🔴कांदिवलीत महिलांसाठी फिरते स्नानगृह.- भारतातील पहिलेच मोबाइल बाथरूम!.
🟥अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात!
मुंबई :- प्रतिनिधी.
कांदिवली पूर्व येथे हनुमान नगर परिसरात महिलांसाठी फिरते स्नानगृह तयार करण्यात आले आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदर स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. झोपडपट्टीमधील भगिनींना सदर स्नानगृहांचा फायदा होणार आहे.
🟥झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक असते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी फिरते स्नानगृह असावे यासाठी कार्य सुरू केले होते. या संकल्पनेनुसार कांदिवलीत पहिले फिरते स्नानगृह सुरू करण्यात आले आहे. मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत बुधवारी कांदिवली पूर्व येथे भारतातील पहिल्या अत्याधुनिक फिरत्या स्नानगृहाचे उदघाटन करण्यात आले.
🅾️यावेळी बोलताना लोढा म्हणाले, ” जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे. यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत. इतर ठिकाणी सुद्धा हा प्रकल्प राबवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कांदिवली विधानसभा क्षेत्रात १२ तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरता येणार आहे.
🔴कसे आहे फिरते स्नानगृह.
🔺एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले स्नानगृह उभारण्यात आले आहे.
🔺या बसमध्ये एकूण ५ स्नानगृहे, शॉवर आहे. २१०० लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे, बेसिन आणि इतर आवश्यक सुविधा आहेत.
🔺या बसमध्ये कपडे वाळवण्यासाठी २ ड्रायर मशीनही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी येथे जनरेटर्सचा वापर करण्यात येणार आहे.
🔺पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी, तसेच योग्य नियोजनातून सर्वांना स्नानगृहाचा वापर करता यावा यासाठी तेथे महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. – प्रत्येक महिलेला स्नानासाठी ५ ते १० मिनिटे वेळ दिला जाईल आणि वेळ झाल्यावर पाणीपुरवठा बंद होणार आहे.
🟥अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात!
मुंबई – प्रतिनिधी.
जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेले सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयाने १५ जानेवारी रोजी प्रकरणाची इन-कॅमेरा सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केल्यानंतर निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दिलासा न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन देण्याच्या मागणीसाठी याचिका केली आहे. न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या एकलपीठासमोर बुधवारी या प्रकरणी इन-कॅमेरा सुनावणी झाली. त्यानंतर, न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी १५ जानेवारी रोजी ठेवली आहे.
🔴निकम यांनी वकील वीरेश पुरावंत यांच्यामार्फत ही याचिका केली असून त्यात आपण निर्दोष असल्याचा आणि या प्रकरणात आपल्याला गुंतवण्यात आल्याचा दावा केला आहे. एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा विचार करता त्यात आपण लाचेची थेट मागणी केल्याचे किंवा पैसे स्वीकारल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. तसेच, आपल्याला तक्रारदार आणि इतर आरोपींमधील भेटींची किंवा तक्रारदार जामीन मागणाऱ्या आरोपीशी संबंधित होता याची माहिती नव्हती. याउलट, प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) नमूद तारखांना आपण रजेवर होतो किंवा प्रतिनियुक्तीवर होतो. त्यामुळे, आपल्यावरील आरोप संशयास्पद असल्याचा दावाही निकम यांनी याचिकेत केला आहे.
🅾️पुणे येथील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून निकम यांच्यासह आनंद मोहन खरात, किशोर संभाजी खरात आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रारदार तरुणीचे वडील एका गुन्ह्यात सातारा जिल्हा कारागृहात बंदिस्त आहेत. त्यांच्या जामिनावर निकम यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. संशयित आनंद व किशोर खरात यांनी जिल्हा सत्र न्यायाधीशांशी संगनमत करून एका अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून जामीन मिळवण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार ३, ९ आणि १० डिसेंबर रोजी घडला, असा दावा तरुणीने तक्रारीत केला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे एसीबीने म्हटले होते. परंतु, आपण जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे टाळले किंवा अनुकूल आदेश देण्याचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. तसेच, नमूद कालावधीत कोणत्याही जामीन अर्जावर आपल्याकडून आदेश देण्यात आले नव्हते, असा दावा निकम यांनी याचिकेत केला आहे.