Homeकोंकण - ठाणेकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार खासदार नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार खासदार नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
खासदार नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित

मुंबई. प्रतिनिधी.०६.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपचे संघटन महामंत्री बी.एल.संतोषही उपस्थित होते. मंत्रिमंडळातील विस्तारासंदर्भात ही बैठक होती, असे सांगितले जाते. विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहेत. नियमानुसार मंत्र्यांची संख्या ८१ पर्यंत वाढवता येऊ शकते.

दरम्यान, या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी बुधवार, ७ जुलै रोजी होऊ शकतो. अर्थात याबाबत अद्याप अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नाही. परंतु विस्तार झाल्यास पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील हा पहिलाच विस्तार आहे.

या बदलामध्ये आसाममधून सर्बानंद सोनोवाल, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे आणि बिहारमधून माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने उत्तर प्रदेशला झुकते माप मिळण्याची शक्यता असून वरुण गांधी, रामशंकर कठेरिया, अनुप्रिया पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे सांगितले जाते.

नारायण राणेंना दिल्लीहून तातडीचं बोलावणं आले असून राणे आजच दिल्लीला रवाना होतील. ते दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राणेंनी या विषयावर काम केलं. आताही ते या मुद्द्यावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. याशिवाय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. त्याचा विचार करूनही राणेंना मंत्रिपद देण्यात येईल असं बोललं जातं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.