🛑सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांनी शासनाच्या मदतीचा धनादेश नाकारला..
🔴ठाकूर बंधुंच्या निवासस्थानी ईडीचा छापा.- ताडोबा ऑनलाइन बुकींग घोटाळ्यातील.
🛑डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे नवे प्रमुख.- १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार!
🟥रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू!..
🛑दाभोलकर हत्या प्रकरण.- आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप!..
परभणी :- प्रतिनिधी.
न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देऊ केलेली १० लाखांची मदत नाकारली आहे. धनादेश देण्यासाठी तहसील कार्यालयाचे पथक मृत सोमनाथ सुर्यवंशीच्या घरी पोहोचले असता त्याच्या कुटुंबीयांनी हा धनादेश नाकारला आहे. तर सुर्यवंशी कुटुंबियांनी महायुती सरकारच्या भुमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोरील भारतीय संविधान प्रतिकृतीची एका व्यक्तीने विटंबना केल्याची घटना घडली. त्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने मुख्य बाजारपेठ भागात दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या, रास्तारोको केला. त्यानंतर दुसर्या दिवशी आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले.
पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांविरूद्ध कारवाईच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. विधानसभा अधिवेशनादरम्यान हा मुद्दा विरोधकांनी लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या निलबंनाची घोषणा केली. देशपातळीवरील नेत्यांपासून आंबेडकरी चळवळीतील देशभरातील लोकप्रतिनिधींनी सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील परभणीत येऊन सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन शासनाकडून भरीव आर्थिक मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
यासोबतच काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर, भीम आर्मीचे खा.चंद्रशेखर आझाद यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. या मंडळींनी परभणीत येऊन सुर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी या मंडळींसह शासनाचे प्रतिनिधी म्हणून भेटायला आलेल्या अनेकांनी सुर्यवंशी कुटुंबियांच्या म्हणणे ऐकून घेतले. सोमनाथच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी आणि कुटुंबास किमान ५० लाखांची मदत मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली होती. त्यावर प्रतिसाद देत मदतीचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात शासनाकडून याबाबत अजून कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याचे सुर्यवंशी कुटुंबियांचे म्हणणे आहे. दरम्यान, या कुटुंबियांनी अकोला येथे जाऊन अॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेऊन आपली मागणी पूर्ण झाली नसल्याची तक्रार केली.
🔴ठाकूर बंधुंच्या निवासस्थानी ईडीचा छापा.- ताडोबा ऑनलाइन बुकींग घोटाळ्यातील.
चंद्रपूर – प्रतिनिधी.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली १२ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुख्य आरोपी रोहित व अभिषेक बबलू ठाकूर यांच्या सरकारनगर येथील बंगल्यावर तसेच सर्व प्रतिष्ठानवर एकाचवेळी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी पहाटे चार वाजता छापे टाकल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, यावेळी ठाकूर बंधू बाहेरगावी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी प्रकल्पात ऑनलाईन तिकीट विक्रीत १२ कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचे ताडोबा प्रकल्पाचे संचालक तथा मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणी डॉ. रामगावकर यांच्या तक्रारीवरून. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. तिथे न्यायालयाने ठाकूर बंधू यांना पैसे जमा करण्यास सांगितले होते. तेव्हा ठाकूर यांनी २ कोटी ४१ लाख रुपये जमा केले आहेत.
१२ ऑक्टोबरपर्यंत ३ कोटी रुपये जमा करण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ठाकूर बंधूंनी उर्वरित ३ कोटी रुपये जमा करण्यासाठी पुन्हा मुदत मागितली होती. दरम्यान हे प्रकरण सुरू असतानाच सक्त वसुली संचालयाने बुधवारी पहाटे ठाकूर बंधू यांच्या सरकारनगर येथील निवासस्थानी तसेच स्वाद हॉटेल, पेट्रोल पंप व बेकरी तसेच इतर प्रतिष्ठान येथे छापे टाकले. कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. नागपूर येथून पाच ते सहा इनोव्हा गाडीत हे पथक येथे दाखल झाले असून २५ अधिकाऱ्यांची टीम असल्याचे सांगण्यात येत आहे.
🛑डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे नवे प्रमुख.- १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार!
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे (ISRO) नवे प्रमुख म्हणून डॉ.व्ही.नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ.व्ही.नारायणन हे इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ.एस. सोमनाथ यांच्याकडून इस्रोचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. डॉ.व्ही.नारायणन हे सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (LPSC) चे संचालक आहेत. डॉ.एस. सोमनाथ हे त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून १४ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर आता डॉ.व्ही.नारायणन यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे.
डॉ.व्ही.नारायणन यांनी भारतीय अंतराळ संस्थेत (इस्रो) विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरच्या संचालक पदाच्या संपूर्ण कार्यकाळात डॉ.व्ही.नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोच्या विविध मोहिमांसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स आणि कंट्रोल पॉवर प्लांट्स वितरित करण्यात आले आहेत. डॉ.व्ही.नारायणन हे इस्रोमधील जेष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी जवळपास चार दशके इस्रोत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे.
तसेच रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन यामध्ये ते तज्ञ आहेत. त्यांनी GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचं प्रकल्प संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली C25 स्टेज यशस्वीपणे विकसित केलं गेलं. या बरोबरच डॉ.व्ही.नारायणन यांनी आदित्य अंतराळयान आणि GSLV Mk-III मिशन्स आणि चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ च्या मोहिमेमध्ये देखील त्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील त्यांचं योगदान अतुलनीय असून त्यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता इस्रोला पुढे जाण्यास महत्वाची ठरणार आहे.
🔴अनेक पुरस्कारांनी सन्मानित
डॉ. व्ही.नारायणन यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना आयआयटी खरगपूरकडून रौप्य तर ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने (ASI) त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवलेलं आहे. तसेच एनडीआरएफकडून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.
🟥रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू!..
अलिबाग – प्रतिनिधी.
रायगड जिल्ह्यात वर्षभरात ७३२ रस्ते अपघातांची नोंद झाली. ज्यात २६६ जणांचा मृत्यू झाला. तर ६२४ जण गंभीर जखमी झालेत. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असले तरी अपघातात मृत्यु होणाऱ्यांची संख्या घटली आहे. जखमींच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोकणातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होणारी अवजड वाहतूक, वाहनचालकांची बेपर्वाई आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष ही अपघतांमागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे.
🟣रायगड जिल्ह्यातून सात प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. यात मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६, मुंबई पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबई पुणे महामार्ग क्रमांक ४ या वडखळ अलिबाग महामार्ग, दिघी माणगाव ताम्हाणी घाट महामार्ग, खोपोली वाकण आगरदांडा महामार्ग आणि पेण खोपोली महामार्ग या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. सातही महामार्गांचा विचार केल्यास मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण उर्वरीत महामार्गांच्या जास्त आहे.
🅾️जिल्ह्यात वर्षभरात मुंबई गोवा महामार्गावर १५४ अपघात झाले यात ६१ जणांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे दृतगती मार्गावर ११८ अपघात झाले. यात ४१ जणांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर ७६ अपघातांची नोंद झाली ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के या तीन महामार्गावरच होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रस्ते अपघात रोखण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.
🅾️अपघातांची कारणे….
अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, तीव्र उतार, चुकीच्या आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा हि अपघातामांगची प्रमुख कारणे आहेत. तर दृतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाडांचे टायर फुटणे हि अपघातां मागणी प्रमुख कारणे आहेत. या शिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकींग करणे यामुळेही अपघात होत आहेत. मुंबई पुणे दृतगती मार्गावर ट्रक चालकांकडून घाट उतारावर वाहने न्यूट्रल गिअरवर चालवली जातात. ज्यामुळे वाहनांवरील ताबा सुटतो आणि अपघात होतात. मुंबई गोवा महामार्गावर संथगतीने सुरु असणारे रुंदीकरण काही अपघातांना कारणीभूत ठरते आहे. औद्योगिकरणामुळे अरुंद रस्तांवर वाढलेली अवजड वाहतूक हे देखील अपघांचे प्रमुख कारण आहे.
🔴या उपाय योजनांची गरज
मुंबई गोवा महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरु आहे. यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हरर्जन्स( पर्यायी मार्ग ) टाकण्यात आले आहेत. मात्र पर्यायी मार्गाचे सुचना फलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा गोंधळ उडतो. आणि अपघात होतात. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहन चालकांना सुचना देणारे फलक बसवण्याची मागणी केली जात आहे. मुंबई पुणे दृतगती मार्गावर लोणावळा ते खालापूर दरम्यान तीव्र उतारावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाण वाहनांचा वेग नियंत्रित करणे, वाहन चालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
🟣सुट्टीच्या दिवशी वाहतुक नियमनाची मागणी
वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलीसांकडून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येतात. सुट्टीच्या दिवशी दृतगती मार्गावरील अवजड वाहतुक नियंत्रित केली जाते. त्याच धर्तीवर मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक सुट्टीच्या कालावधीत नियंत्रित करण्याची मागणी आता केली जात आहे.
🅾️रायगड जिल्ह्यातील अपघातातील आकडेवारी काय सांगते…
वर्ष अपघात मृत्यू जखमी
२०१९ ९९१ २१६ ६१३
२०२० ५९६ २०६ ४०९
२०२१ ६८८ २३६ ३७९
२०२२ ७२४ २७६ ६८९
२०२३ ७०० २८१ ५९३
२०२४ ७३२ २६६ ६२४
रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत २०२३ मध्ये ७०० अपघातांची नोंद झाली होती. यात २८१ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५९३ जणांचा मृत्यू गंभीर जखमी झाले होते. २०२४ मध्ये ७३२ अपघातांची नोंद झाली होती. यात २६६ जणांचा मृत्यू झाला होता. तर ६२४ जण गंभीर जखमी झाले. २२० किरकोळ जखमी झाले. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अपघांतांचे प्रमाण ३२ ने घटले. मात्र अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाश्यांची १५ ने घटली मात्र गंभीर जखमींची संख्या ४० ने वाढली.
वाहनचालकांचा बेदरकारपणा आणि वाहतुक नियमांकडे केलेले दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरते. देशात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करायला हवे, वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवायला हवे. चालकांचे प्रबोधन करण्याचे प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. त्यात काही प्रमाणात यशही येत आहे. सोमनाथ लाडे, वाहतूक पोलीस निरीक्षक रायगड.
🛑दाभोलकर हत्या प्रकरण.- आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप!..
मुंबई :- प्रतिनिधी.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे येथील विशेष सत्र न्यायालयाने तीन आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, विहित मुदतीनंतर हे अपील दाखल करण्यात आल्याचा दावा करून प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या वकिलाने मंगळवारी हस्तक्षेप याचिकेद्वारे दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलावर आक्षेप घेतला.
🅾️न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने प्रकरणातून सुटका झालेले वकील संजीव पुनाळेकर यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. तसेच, प्रकरणाची सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी ठेवली.
🛑आरोपींची निर्दोष सुटका करण्याबाबतच्या पुणेस्थित विशेष सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याच्या मागणीसाठी दाभोलकर कुटुंबीयांनी सीबीआयकडे निवेदन केले होते. परंतु, तपास यंत्रणेने त्यांच्या कुटुंबीयांच्या निवेदनावर काहीच प्रतिसाद दिला नाही. परिणामी, दाभोलकर कुटुंबीयांनी या प्रकरणी अपील दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे वकील संदेश शुक्ला, विवेक पाटील आणि कबीर पानसरे यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर, खंडपीठाने उपरोक्त बाब स्पष्ट करून प्रकरण तहकूब केले.
तत्पूर्वी, हा खटला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) चालवण्यात आला. त्यामुळे, अपील राष्ट्रीय तपास कायद्यांतर्गत (एनआयए) दाखल करणे अपेक्षित होते. एनआयए कायद्यानुसार, अपील दाखल करण्यासाठी ३० दिवसांच्या कालावधीची अट आहे. या कालावधीनंतर, दाभोलकर कुटुंबीयांनी अपील दाखल केले असून ते दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ करण्याच्या मागणीसाठी त्यांनी अर्जही केलेला नाही. त्याचप्रमाणे, निकालाची प्रत अपिलासह जोडलेली नसल्याचा दावाही पुनाळेकर यांनी दाभोलकर कुटुंबीयांच्या सुटकेविरोधातील अपिलाला विरोध करताना दावा केला. दुसरीकडे, फौजदारी दंहसंहितेच्या कलम ३७२ अंतर्गत खटल्यातील पीडित किंवा त्याच्या कुटुबीयांना अपील दाखल करण्यासाठी विशिष्ट मर्यादा घालण्यात आलेली नाही. त्यामुळे, या प्रकरणी अपील दाखल करण्यास विलंब झाल्याचा मुद्दा उपस्थित करणे गैर आहे, असा प्रतिदावा दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला.
🔴दरम्यान, प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या दोन आरोपींना हत्येचा फौजदारी कट रचण्याच्या आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) दहशतवादी कृत्य केल्याच्या आरोपांतून दोषमुक्त करण्याच्या विशेष सत्र न्यायालयाच्या निर्णयालाही मुक्ता दाभोलकर यांनी आव्हान दिले आहे. या अपिलाची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या अन्य खंडपीठाने ऑगस्ट महिन्यात सीबीआयसह प्रकरणातील सर्व आरोपींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. पुण्यातील विशेष सत्र न्यायालयाने पुनाळेकर यांच्यासह डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, आणि विक्रम भावे या तीन आरोपींची निर्दोष सुटका केली होती. तर, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.