🛑नागरिकांच्या मागणीला दाद न देता.- टोलची दबंगिरी.- जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
💥महसूल मंत्र्यांच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली.
( अनधिकृत चोरटी वाळू वाहतुकीला जिल्हाधिकाऱ्यांना कळवून सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.)
🛑श्री.लक्ष्मी सहकारी दुध व्याव.संस्था,मर्या.गिजवणे बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित – संग्राम सावंत.
💥विविध योजनेतील केंद्र पुरस्कृत लाभार्थ्यांच्या हयात दाखला – जमा करण्याचे – आजरा तहसीलदार यांचे आवाहन.
🛑नागरिकांच्या मागणीला दाद न देता.- टोलची दबंगिरी.- जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
आजरा.- प्रतिनिधी.
गेले वर्ष दिड वर्षं आपण संकेश्वर बांदा महामार्ग टोल मुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत आलो आहोत. मोर्चा, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, रस्ता रोको यासह अनेक आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याबाबत महामार्गच्या अधिकाऱ्यांसोबत तीन चार बैठका झाल्या.
हा धोरणात्मक निर्णय असल्याने वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्याखेरीज टोलचा निर्णय घेतला जाणार नाही असे ठरले होते. याबाबत सद्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर व तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन निर्णय केला जाईल असे सांगितले होते. पण तसे कांहीही न करता महामार्ग अधिकाऱ्यांनी टोल नाका चालू करण्याची घोषणा करून आजरेकर जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
ही लढणाऱ्या आजरेकर जनतेची फसवणूक असून उद्या सकाळी ८.०० वाजता तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी टोल नाक्याजवळ जमून टोलला विरोध करायचा आहे तरी सर्वानी उद्या शुक्रवार दि १८ रोजी सकाळी ठीक ८.०० वाजण्याच्या पूर्वी टोल नाक्याजवळ जमावे असे आवाहन टोल मुक्ती संघर्ष समितीने केली आहे
💥महसूल मंत्र्यांच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली.
( अनधिकृत चोरटी वाळू वाहतुकीला जिल्हाधिकाऱ्यांना कळवून सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.)
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी
मागील कित्येक वर्षे कोरजाई खाडीत अवैध वाळू उत्खनन बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.सध्या तर अवैध वाळू काढण्यात शासनाची बंदी असताना ऐन जुलै महिन्यांत या कोरजाई खाडीत आठ बोटी खाडीत खालून मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात आहे.तसेच याठिकाणी पाच रॅम्प असून,वेंगुर्ले तहसीलदार या वाळूच्या रॅम्पवर नविन कायद्यानुसार रॅम्प मालकावर कारवाई करणार का?असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
काही दिवसांपुर्वी पावसाळी अधिवेशनात या कोरजाई खाडीत अवैध वाळू काढली जात असल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते.यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरजाई खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू काढण्याऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश सभागृहात दिला होता.मात्र या आदेशाची वाळू व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवली आहे.
त्याचबरोबर तेथील स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुरू असलेल्या अनधिकृत वाळुबाबत कळविले असता जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला असल्याचे बोलले जात आहेत.
🛑श्री.लक्ष्मी सहकारी दुध व्याव.संस्था,मर्या.गिजवणे बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित-संग्राम सावंत.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
श्री.लक्ष्मी सहकारी दुध व्याव.संस्था, मर्या.गिजवणे, ता. गडहिंग्लज. या संस्थेच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारा विरोधात सखोल चौकशी समिती नेमून करण्यात यावी. दोषींवर कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत व यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात प्रांत (उपविभागीय अधिकारी) व गडहिंग्लज कार्यालयासमोर सोमवार दि.१४ जुलै २०२५ रोजी पासून संघर्ष मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते ते आंदोलन आम्ही स्थगित केले आहे.या समारोपावेळी संग्राम सावंत, अँड.दिग्विजय कुराडे, विनोद पाटील, अँड.दशरथ दळवी, अरविंद बारदेस्कर, बाबासाहेब पाटील,संजय कांबळे यांनी भाषणे केली. यावेळी सागर शिंदे, जनार्दन तोडकर, मानतेश बन्ने, कृष्णा कांबळे दिगंबर विटेकरी, स्वप्निल कोरी, गणेश कळेकर, संकेत बरकाळे, नेताजी बरकाळे, विजय कडूकर, आप्पासाहेब कडूकर, संतोष माने यांच्यासह सर्व कार्यकर्ते व सभासद व दूध उत्पादक उपस्थित होते. पुढील काळात मा.सहाय्यक निबंधकसो, सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर जनतेच्या न्यायिक बाजूने चौकशी करून कारवाई करावी. दूध उत्पादक शेतकरी यांना न्याय दयावा. आम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये.याबाबत खबरदारी घ्यायला हवी आहे. चेअरमन सचिव व संस्थेच्या संचालक मंडळाचा अहवाल आल्यानंतर आमच्या लढयाची रणनीती ठरवणार आहोत. असा निर्धारही यावेळी केलेला आहे.
🛑विविध योजनेतील केंद्र पुरस्कृत लाभार्थ्यांच्या हयात दाखला – जमा करण्याचे – आजरा तहसीलदार यांचे आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी
केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन अनुदान योजना या योजना महसुल प्रशासना मार्फत राबविण्यात येतात. सदर केंद्र पुरस्कृत सर्व लाभार्थ्यांचे जीवन प्रमाणपत्र प्रणाली (DLC) Beneficiary Satyapan App व्दारे रजिस्ट्रेशन करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पोर्टलवर लाभार्थी ग्राहय धरले जाणार नाहीत. तसेच त्यासाठी निधी देखील मिळणार नाही अशा केंद्र शासनाच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. सदरचे रजिस्ट्रेशन हे माहे जुलै 2025 अखेर पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. जे लाभार्थी मयत झाले आहेत त्या लाभार्थ्यांच्या वारसांनी तसे तहसिल कार्यालयास कळविणे आवश्यक आहे.
सदर केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी आपले अपडेट करणेत आलेले आधारकार्ड व त्या आधारकार्डास लिंक असलेल्या मोबाईलसह तहसिल कार्यालयात अथवा आपल्या नजिकच्या महाईसेवा केंद्रामध्ये उपस्थित रहावे व आपले प्रमाणपत्र जनरेट करुन घ्यावे. (डोळयांचे स्कॅनिंग करावयाचे असलेने स्वतः लाभार्थी उपस्थित राहणे अनिवार्य आहे). ज्या लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App व्दारे स्वतः प्रमाणपत्र जनरेट करणे शक्य आहे असे लाभार्थी सदरचे प्रमाणपत्र त्यांच्या मोबाईलवर जनरेट करु शकतात. ज्या लाभार्थ्यांनी स्वतः प्रमाणपत्र जनरेट केले आहे त्यांनी सदरचे प्रमाणपत्र पत्राची प्रत तहसिल कार्यालयास जमा करावे असे आवाहन तहसिलदार आजरा यांनी केले आहे.