सौ. रेवती पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
आजरा.- प्रतिनिधी.
मोरेवाडी (ता.आजरा) येथील प्राथमिक शाळेच्या मदत अध्यापिका सौ. रेवती रावसाहेब पाटील (रा. भादवण) यांना स्व. राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केली.
स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७३ व्या जयंतीचे औचित्य साधून प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील ४९ शिक्षकांची राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोरेवाडी शाळेच्या अध्यापिका सौ. रेवती पाटील यांचा समावेश आहे. सौ. पाटील यांनी केगदवाडी, गेळे (ता. सावंतवाडी), मसोली, कन्या आजरा, नागवे (चंदगड) आदी ठिकाणी सांस्कृतिक, क्रिडा स्पर्धेसह नवोदय, ए. टी. एस., शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यार्थी शिष्यवृत्ती यादीत येण्याकरिता उल्लेखनीय काम केले आहे. या कामांची दखल घेवून आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे वितरण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच केले जाणार असल्याची माहिती सौ. नवोदिता घाटगे यांनी दिली. यावेळी जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.