Homeकोंकण - ठाणेराज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता.🟣...

राज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता.🟣 उद्योगमंत्री उदय सामंत चौथ्यांदा ‘शिवतीर्थ’वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट; चर्चांना उधाण

🟣 राज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता.
🟣 उद्योगमंत्री उदय सामंत चौथ्यांदा ‘शिवतीर्थ’वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट; चर्चांना उधाण

मुंबई – प्रतिनिधी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (मंगळवारी) मुंबई,पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईला आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार)साठी ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण कोकणामध्येही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा ॲलर्ट देण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस आज (मंगळवारी ता 13 मे) अंदमान – निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्या भागात जोरदार पाऊस सुरू झाला असून पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही येईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चोवीस तासांत निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे त्या ठिकाणी अवघ्या काही तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने काल (सोमवारी) दिला. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात सोमवारी (दि.12 मे) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

तसेच, 13 आणि 14 मे रोजी राज्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह वळीवाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील कोकण-गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे वाहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. कोकण-गोव्यात मंगळवारी (ता. 13 ) आणि बुधवारी (ता. 14 ) हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. पुणे आणि घाट विभाग, कोल्हापूर आणि घाट विभाग, सातारा, सांगली, बीड, धाराशीव येथे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.

🟣 उद्योगमंत्री उदय सामंत चौथ्यांदा ‘शिवतीर्थ’वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट; चर्चांना उधाण

मुंबई – प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकारणात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडत आहेत. अलीकडेच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या त्यातच मंत्री उदय सामंत हे आज सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले. सामंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. गेल्या काही दिवसांतील उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ही चौथी भेट आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि मनसे यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र राज ठाकरेंसोबतच्या भेटीत राजकीय नाही तर इतर विषयांवर चर्चा झाली असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात सामंत म्हणाले की, सकाळी या भागात काही कामानिमित्त आलो होतो. त्यावेळी मी स्वत: राजसाहेबांना फोन करून भेटीची विनंती केली. त्यानंतर इथं आलो. राज ठाकरेंशी गप्पा मारल्यानंतर अनेक विषय कळतात. मुंबईच्या विकासाबाबत चर्चा होते. जी काही चर्चा झाली. त्यात पुढे कसे जायचे त्यावर विचार केले जातात. त्याशिवाय तुमच्या मनात जे इतर राजकीय शंका आहे. त्यावर कसलीही चर्चा झाली नाही.

चहा प्यायलो, खिचडी खाल्ली आणि निघालो. मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाली असती तर तसे जाहीर करायला काही हरकत नव्हती. माझी ही चौथी भेट आहे. त्याचे उत्तर जे पहिले दिले तेच आज उत्तर आहे असं सांगत सामंत यांनी राज भेटीतील चर्चेवर फार भाष्य करणे टाळले. उदय सामंत राज ठाकरे भेटी दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे उपस्थित होते. ते म्हणाले, उदय सामंत जे बोलले तेच खरे आहे. ते या विभागातून जात असताना त्यांनी स्वतः राज ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. सोबत चहा घेतला. खिचडी खाल्ली. बाकी दुसरे काही नाही. मी पण उदय सामंत यांच्याकडे चहासाठी जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.