उतरला आणि त्यावेळी एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. पाचव्या दिवशी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला. तेव्हा भारतीय खेळाडूंचाा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता. राहुल आणि गिल यांनी दमदार फलंदाजी केली.
राहुल शतकासमीप आला होता. पण राहुलला यावेळी शतक झळकावता आले नाही. राहुलने यावेळी ८ चौकारांच्या जोरावर ९० धावांची खेळी साकारली. राहुलला शतक झळकावता आले नसले तरी गिलने ही कसर भरून काढली. कारण गिलने यावेळी शतक झळकावत इतिहास रचला. गेल्या ३५ वर्षांत भारताचे या मैदानातील पहिले शतक ठरले. शतकानंतर गिलला जास्त फलंदाजी करता आली नाही. लंचला १० मिनिटे असताना तो बाद झाला. भारताला हा मोठा धक्का बसला होता, पण भारताला या गोष्टीची झळ जाणवली नाही. गिल बाद झाला तरी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढली. इंग्लंडचे गोलंदाज जडेजा आणि सुंदर यांच्यापुढे नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. पण जडेजा आणि सुंदर यांनी यावेळी दमदार फलंदाजी केली आणि भारताला सामना ड्रॉ राखण्यात सर्वात महत्वाची भूमिका या जोडीने बजाव.
🟣बिबटया कोंबड्यांच्या शिकारीसाठी गेला अन् खुराड्यात अडकला.- तुरळ येथील घटना.- वनविभागाने बिबट्याला पिंजऱ्यात केले जेरबंद
देवरूख :- प्रतिनिधी.

कोंबड्यांची शिकार करण्यासाठी खुराड्यात गेलेला बिबट्या हा त्याच खुराड्यात अडकल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील तुरळ सांगडेवाडीत रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर कुंभार यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात हा बिबट्या अडकला. वनविभागाने या बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने जेरबंद केले. बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
तुरळ येथील मधुकर कुंभार यांच्या राहत्या घराचे मागे असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्या शिरल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण यांनी परिमंडळ वनअधिकारी संगमेश्वर देवरुख यांना दिली.मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफ रेस्क्यू टीम पिंजरा व इतर साहित्य सह जागेवर जाऊन खात्री करता सदरचा बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकलेला आढळून आला. सदर ठिकाणी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी असलेने पोलीस निरीक्षक संगमेश्वर यांचेशी संपर्क करून गर्दी पांगविणेसाठी पाचारण केले. वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी गर्दी पांगवण्याचे काम केले. तद्नंतर सदर कोंबड्याचे पोल्ट्री फार्मचे सभोवार योग्य ती खबरदारी घेऊन शेडनेट लावले. कोंबड्याचे पोल्ट्रीचे मुख्य दरवाजाचे तोंडावर पिंजरा लावुन वरील भागात लाकडी फळया मारल्या. कोंबड्याचे पोल्ट्री फार्म मध्ये असलेल्या चार कंपार्टमेंट मध्ये फिरत असलेल्या बिबट्याला योग्य ती खबरदारी घेवुन अडीच तासांचे अथक प्रयत्नांनंतर बिबट्यास सुरक्षित रित्या पिंजऱ्यात जेरबंद केले.
सदरवेळी घटनास्थळी परीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार,परिमंडळ वन अधिकारी श्री न्हाणू गावडे वनरक्षक साखरपा श्री सहयोग कराडे वनरक्षक फुणगूस श्री आकाश कडुकर वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे वनरक्षक जाकादेवी श्री मती शर्वरी कदम वनरक्षक कांदळवन कक्ष रत्नागिरी, किरण पाचारणे, वनरक्षक आरवली श्री सुरज तेली, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा श्री रणजीत पाटील, प्राणी मित्र महेश धोत्रे, निसर्गमित्र अनुराग आखाडे, श्री संदीप गुरव संदीप उजगावकर हे उपस्थित होते. तसेच पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक संगमेश्वर श्री चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्री गावित, हेड कॉन्स्टेबल श्री जाधव श्री अरुण वानरे, पोलीस कॉन्स्टेबल श्री लोखंडे व श्री खाडे हे उपस्थित होते. तसेच घटनास्थळी सरपंच सरपंच सहदेव सुवरे , उपसभापती श्री दिलीप सावंत,पोलीस पाटील तुरळ श्रीमती वर्षा सुर्वे,पोलीस पाटील हरेकर वाडी संजय धाकटे, पोलीस पाटील गोळवली अनंत पाध्ये, पत्रकार दीपक तुळसणकर व मिलिंद चव्हाण, श्री विचारे, श्री कडवईकर उपस्थित होते.
🅾️सदर रेस्क्यू कामी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सदर बिबट्या वन्य प्राण्यास कोणताही विलंब न करता सुरक्षितरीत्या ताब्यात घेतल्या बाबत ग्रामस्थांनी वनविभागाचे कौतुक केले. वन अधिकारी यांनी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. सदर बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी कडवई श्री बेलोरे यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून घेतले ती मादी असून वय अंदाजे आडीच ते तिन वर्ष आहे बिबट्या तंदुरुस्त असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.सदर रेस्क्यू ची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती गिरिजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण यांनी केले आहे.