नेते शरद पवार यांच्या पुढाकारामुळे वन हक्काचे प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा.- पुणे येथे वन जमिनी व आदिवासींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांची बैठक.
आजरा – प्रतिनिधी.
प.महराष्ट्र, कोकण व अहिल्यानगर येथील आदिवासी बिगर आदिवासी समूहाचे वन हक्काचे प्रश्न समजून घेण्यासाठी पुणे येथे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आदिवासी विकास केंद्रामार्फत जेष्ठ नेते शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रतिभा शिंदे, कॉ संपत देसाई, दत्ता बाळसराफ, प्रकल्प सहसंचालक प्रदीप देसाई,अशोक आढाव, शोभा कारंडे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरवातीला प्रतिभा शिंदे यांनी प्रास्तविक करून ही बैठक का बोलावली आहे हे सांगितले. वैयक्तिक आणि सामूहिक प्रश्न समजून घेणे. काम करणाऱ्या सर्व संस्था संघटनांची व्यापक आघाडी करणं आणि हा प्रश्न पुढे घेऊन जाणं हा बैठकीचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ संपत देसाई म्हणाले की प.महाराष्ट्र आणि कोकण विभागात वन हक्काचे वैयक्तिक आणि सामूहिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रशासनाकडून त्याला म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात तर एकही कम्युनिटी फॉरेस्ट राईटच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. बेळगाव परिसरात वन हक्काचे दावे मराठी भाषिक लोकांचे असल्याने कानडी प्रशासकीय अधिकारी मदत करत नाहीत. यासंदर्भात चर्चा होऊन आपण काहीतरी ठरवण्यापर्यंत जायला हवे.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी आपण याबाबत वन मंत्री यांच्यासोबत बोलतो, स्थानिक आणि धोरणात्मक प्रश्न वेगळे काढून दोन वेगवेगळ्या बैठका घेऊ असे म्हणून त्यांनी ताबडतोब सुटणारे प्रश्न सोडवण्यासाठी बैठकीतूनच पुणे विभागीय आयुक्तांना फोन करून दहा पंधरा दिवसात बैठक लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर वन मंत्री यांच्याशीही संपर्क करून बैठक बोलवावी असे सांगितले.
जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री यांनी या प्रश्नी विशेष लक्ष घातल्याने वन हक्काचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता तयार झाली आहे.
यावेळी अशोक आढाव, राजेंद्र कांबळे, प्रकाश मोरुस्कर, किरण लोहकरे, शोभा कारंडे, नामदेव गंभीरे, मनीषा पाटील यांनीही अनेक सूचना मांडल्या. यावेळी प.महाराष्ट्र, कोकण आणि अहिल्यानगर विभागातील पन्नास हुन अधिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.