Home कोंकण - ठाणे आपले सरकार पोर्टलवर सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई केल्यास प्रशासकिय विभागप्रमुखाला दरदिवशी १...

आपले सरकार पोर्टलवर सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई केल्यास प्रशासकिय विभागप्रमुखाला दरदिवशी १ हजार रुपये दंड.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश💥खाकीतली माणुसकी.- भरउन्हात रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध आजीला परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी गाडी थांबवून दिला मदतीचा हात.🟥दामिनी पथक डायल ११२ प्रमाणे कार्यान्वित होणार.- पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल.

Oplus_131072

🟥आपले सरकार पोर्टलवर सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई केल्यास प्रशासकिय विभागप्रमुखाला दरदिवशी १ हजार रुपये दंड.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
💥खाकीतली माणुसकी.- भरउन्हात रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध आजीला परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी गाडी थांबवून दिला मदतीचा हात.
🟥दामिनी पथक डायल ११२ प्रमाणे कार्यान्वित होणार.- पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल.

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत 1027 सेवा अधिसूचित केल्या आहेत. त्यापैकी 527 सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभागप्रमुखाला दरदिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध सामाजिक क्षेत्रांची वॉररुम बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन, अॅग्रीस्टॅक उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला. राज्यातील नागरिकांना पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आपले सरकार पोर्टलवर विविध विभागांच्या 138 इंटिग्रेटेड सेवा 31 मे 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच उर्वरित 306 अधिसूचित सेवा 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कराव्यात. याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दरदिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याची कारवाई करण्यात यावी. यासंदर्भात मुख्य सचिवांनी परिपत्रक काढावे, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत.

सेवा हक्क अधिनियमासंदर्भात पुढील प्रक्रिया राबविताना कोणकोणत्या नवीन सेवा अधिसूचित करता येतील, याबाबत 15 सप्टेंबरपर्यंत माहिती द्यावी. सेवा ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही ‘महाआयटी’ने करावी. एका अर्जाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेता यावा यादृष्टीनेही प्रक्रियेत बदल करावा. ऑक्टोबरपर्यंत जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आपला महाराष्ट्र देशात अव्वल व्हावा यादृष्टीने प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

💥खाकीतली माणुसकी.- भरउन्हात रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध आजीला परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी गाडी थांबवून दिला मदतीचा हात.

जालना :- प्रतिनिधी.

पोलिसांची खाकी वर्दी नेहमीच टीकेची धनी होते मात्र प्रत्येक पोलीसवाल्यांमध्ये एक माणूस दडलेला असतो. खाकी वर्दीत असलेल्या माणुसकीचं दर्शन आज जालना – परभणी रोडवर पाहायला मिळालं. परभणीच्या पोलीस अधीक्षकांची गाडी छ. संभाजीनगरवरून परभणीकडे जात असताना त्यांना भरउन्हात वृद्ध आजी काटी टेकवत टेकवत जात असल्याचं दिसले. त्यानंतर, एसपी साहेबांनी आपली गाडी थांबवून त्या आजीबाईंना मदत करत रुग्णालयात पाठवलं.
परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहुन शासकीय कामकाज आटोपून अंबड-घनसावंगी मार्गे परत परभणीकडे जात होते. अंबड शहरापासून काही अंतरावर असलेल्या घनसावंगी फाट्यावर त्यांना भर उन्हात एक 80 ते 90 वर्षे वयोगटातील वृद्ध आजी दिसली. वार्धक्याने जर्जर झालेल्या आजीच्या पायातील चपलाही अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या, या वृद्ध आजीला वयोमानानुसार बोलताही येत नव्हतं. चालत्या वाहनातून पोलीस अधीक्षक परदेशी यांची त्या वृध्द आजीवर नजर गेली आणि त्यांनी वाहन थांबवले. आजीला स्वतःजवळ असलेले पाणी पाजून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत शेजारी असलेल्या झाडाखाली स्वतः हाताने आधार देत नेऊन बसवले. एवढेच नव्हे तर आजीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, काठी आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली नेऊन मदत केली.
त्यानंतर, पोलीस अधीक्षक परदेशी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना मोबाईलवरून संपर्क करून त्या आजीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठ अधिकारी परदेशी यांच्या सूचनेवरुन बारवाल यांनी तातडीने पोलीस हवालदार विष्णू चव्हाण आणि स्वप्नील भिसे यांना घटनास्थळी शासकीय वाहनातून पाठविले. पोलिसांचे वाहन येईपर्यंत घटनास्थळी असलेल्या पोलीस अधीक्षक परदेशी यांनी वृद्ध आजीला पोलीस वाहनात बसवून दिले. त्यानंतर ते परभणीकडे रवाना झाले. एसपी परदेशी साहेबांच्या माणुसकीचे दर्शन झाल्याने खाकी वर्दीतली माणूसकी पाहायला मिळाली. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाले असून परदेशी साहेबांच्या कृतज्ञता आणि संवेदनशीलतेचं कौतुक होत आहे.

🟥दामिनी पथक डायल ११२ प्रमाणे कार्यान्वित होणार.- पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल

कणकवली :- प्रतिनिधी.

सिंधुदुर्ग जिल्हा हा शांततामय जिल्हा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस दल नेहमीच सतर्क असतं. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील विविध समस्या सोडविणे, महिलांची सुरक्षितता यासारखे अनेक प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस दलातील स्थापित केलेले कक्ष सोडवत असतात. त्याच पार्श्वभूमीवर डायल ११२ प्रमाणे सेवा देण्यासाठी २०२३ साली दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली. दामिनी पथक डायल ११२ प्रमाणे कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनी किंवा महिला यांच्या असणाऱ्या समस्या किंवा एखादा प्रसंग ओढावला तर तात्काळ मदतीसाठी या दामिनी पथकाची मदत होणार आहे. त्यामुळे आता महिलांना घाबरून जाण्याची गरज नाही, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले.
कणकवली पोलीस ठाणे येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दला तर्फे कम्युनिटी पोलीसींग उपक्रमांतर्गत महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथक वाहनांचा अनावरण सोहळा व डाटा संग्रहित ठेवण्यासाठी टॅबचे वितरण आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिक्षक श्री. अग्रवाल बोलत होते.
पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते दामिनी पथकाच्या वाहनांची फित कापून अनावरण करण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ पोलीस ठाण्याच्या अमलदारांकडे प्रत्येकी एक प्रमाणे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान दामिनी पथकाच्या वाहनांचे अनावरण झाल्यानंतर कणकवली शहरात जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली होती.
यावेळी पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्ग चे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, मोटर वाहन उपनिरीक्षक सिंधुदुर्गचे प्रदीप चव्हाण, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, भरत धुमाळ, प्रवीण कोल्हे, संदीप भोसले, सुनील अवसरमोल, शेखर लव्हे, प्रदीप पोवार, वैशाली आडकुर, कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. ज्ञानेश सावंत, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, राजकुमार मुंढे, शरद देठे, मंगेश बावदाने, विनोद चव्हाण, राजाराम पाटील, सुभाष शिवगण, माजी नगरसेविका मेघा गांगण, हरिभाऊ भिसे, प्रा. विजयकुमार सावंत, प्रा. विजय सावंत, प्रा. श्री. कांबळे, प्रा. मीना म्हाडेश्वर, प्रा. वनिता सावंत, प्रा. वाळके, प्रा. सुषमा कांबळे, सौ. नाटेकर व कणकवली कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले म्हणाले, दामिनी पथक अनेक वर्षे कार्यरत आहे. महिलांना सुरक्षा आणि जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी दामिनी पथक नेहेमीच सतर्क असते. इतर जिल्ह्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोलिंग करताना बऱ्याच महिला रात्री ११ वाजता अगदी धाडसाने व बिनधास्त फिरतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापुढे सिंधुदुर्ग पोलीस दल महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार आहे. नागरिकांमध्ये एक भीती असते की एखादी माहिती पोलिसांना दिली, किंवा सांगितली तर आपलं नाव उघड होईल. परंतु असे होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग पोलीस दल खूप सतर्क आहे. गुप्त माहिती देणाऱ्यांची माहिती बाहेर दिली जात नाही, त्यामुळे कोणतीही माहिती देताना नागरिकांनी घाबरू नये. काही तक्रार असल्यास डायल ११२ वर फोन करून माहिती देऊ शकतात. तसेच दामिनी पथक पाठवण्याची सूचना देखील करू शकता. महिलांसाठी पोलीस पथकामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. दामिनी पथकातील पोलीस अंमलदार महिलांसाठी योग्य काम करतील, असा विश्वास अप्पर पोलीस अधिक्षक श्री. रावले यांनी दिला.
या कार्यक्रमावेळी उपस्थित कणकवली कॉलेजच्या प्रा. शीतल सावंत, प्रा. सुषमा कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रा. सुषमा कांबळे म्हणाल्या, पोलीस दलाने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समाजाला अशा उपक्रमांची गरज आहे. मुली किंवा महिला या घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांना असुरक्षितता वाटते. ही भीती पुसुन टाकण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाने एक पाऊल पुढे उचलले आहे. पोलीस दलाने निर्मित केलेलं दामिनी पथक हे महिलांच्या संरक्षणासाठी महत्वाचे ठरणार आहे.
या कार्यक्रमावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कणकवली पोलीस ठाण्याच्या पूजा नांदोस्कर, विनया सावंत, सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अलमेडा मॅडम, संजाली पवार यांचा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व अप्पर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.