🟥राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा.- या जिल्ह्याला आज रेड अलर्ट.- जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर..
मुंबई :- प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र पाऊस कोसळत आहे. राज्यभर पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे. तसेच पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आज सोमवारी रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून नदीकाठच्या गावांना धोका वाढण्याची चिन्हे आहेत. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या भागांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी हवामान विभागाने वाऱ्याचा वेग वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम असून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. रात्रभरापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी रेड अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाकडून पालघर मधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या आदेशाने प्रशासनाला सतर्क राहण्याचे सूचना करण्यात आल्या आहेत तर सरकारी आणि खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच नागरिकांना आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.