🟥सोन्याच्या दराचा विक्रम.- तोळ्याचा भाव ८० हजारांवर!..
🛑एसटी राबविणार ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ.- सुंदर बसस्थानक अभियान.- विजेत्या बसस्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस..पहा.👇
नागपूर – प्रतिनिधी.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी एकाच दिवशी अनेक निर्णय घेतले. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर जाणवू लागला आहे. एकाच दिवसात सोने प्रती दहा ग्रॅम ८०० रुपयांनी तर चांदी प्रती किलो ३०० रुपयांनी महागली. सोन्याचे दराने विक्रमी झेप घेतली आहे. सोने प्रथमच ८० हजाराच्या पार गेले आहे. आज सोने प्रती दहा ग्रॅम ८० हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे. जीएसटीसह एका तोळ्यासाठी आता ८२ हजार ८१२ रुपये मोजावे लागणार आहेत.
गेल्या २२ दिवसांत ३ हजार ५०० रुपयांनी सोने वाढले आहे. चांदीच्या दरातही एका दिवसात ३०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ९२,२०० रुपयांवर गेली. सन २०२४ मध्ये दिवाळीला सोन्याचे जीएसटीविना दर ८० हजार रुपये आणि चांदीचे प्रतिकिलो दर ९७ हजार ५०० रुपयांवर होते.
अमेरिकेच्या निर्णयामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. याशिवाय इतरही कारणामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. याशिवाय डॉलरचे दरही वाढत आहेत.
💥सोने जाणार एका लाखावर!
जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याला चमक आलेली आहे. ही चमक अजून वाढणार आहे. सोने अंदाजे प्रती दहा ग्रॅम एक लाखाचा आकडा पार करणार आहे. चांदी प्रती किलो एक लाखावर पोहचली आहे. सोन्याचे दर कमी झाल्यास ती खरेदीची संधी समजून सोने खरेदी करावे, असा सल्ला जेम्स ॲण्ड ज्वेलरी कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिला आहे.
🛑एसटी राबविणार ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर बसस्थानक अभियान.- विजेत्या बसस्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस
मुंबई :- प्रतिनिधी.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातील एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात ‘अ’ वर्गात पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येणार आहे.
एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान राबविणार येणार असून या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर होणार आहे. यानिमित्ताने राज्यभर प्रत्येक बस स्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बस स्थानक, तसेच निर्जंतुकीकरण, टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे. तसेच ‘आपलं गाव, आपलं बस स्थानक’ या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बस स्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य गाभा राहणार आहे. कोणतेही बस स्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते.
त्या अर्थाने बस स्थानक हे त्या गावची शान असल्यामुळे गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बस स्थानकाच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यंयीकरणासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर ३ महिन्यांनी प्रत्येक बस स्थानकाचे मूल्यमापन करण्यात येईल. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बस स्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या सर्व बस स्थानकांचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी ‘अ ‘ वर्ग, निमशहरी ‘ब’ वर्ग व ग्रामीण ‘क’ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केली आहे. प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिल्या आलेल्या बस स्थानकाचा विचार केला जाणार आहे. राज्यपातळीवर ‘अ’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बस स्थानकाला १ कोटी रुपये, ‘ब’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बस स्थानकाला ५० लाख रुपये, तर ‘क’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बस स्थानकाला २५ लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.
