Homeकोंकण - ठाणेबिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या.- अजितदादा पवार यांचा अमित शाहांसमोर प्रस्ताव?🟥मिरवणूक...

बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या.- अजितदादा पवार यांचा अमित शाहांसमोर प्रस्ताव?🟥मिरवणूक रात्री बारानंतर वाजणार की थांबणार?साताऱ्यात गणेशोत्सव मंडळांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिस अधीक्षकांची कसोटी🟥विधानसभा निवडणुकींचा कधी वाजणार बिगुल.- निवडणूक आयोग राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार..

🔴 बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या.- अजितदादा पवार यांचा अमित शाहांसमोर प्रस्ताव?
🟥मिरवणूक रात्री बारानंतर वाजणार की थांबणार?साताऱ्यात गणेशोत्सव मंडळांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिस अधीक्षकांची कसोटी
🟥विधानसभा निवडणुकींचा कधी बिगूल वाजणार.- निवडणूक आयोग राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार..

मुंबई :- प्रतिनिधी.

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली आहे. अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाहा यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. मात्र अजितदादा पवार यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी मुंबई विमानतळावर छोटेखानी बैठक पार पडली होती. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा अमित शाहा यांच्यासमोर बोलून दाखवल्याचे समजते.

🛑अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे, असे अमित शाहा यांना सांगितल्याचे वृत्त द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने दिले आहे. द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवारांनी अमित शाह हे पुन्हा दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना मुंबई विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी मुंबई विमानतळावर अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली. बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या, असे अजित पवार म्हणाले.

🟥मिरवणूक रात्री बारानंतर वाजणार की थांबणार?साताऱ्यात गणेशोत्सव मंडळांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिस अधीक्षकांची कसोटी

सातारा :- प्रतिनिधी.

जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना नियमांचे उल्लंघन चालते, मग सण-उत्सवांना निर्बंधांचा बडगा का? असा सवाल करत काल झालेल्या बैठकीत गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले.पोलिस प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत वाद्यांना परवानगी दिली नाही, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा विसर्जन मिरवणूक सुरू करण्याची भूमिका मंडळांनी मांडली आहे.

🟥त्यावर आवाजाच्या मर्यादेत रात्री १२ नंतरही सवाद्य मिरवणूक सुरू ठेवण्याची भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना सांगितली आहे. त्यामुळे साताऱ्यातील मिरवणुकीत रात्री बारानंतर वाद्य थांबणार की नाही, तसेच मिरवणूक बारानंतर सुरू राहणार की थांबवून सकाळी सहाला पुन्हा सुरू करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विसर्जन मिरवणुकीचा हा पेच पोलिस अधीक्षक समीर शेख यांना सोडवावा लागणार आहे.

🔴सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध असतानाही पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांच्याआधी साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतरही ध्वनिक्षेपकाचा दणदणाट सुरू असायचा. प्रसन्ना यांनी पहिल्यांदा याबाबत ठोस भूमिका घेतली. रात्री बारानंतर वाद्य वाजली, तर कडक कारवाई करण्याची त्यांच्या भूमिकेमुळे सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला एक शिस्त आली.

🛑रात्री बारानंतर मिरवणुकीतील सर्व वाद्य बंद होऊ लागली. त्यामुळे दरवेळी लांबणारी मिरवणूक वेळेत व्हायला लागली. त्यानंतर आलेल्या पोलिस अधीक्षकांनी हा शिरस्ता कायम ठेवला. गतवर्षीही तो कायम राहिला. त्याबाबत गणेशोत्सव मंडळांनी आततायी भूमिका घेतली नव्हती; परंतु मिरवणुकीतील वेळेचा वाद पुन्हा डोके वर काढत आहे.

🔴दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी

गणेश आगमन सोहळा हा दोन ते तीन दिवस अगोदर सुरू होत होता; परंतु यंदा १५ ऑगस्टपासूनच गणेश मंडळांच्या गणेश आगमन सोहळ्याला सुरुवात झाली. रोज कोणत्या ना कोणत्या मंडळाची आगमन मिरवणूक निघाली. त्याचा साहजिकच शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामध्ये काही मंडळांनी आवाजाच्या मर्यादेचेही भान ठेवले नाही. त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांनी या १५ दिवस चालणाऱ्या आगमन सोहळ्यांबाबत आक्षेप नोंदविला. त्यामुळे पोलिसांनी गणेश आगमनाच्या दोन दिवस अगोदर कडक भूमिका घेतली.
🟥पोलिसांच्या या भूमिकेबाबत गणेश मंडळांमध्ये नाराजी होती. त्याचे पडसाद काल गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत उमटले. त्यामध्ये बहुतांश मंडळांनी पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. आमदार- खासदारांचे वाढदिवस किंवा कार्यक्रमात ध्वनिप्रदूषण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन चालते, मग सण-उत्सवांवेळीच निर्बंधाचा बडगा का? असा सवाल गणेश मंडळांच्या कार्यकर्त्याने उपस्थित केला.त्याच्या मुद्द्याचे अन्य कार्यकर्त्यांनीही स्वागत केले. त्यातून गणेश भक्तांची पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी का? याचे एक कारणही समोर आले. कायदा व नियम सर्वांसाठी समान व ठाम असावेत, अशी त्यामागची भावना पोलिस अधिकाऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. राजकीय दबावामुळे रोखल्या जाणाऱ्या कारवायांमुळे पोलिस ठाण्याच्या पातळीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही सामान्य माणसाला तोंड देताना अडचण होते. याचाच परिपाक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या संतापातून समोर येत आहे.
🔴रात्री बारानंतर वाद्य वाजवायला बंदी आहे, त्या ठिकाणी मिरवणूक थांबवून सर्वांनी दुसऱ्या दिवशी पहाटे सहापासून पुन्हा वाद्याच्या गजरात मिरवणूक सुरू करायची, अशी भूमिका कालच्या बैठकीत मंडळांनी घेतली गेली. त्यानंतर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंची भेट घेतली. पोलिस अधीक्षकांशी झालेल्या चर्चेनंतर मिरवणूक बंद करून दुसऱ्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्री बारानंतरही आवाजाच्या मर्यादेचे पालन करून मिरवणूक सुरू ठेवण्यास उदयनराजेंनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

🟥पोलिसांनी अटकाव करू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. त्यामुळे साताऱ्यातील गणेश विसर्जन मिरवणूक रात्री बारानंतरही चालू राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिरवणुकीदिवशीचा संघर्ष टाळण्यासाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये निर्माण झालेला हा संभ्रम दूर करण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.

🟥विधानसभा निवडणुकींचा कधीही बिगूल वाजणार.- निवडणूक आयोग राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार..
( विधानसभेसाठी निवडणूक आयोग लागले कामाला.- जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणार आढावा.)

मुंबई :- प्रतिनिधी.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरबरोबर महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा न झाल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळालं.पराभवाच्या भितीने सत्ताधारी निवडणूक लावत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे तर सरकारकडून आमचा सरकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यावरच भर असल्याचं सांगत निवडणूक पुढे ढकलल्याचे आरोप फेटाळून लावले जात आहेत. खरं तर हरियाणा आणि महाराष्ट्रातील मागील तीन विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या. मात्र यंदा महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आलेला नाही. मात्र निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली नसली तरी लवकरच होण्याचे संकेत मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील आगामी निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं चित्र दिसत आहे.

🟥राज्यात विधानसभा निवडणुकींचा कधीही बिगूल वाजू शकतो. निवडणूक आयोगाकडून, तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी 13 सप्टेंबरला घेतील.निवडणूक आयोगाच्या या वेगवान हालचालीमुळं सर्व राजकीय पक्ष, संघटना देखील अलर्ट झाल्या आहेत.

🔴केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. या दौऱ्यात महायुतीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली. महायुतीत पुढील काही दिवसांत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसंच महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. इतर छोट्या-मोठ्या संघटना आणि राजकीय पक्ष आपपाल्या मतदारसंघात ताकद वाढवण्यात गुंग आहे. यातच राज्य मुख्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे राज्यात कधीही विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजू शकतो, असं वातावरण निर्माण झालं आहे.राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम वेगवेगळ्या विभागांमधील जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक, पुणे, कोकण, मुंबई शहर आणि उपनगरचा दिवसभर आढावा घेणार आहेत. दूरदृश्यप्रणालीद्वारे हा आढावा घेतला जाणार आहे.जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय हा आढावा असणार आहे. ईव्हीएम मशीन, मतदान कर्मचारी, कायदा आणि सुव्यवस्था, मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्र, बूथ केंद्राचा प्रस्ताव, मतदार यादी, नियंत्रण कक्ष, माध्यम कक्ष, नोडल अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, तक्रार निवारण, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेले ‘अॅप’ची स्थिती, वाहतूक व्यवस्था, टपाल मतदान प्रक्रिया आदींचा आढावा यात घेतला जाणार आहे.

🟥बोगस मतदारांच्या तक्रारींचा आढावा.

🔴लोकसभा निवडणुकीला मतदार याद्यांबाबत अनेक तक्रारी झाल्यात. मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार घुसवण्यात आल्याच्या या तक्रारी आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या तक्रारी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे केल्यात. या तक्रारी पुराव्यानिशी आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी याचा देखील आढावा घेणार असल्याचे सांगितलं जात आहे.

🟥’ईव्हीएम’ मशीन तपासणी

राज्यात एक लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्र असणार आहेत. मतदानासाठी ईव्हीएम वापरल्या जातील. त्यांची तांत्रिक तपासणी आणि त्या मतदानासाठी योग्य असल्याची खात्री तज्ज्ञ अभियंत्यांकडून करून घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित होते. त्याचा आढावा देखील मुख्य अधिकारी घेतील.

🛑२०२४ ची विधानसभा निवडणूक रंगणार

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी पक्ष नाही तर राज्यातील नागरिक देखील उत्सुक आहे. राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर वेगळ्याच युती निर्माण झाल्या आहेत. शिंदे गट व अजित पवार गट यांच्यासाठी यंदाची विधानसभा प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांनी घेतलेला निर्णय जनतेला किती पटला याचा आरसा दाखवणारा ठरणार आहे. तर महाविकास आघाडी म्हणून देखील ही आघाडी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे एकमेकांसोबत प्रचार, जागावाटप आणि नाराजी नाट्य यामधून कसे ध्येय गाठणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता देखील सर्वांना लागली आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक जोरदार रंगणार हे निर्विवाद आहे.
🔴महाराष्ट्रातील निवडणुका या हरियाणाबरोबर जाहीर होतं असं मानलं जात होतं. मात्र काही आठवड्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधील पक्षांना राज्यात म्हणावं तस यश मिळालं नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटकपक्षांना अपेक्षेहून चांगलं यश मिळालं. लोकसभेमधील ट्रेण्ड कायम राहिल्यास याचा महायुतीमधील घटक पक्षांना फटका बसू शकतो म्हणूनच निवडणूक पुढे ढकलण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महाराष्ट्राला दिवाळीपूर्वी नवं सरकार मिळेल असंही काही जाणकारांचं म्हणणं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील विधानसभेची मुदत संपल्यानंतर गरज पडल्यास काही काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारीही असल्याची माहिती समोर येत आहे. काही आठवड्यांच्या राष्ट्रपती राजवटीचाही विचार केला जाईल असं वाटत असतानाच आता निवडणूक आयोगाने दुसरीकडे निवडणुकांची तयारी सुरु केल्याने राजकीय घडामोडींना वेग येईल हे निश्चित आहे.तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चांना वेग आल्याचं पाहायला मिळत असून पुढील काही आठवड्यांमध्ये जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.