एच.एम.पी.व्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नाही.- घाबरून जावू नये.- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले आवाहन.
मुंबई.- प्रतिनिधी.
एच.एम.पी.व्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नसून २००१ पासून प्रचलित आहेत. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.
पत्रकार परिषदेला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ निपुण विनायक, सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या याबाबतीत येत असलेल्या दिशा निर्देश आणि मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या आजाराबाबत कोणीही अफवा पसरवू नये. नागरिकांनी वस्तुस्थिती लक्षात घेत अफवांवर विश्वास ठेवू नये. लहान मुले, वयोवृद्ध, दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. आजाराच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाचे संपूर्ण पथक कार्यरत असून लवकरच विशिष्ट कार्यपद्धती जाहीर करण्यात येईल. राज्यात आरोग्य विभागाची चांगली व्यवस्था असून यंत्रणा सज्ज आहेत. असे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.