Home कोंकण - ठाणे सावडाव विनयभंग वमारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाही.( शिवसेना उबाठा...

सावडाव विनयभंग वमारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाही.( शिवसेना उबाठा शिष्टमंडळाने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नांची केली सरबत्ती.🛑प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून घेत संपवले जीवन🟥दोन चिमूरड्यांसह विवाहितेची आत्महत्या प्रकरणी नवरा, सासू-सासरे, नणंदेवर गुन्हा दाखल.🟥अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार.- आरोग्य खात्याचा मोठा निर्णय! ना. आबिटकर🟥अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू.- पीसीएम गटातून चार लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा!

Oplus_131072

🟥सावडाव विनयभंग व
मारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाही.
( शिवसेना उबाठा शिष्टमंडळाने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नांची केली सरबत्ती.
🛑प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून घेत संपवले जीवन
🟥दोन चिमूरड्यांसह विवाहितेची आत्महत्या प्रकरणी नवरा, सासू-सासरे, नणंदेवर गुन्हा दाखल.
🟥अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार.- आरोग्य खात्याचा मोठा निर्णय! ना. आबिटकर
🟥अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू.- पीसीएम गटातून चार लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा!

🟥सावडाव विनयभंग व
मारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाही.
( शिवसेना उबाठा शिष्टमंडळाने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नांची केली सरबत्ती.

कणकवली :- प्रतिनिधी.

Oplus_131072

राणे समर्थक दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावडाव गावातील सामाजिक कार्यकर्त्या नयना सावंत यांना मारहाण करून विनयभंग केला तसेच त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत यांच्या गुप्तांगावर धारधार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला या घटनेला ५ दिवस उलटले तरी देखील अद्यापर्यंत कणकवली पोलिसांनी राणे समर्थक दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केलेली नाही.

त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने सावडाव मधील ग्रामस्थांसमवेतआज कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांना याबाबत जाब विचारला. पोलिसांच्या कारभाराची लक्तरे यावेळी काढण्यात आली. आरोपींना तात्काळ अटक करा, जिल्ह्याची बदनामी होत आहे. अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने पोलिसांना दिला.


वैभव सावंत व नयना सावंत दाम्पत्याला मारहाण करणारे राणे समर्थक दत्ताराम काटे हे मोकाट फिरत आहेत. त्यांना अटक का करण्यात आली नाही. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? सावंत दाम्पत्याला अमानुषपणे मारहाण होऊन देखील पोलिसांनी दत्ताराम काटे व अन्य जणांच्याविरोधात ३०७ कलम का लावले नाही? अशी विचारणा शिवसेनेच्या नेत्यांनी केली असता उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांनी सावंत यांना किरकोळ जखम झाली असल्याबाबतचा वैद्यकीय अहवाल आल्याचे सांगितले. गुप्तांगावर गंभीर जखम होऊनही किरकोळ जखम झाल्याचे सांगण्यात आल्याने वैभव नाईक शिवसेना पदाधिकारी यावेळी चांगलेच संतप्त झाले. वैभव सावंत मरता मरता वाचले आहेत मात्र पोलिसांना हे प्रकरण लफादफा करायचे आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
दत्ताराम काटे सापडत नाहीत असे उत्तर श्री आढाव यांनी दिल्याने कणकवली पोलीस स्टेशन मध्ये दत्ताराम काटे येऊन गेले. तेव्हा त्यांना का पकडण्यात आले नाही. कणकवलीतील एका वकीलाकडे देखील अटकपूर्व जामिनासाठी दत्ताराम काटे येऊन गेले ते आम्हाला कळाले मग पोलिसांना का कळाले नाही. पोलिसांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बीड करायचा आहे का? सावंत दाम्पत्याला पोलीस न्याय केव्हा मिळवून देणार? महिलांच्या सुरक्षेसाठी ११२ डायल सेवा व दामिनी पथके स्थापन केली आहेत. सावडाव मारहाणी वेळी देखील ११२ वर तक्रार करण्यात आली होती मात्र पोलिसांकडून अपेक्षित कारवाई केली गेली नाही. पोलिसांकडून महिलांना खरोखरच न्याय मिळणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे होत राहिले तर ११२ वर कोणच तक्रार करणार नाहीत. जिल्ह्यात पुन्हा राजकीय दशहत वाढू लागली आहे ही दहशत पोलीस मोडीत काढणार आहे की नाही नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे. अशा प्रश्नांची सरबत्ती शिवसेना पक्षाचे नेते, पदाधिकारी व सावडाव ग्रामस्थांनी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यावर केली.सावंत दाम्पत्याला मारहाण करणारे मोकाटपणे फिरत आहेत, हे पोलिसांचे अपयश आहे, दत्ता काटे व अन्य जणांनी गावात दहशत माजवली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सावंत दाम्पत्याला कशाप्रकारे अमानुषपणे मारहाण केली याची वसुस्थिती प्रत्यक्षदर्शी असलेल्या ग्रामस्थांनी कथन केली. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावापोटी याप्रकरणी पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप सावडाव ग्रामस्थांनी केला. सावडावातील पोलीस पाटील काही कामाचा नाही, त्याची आरोपींना साथ आहे त्यांच्यावर देखील कारवाई करा असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.

सावडाव विनयभंग व मारहाण प्रकरणातील आरोपींवर ३०७ कलम लावून त्यांना तात्काळ अटक करावी,अन्यथा दोन दिवसांत शिवसेनेकडून कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावर याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन श्री आढाव यांनी दिले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख डाॅ. प्रथमेश सावंत, राजू राठोड, बंडू ठाकूर, संदीप कदम,महेश कोदे, वैदेही गुडेकर,माधवी दळवी, संजना कोलते, धनश्री मेस्त्री, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, रुपेश आमडोसकर, तेजस राणे, गुरू पेडणेकर,सिद्धेश राणे,रोहित राणे, आबू मेस्त्री पराग म्हापसेकर आदींसह शिवसैनिक व सावडाव ग्रामस्थ सुलक्षणा नरसाळे, सुनीता वारंग, नम्रता नरसाळे, वनिता मेस्त्री, सुर्वणा तेली, सुरेखा मोरे, जयवंत वारंग, संतोष तेली, अजय जाधव, संदीप वारंग, सुरेश मोरे आदी उपस्थित होते.

🛑सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून घेत संपवले जीवन

सोलापूर :- प्रतिनिधी.

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवलं आहे. त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेत जीवन संपवलं आहे. या घटनेमुळं सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरातील नामांकित रुग्णालय वळसंगकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अज्ञात कारणावरुन रात्री 8.30 च्या सुमारास स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली. यानंतर गोळीचा आवाज येताच बेशुद्धवस्थेत असलेल्या डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत गंभीर जखमी असल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांना मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.

🟥दोन चिमूरड्यांसह विवाहितेची आत्महत्या प्रकरणी नवरा, सासू-सासरे, नणंदेवर गुन्हा दाखल.

देवगड :- प्रतिनिधी

तिर्लोट आंबेरी येथील विवाहिता शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल (२४) हिला शिवीगाळ व मानसिक त्रास देऊन तिला तिच्या दोन्ही लहान मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुरज सुहास भाबल (३७), सासरे सुहास शिवराम भाबल (७७), सासू सुहासिनी सुहास भाबल (६५) व नणंद सौ. पूजा सदाशिव जोगल (३०, मिठबाव, पूर्वाश्रमीची पूजा भाबल) या चौघांविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी श्रीशाच्या पतीसह सासू सासरे या संशयितांना विजयदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत श्रीशाची आई श्रीमती चंद्रकला लोकेश कुमार (३८, सध्या रा. अंबरनाथ (प.) ठाणे, मूळ रा. रायचूर कर्नाटक) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
या घटनेप्रकरणी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकाला भेट देऊन योग्य तपासाबाबत सूचना केल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीशा हिचे २२ जून २०१८ रोजी तिर्लोट आंबेरी येथील सुरज भाबल याच्याशी लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून तिचे सासरे सुहास भाबल, सासू सुहासिनी भाबल, नणंद पूजा भाबल व पती सुरज हे चौघे तिला मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करीत होते. ‘तू आमची चांगली सेवा करीत नाही. आमची पहिली सून आमची चांगली सेवा करायची. तू चांगली नाहीस’, असे टोचून बोलून शिवीगाळ व मानसिक त्रास देऊन तिला अनावश्यक कामे करायला सांगून शारिरीक त्रास दिला जायचा. तिचा पती सूरज हादेखील श्रीशा हिचीच चूक काढून तिला शिवीगाळ करीत असे. तर तिची नणंद पूजा ही त्यांच्या घरी जायची तेव्हा तीही श्रीशाला शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून श्रीशाने यापूर्वीही दोनवेळा जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्या मुलांकडे पाहून तिने जीव दिला नाही, असे श्रीशाच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून ‘संसारात अशा लहानमोठ्या गोष्टी होत असतात. त्याकडे आपण दुर्लक्ष करून संसार करायचा असतो’, असे सांगून आपण श्रीशाची समजूत काढत होतो, असेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
🟥१५ एप्रिल २०२५ रोजी श्रीशाने सासूच्या मोबाईलवरून तिच्या आईला फोन करून तिला संशयितांकडून केल्या जाणाऱ्या मानसिक व शारिरीक त्रासाची माहिती दिली होती. तिच्या आईने त्याचदिवशी सायंकाळच्या सुमारास पुन्हा श्रीशाची मोबाईलवरून संपर्क साधून समजूत काढली होती. मात्र, ‘आतापर्यंत मी खूप त्रास सहन केलेला आहे. मला समजून घेणारे कोणीच नाही’, असे सांगून श्रीशाने फोन कट केला होता, असे तिच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सासरच्या संशयितांनी श्रीशाला मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तिला जगणे असह्य झाल्याने तिने १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.४५ वा. ते १६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. च्या मुदतीत आपले मुलगे श्रेयश (वय ५) व दुर्गेश (वय ४) यांना सोबत घेऊन तिर्लोट आंबेरी पूलावरून खाडीच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली, असे श्रीशाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार विजयदुर्ग पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास विजयदुर्गचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हवालदार प्रशांत जाधव करीत आहेत.

🟥अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार.- आरोग्य खात्याचा मोठा निर्णय! ना. आबिटकर

मुंबई :- प्रतिनिधी.

महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर घेतला. या बैठकीस आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दयानंद जगताप, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, सहायक संचालक डॉ. रविंद्र शेटे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान मंत्री आबिटकर यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1792 वरून 4180 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे त्यांनी आदेश दिले. या योजनेतील उपचार संख्येत वाढ, दरामध्ये सुधारणा, अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणे, तसेच प्राथमिक आरोग्य सेवाही योजनेत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री आबिटकर यांनी यावेळी संबंधितांना दिले.

🟥अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू.- पीसीएम गटातून चार लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा!

मुंबई – प्रतिनिधी

एमएचटी सीईटीच्या दुसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची परीक्षा १९ एप्रिलपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. ही परीक्षा १८१ केंद्रांवर होणार असून यापैकी नऊ केंद्रे महाराष्ट्राबाहेर आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कृषी आणि औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच पीसीबी गटासाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा २ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी दिली.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच पीसीएम गटासाठी प्रवेश परीक्षा १९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये पुण्यामधून सर्वाधिक ५७ हजार ४२५ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल मुंबईतून ३९ हजार ५५५, नागपूरमधून ३० हजार ५०३ आणि नाशिकमधून २९ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून कमी अर्ज आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ हजार २७९ अर्ज आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून पीसीएम गटासाठी ३ हजार ३८, तर रायगड जिल्ह्यातून ५ हजार ५६५ अर्ज आले आहेत. पीसीएम गटासाठी महाराष्ट्र वगळता अन्य राज्यातून ३० हजार ८९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. नवी दिल्लीतून सर्वाधिक ५ हजार ८८३ अर्ज आले आहेत. तर सर्वात कमी २८६ अर्ज पणजीमधून आले आहेत. ही परीक्षा १८१ केंद्रांवर होणार असून यातील नऊ केंद्र राज्याबाहेर आहेत
.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या पीसीएम गटातील परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनेनुसार प्रवेशद्वार बंद होण्यापूर्वी उमेदवाराने सीईटी परीक्षा केंद्रात पोहोचावे. प्रवेशद्वार बंद झाल्यानंतर उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्रावर दिलेल्या वेळेच्या ३० मिनिटे आधी उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी हजर राहावे. सोबत प्रवेशपत्रासह अधिकृत ओळखपत्र आणावे. प्रवेशपत्रात दर्शविलेले नाव आणि छायाचित्र यामध्ये काही तफावत आढळल्यास परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रवेश पत्रावरील सर्व सूचनांचे कोटेकाेरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.