तुमचे वन्य प्राणी तुम्ही सांभाळा. किंवा आमच्या जमिनी भाडेतत्त्वावर करायला घ्या- व धार्मिक कार्यात अडथळा निर्माण करु नये.
( शेतकरी न्याय हक्क संघर्ष समिती, आजरा यांचे वन विभागाला निवेदन. )
आजरा.- प्रतिनिधी.
शेतकरी न्याय हक्क संघर्ष समिती, आजरा. वतीने परिक्षेत्र वनाधिकारी वनविभाग आजरा.
यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हत्ती, गवे, रानडुक्कर, माकडे, ससे यासह इतर वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्याच्यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकाची नुकसान भरपाई अत्यंत जुजबी असून शंभर टक्के नुकसान धरून शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई मिळावी. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोस्तासारख्या धार्मिक परंपरेवर एक प्रकारे बंदी घातली असून शिमगा सनाच्या काळात ही बंदी शिथिल करणे याबरोबरच म्हसोबा, चाळोबा यासारखी बहुजनांची क्षेत्रापालक दैवते ही जंगल हद्दीत येतात, त्या त्या देवांच्या वार्षिक उत्सवासाठी यात्रेसाठी परवानगी मिळावी ५० हजारच्या आतील नुकसान भरपाई देण्याचे अधिकार परिक्षेत्र वनाधिकारी स्तरावर देऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी होणारा विलंब थाबविला पाहिजे. जंगल हद्दीलगत असलेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सौरउर्जा कुंपण मिळाले पाहिजे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मयत झाल्यास मिळणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने ती वाढवून दिली पाहिजे, पिकांची नुकसान करणारी रानडुकरे मारण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्याला आठ दिवसात परवानगी द्यावी. वन्य प्राण्यापासून शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत असून रात्री रखवालीला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीविताला धोका आहे. तरी शेती आणि आत्मसरंक्षणासाठी तातडीने बंदूक पर्वाने मिळाले पाहिजेत, आकेशिया, निलगिरी यासारख्या झाडांची मोठ्या प्रमाणत जंगलात लागवड केल्याने इथल्या जंगलाची जैव विविधता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. या झाडांची तोड करून वड, पिंपळ, ऐन, किंजळ, धामण यासारख्या स्थानिक प्रजातींची लागवड करण्याची मोहीम तातडीने हाती घेतली पाहिजे. गेली दहा वर्षाहून अधिक काळ जंगल समृध्दीकरणाचा पथदर्शी प्रकल्प राबवून जंगले समृध्द करणे हाच वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांच्या संघर्षावरचा कायमस्वरूपी ठोस उपाय आहे. तो हाती घेणे. (त्यामध्ये चराऊ क्षेत्र निर्माण करणे, स्थानिक प्रजातींची लागवड करणे, रानातील ओहळी जिवंत करणे, पाण्याची तळी जंगलात निर्माण करणे इत्यादी)
यासह अन्य मागण्यांच्या संदर्भात तातडीने वन विभागचे वनसरंक्षक व निर्णय घेऊ शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांसह तातडीने बैठक आयोजित करावी असे न केल्यास तीव्र आंदोलन करीत असलेबाबत विविध मागण्या मध्ये म्हटले आहे. तर गेली वीस वर्षाहून अधिक काळ शेतकरी आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष जीवघेणा बनला आहे. अनेक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. कित्येकजण आयुष्यभराचे अधू झाले आहेत. जंगली प्राणी शेतात घुसून पिकांची मोठ्याप्रमाणात नासधूस करीत आहेत. जंगलालगतच्या कांही शेतकऱ्यांनी तर शेतात पिक घेणेच बंद केले आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने दिली आहेत. मोर्चे, आंदोलने पण झाली आहेत. मुख्यवनसरंक्षक, उपवनसंरक्षक यांच्यासह अनेक बैठका पण झाल्या आहेत. पण त्यातून वरील प्रश्न सुटल्याचे दिसत नाही.
यापूर्वी मुख्य वनसरंक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्यासोबत बैठका होऊन कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करण्याचे ठरले पण कांहीच पुढे सरकत नाही. वरील प्रश्नातील कांही मुद्दे हे मुख्यवनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांच्या अधिकार कक्षेतील आहेत तर कांही मुद्दे हे धोरणात्मक आहेत. त्यासाठी दोन बैठका होणे आवश्यक आहे. मुख्यवनसरंक्षक आणि उपवनसंरक्षक यांचेसोबत प्राथमिक बैठक होऊन मंत्रालय स्तरावरील चर्चेसाठी टिपण तयार होणे आवश्यक आहे. तरी आपण याबाबत पुढाकार घेऊन वरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेच्या मनात याबाबत तीव्र असंतोष आहे याची कल्पना आपण आपल्या वरिष्ठांना द्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर कॉ संपत देसाई, संजय सावंत, राजू होलम, प्रकाश मोरुस्कर, कॉ शांताराम पाटील, दशरथ घुरे, कॉ संजय तर्डेकर, रवींद्र भाटले, बयाजी येडगे, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, भीमराव माधव , सुरेश पाटील, सुभाष देसाई, मारुती पाटील, जोतीबा चाळके, नारायण भडांगे, मुकुंद नार्वेकर, विलास जोशीलकर, बाळू जाधव, निवृत्ती फगरे उदय कोडक, गौरव देशपांडे सह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
