आंबेडकरवादी सर्वसंघटनांचा सोमवारी आजरा येथे होणार निषेध मोर्चा..सर्व संघटनांचे निवेदन
आजरा.- प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील आंबेडकरवादी सर्वसंघटनांच्या वतीने सोमवार दि. ३० रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल तसेच शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांना जीवे मारल्याप्रकरणी व परभणी येथील संविधान प्रतिकृती विठंबना प्रकरणी निषेध करण्यात येणार आहे. यासंदर्भात सोमवार दि. २३ रोजी आजरा तालुक्यातील आंबेडकरवादी सर्व संघटनांची बैठक पार पडली. यावेळी आजरा तहसिलदार समीर माने, पोलीस निरीक्षक यांना मोर्चासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फॅशन हा शब्द वापरून खूप मोठी चुक केली आहे. देशाचे गृहमंत्रीच जर संविधनाबाबत अपमानजनक शब्द वापरत असतील तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच दिवंगत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मारहाण करून झालेल्या मृत्यूबाबत संबधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच परभणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून विठंबना केलेल्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सुरेश दिवेकर, अजय देशमुख, गौतम कांबळे, गोपाळ होन्याळकर, परशराम कांबळे, शामराव कांबळे, सर्जेराव कांबळे, हिंदूराव कांबळे, सागर कांबळे, संभाजी कांबळे यांच्यासह आंबेडकरवादी सर्व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
