🛑प्रयागराजमधील – महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी.
१० जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी.
🛑चौपदरीकरणाच्या चार ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाची नोटीस.- गौण खनिज (काळा दगड) उत्खननाची रॉयल्टी थकवल्याचा फटका.
प्रयागराज :- वृत्तसंस्था.
उत्तरप्रदेश प्रयागराजमधील महाकुंभमध्ये आज बुधवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अमृतस्नानाआधी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. २८ जानेवारीला महाकुंभमध्ये एक कोटींहून अधिक जण दाखल झाल्याची माहिती होती. आज मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभमध्ये मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच आज ही मोठी दुर्घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संगमावर गर्दी होऊ नये यासाठी विविध घाटांवर भाविकांचं डायव्हर्जन करण्यात आलं होतं. मात्र सर्वांना संगमावरच स्नान करायचं असल्यानं भाविक त्या दिशेने जात होते. एकाच ठिकाणी जास्त गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. या घटनेनंतर जखमींना महाकुंभस्थित केंद्रीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अद्याप जखमींचा आकडा कळू शकलेला नाही. मात्र ही संख्या जास्त असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज मौनी अमावस्येला अमृतस्नान असल्याने 8-10 कोटी भाविक महाकुंभमध्ये पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, स्नान करणाऱ्या घाटावर हा अपघात घडला. ही घटना साधारण रात्री १.३० वाजेदरम्यान घडली. इतकी गर्दी झाली होती की, लोक एकमेकांच्या अंगावर होते. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. यादरम्यान आज आखाड्यांचा अमृतस्नान रद्द करण्यात आला आहे. आखाडा परिषदेने अमृतस्नान रद्द केलं आहे. आता सर्व 13 आखाड्यांचं अमृतस्नान रद्द झालं आहे.
🛑चौपदरीकरणाच्या चार ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाची नोटीस.- गौण खनिज (काळा दगड) उत्खननाची रॉयल्टी थकवल्याचा फटका
रत्नागिरी :- प्रतिनिधी.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांना गौण खनिज (काळा दगड) उत्खननाची रॉयल्टी थकवल्याचा फटका बसला आहे. या कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडुन सुमारे साडेनऊ कोटी एवढी रॉयल्टी (स्वामित्वधन) भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. गेली तेरा तो चौदा वर्षे झाली या महामार्गाचे काम सुरू आहे. याचे सहा टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचा ठेका दिला होता. त्यापैकी काही कंपन्यांनी काम सोडले, त्याच्याऐवजी दुसऱ्या कंपन्यांना काम दिले आहे. डिसेंबर 2025 महामार्ग पुर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य शासन या कामावर नजर ठेऊन आहे. त्यामुळे काही प्रमाणात कामाला गती मिळाली आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. काही टप्प्यातच हे काम शिल्लक असताना ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने दुसरा दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी अनेक कंपन्यांनी गौण खनिज उत्खननाची रॉयल्टीच भरली नसल्याचे पुढे आले आहे.

महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉय़ल्टी भरलेली नाही. त्यासाठी महसुल विभागाने कोल्हापूर येथील इलोक्टॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) कंपनीकडुन या उत्खननाचा सर्व्हे केला. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे. ईगल इन्फ्रा प्रा, लि (मकरंद गांधी) वांद्री (संगमेश्वर) येथे 51334 ब्रास जादा उत्खनन केले आहे. त्यामुळे त्यांना 3 कोटी 8 लाख रॉयल्टी भरावी लागणार आहे. चेतक इंटरप्रायझेस यांनी हडकरी (चिपळूण) येथे 2866 ब्रास उत्खनन केले आहे. 17 लाख रॉयल्टी भरावी लागणार आहे. रवी इन्फ्रा या कंपनाने वांद्री (संगमेश्वर) येथीर 58646 ब्रास उत्खनन केले असून 2 कोटी 32 लाख रॉयल्टी भरलेली नाही आणि जे एस म्हात्रे कंपनीने वांद्री (संगमेश्वर) येथे 66910 ब्रास काळ्या दगडाचे उत्खनन केल्यामुळे त्यांना 4 कोटी रुपये रॉयल्टी भरावी लागणार आहे. एकुण साडे नऊ कोटी रुपये रॉयल्टी या कंपन्यांकडुन येणे बाकी आहे.त्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कंपन्यांना नोटिस बजावली आहे.