🟥ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजप – शिंदेंना धसका.- विरोधकांना घाम फोडणारा विजय मेळावा.- मुंबईचा अंदाज समोर!
मुंबई :- प्रतिनिधी.
मराठीसाठी आज 5 जुलैला उद्धव-राज ठाकरे एकत्र येत विजयी मेळावा घेत आहेत. हिंदीच्या मुद्यावरून राजकारण तापलेले असताना सरकारने हिंदी अंमलबजवणीचे दोन जीआर रद्द केले. ठाकरे बंधु एकत्रित येण्याच्या आधीच त्यांनी मिळवलेला हा मोठा विजय मानला जातो आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत दोघांची युती झाली तर काय होईल? याची चर्चा सुरू झाली आहे.
त्याचे उत्तर निवडणूक रणनीतीकार अमिताभ तिवारी यांनी दिले आहे. India Today साठी लिहिलेल्या लेखामध्ये त्यांनी मागील निवडणुकीची आकडेवारी देत याबद्दलचे अंदाज सांगितले आहे.
तिवारी यांनी रंजक आकडेवारी मांडत सांगितले की, 2017 ला युतीमधील शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली. तर, मनसे देखील स्वबळावर मैदानात होती. त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेना 84, भाजपला 82, काँग्रेस 31, मनसेला 7, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या. तर अन्य पक्षांना केवळ 14 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार विचार केल्यास मतांची टक्केवारी विचार घेतल्यास मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांना 118 जागा आणि भाजपला 64 जागा तर काँग्रेसला 25 जागा मिळतील. एकसंध शिवसेनाला त्यावेळी 28.5 टक्के मतं मिळाली होती. तर मनसेला 7.7 टक्के मिळाली होती.
तेव्हा पक्ष एकत्र आल्याने त्यांच्या मतांची टक्केवारी तर वाढतेच मात्र जागेच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.
👉मुंबईत ठाकरेच ब्रँड
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि मनसेला यश मिळाले नाही. उद्धव ठकारेंचे 20 आमदार विजयी झाले. तर, राज ठाकरेंना खाते देखील उघडता आले नाही. मात्र, विधानसभेच्या अनुषंगाने मुंबईचा विचार केला तर फक्त मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 आमदार विजयी झाले आणि 23 टक्के मतं देखील मिळाली. तर, राज्यात केवळ 1.6 टक्के मते मिळवणाऱ्या मनसेला मुंबईत 7.1 टक्के मतं आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधुंनी मिळून तब्बल 30 टक्के मतं मुंबईत मिळवली आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत केवळ 17 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे मुंबईत ठाकरे ब्रँड जोरात चालतो असा इतिहास आहे.

🟥ठाकरे बंधुंकडे 36 टक्के मतदान
मुंबईमध्ये 20 टक्के मुस्लिम मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीत या मतदारांनी उद्धव ठाकरेंना मोठी साथ दिली होती. मात्र, राज ठाकरेसोबत आल्याने हे मतदार काय करणार हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, 2017 मध्ये मुस्लिम मतदारसोबत नव्हता तेव्हा स्वतंत्र लढूनही एकसंध शिवसेनाला 28.5 टक्के मतं होती. आणि मनसेला 7.7 टक्के मतं होती. त्यामुळे ठाकरे बंधु एकत्र आल्याने तब्बल 36 टक्के मतं होतील. तसेच भाजपला रोखण्यासाठी मुस्लिम मतं देखील उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

👉एकनाथ शिंदेंना टेन्शन
खरी शिवसेना आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी हिंदींच्या मुद्याच्या विरोधात भूमिका घेतली नाही. त्यांचेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय कसा योग्य होता. हे सांगत होते. त्यामुळे मराठी मतदार त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात चांगले यश मिळवले असले तरी त्यांना मुंबईत उद्धव ठाकरेंचा सामना करता आला नाही. त्यांच्या पक्षाला 17 टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे ठाकरे बंधु एकत्र आले तर त्यांचे टेन्शन वाढणार आहे.