आजरा तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या विकासात रवळनाथ पतसंस्था अग्रगण्य वाटा उचलेल: चेअरमन अभिषेक शिंपी
श्री रवळनाथ पतसंस्थेची 40 वी वार्षिक सभा खेळीमेळीत.
आजरा : प्रतिनिधी.
बहुजन समाजातील गोरगरीब सामान्य लोकांनी सुरु केलेली ही पतसंस्था निश्चितपणाने यावर्षी ठेवीचा 25 कोटीपेक्षा पुढचा टप्पा पार करेल असा विश्वास आहे. या आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात 50 कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचा आमचा संचालक मंडळाचा मानस असून संस्थेची प्रगती ही कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी यांनी केले. ते श्री रवळनाथ पतसंस्थेच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व जि. प. चे. माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
स्वागत संस्थेचे मॅनेंजर विश्वास हरेर यांनी केले. यावेळी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना अध्यक्ष शिंपी म्हणाले, आगामी काळातही संस्थेच्या कामकाजात काही धोरणात्मक बदल करुन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन संस्थेची प्रगती सुरुच ठेवणार आहे, याला सभासदांचेही सहकार्य नक्कीच मिळेल असा विश्वास आहे. संस्थेतील सोनेतारणासह इतर सर्व साहित्य व इमारत यास विमा कवच सुरु केले असून नैसर्गिक आपत्ती आल्यास पण संस्था सुरक्षित केली आहे. इमारतीचे नुतनीकरणाला मागील सभेतच मंजुरी मिळाली आहे, पण काही तांत्रिक अडचणीमुळे काम करणे शक्य झाले नसून ते लवकरच सुरु करुन पुर्णही केले जाणार आहे. त्यामुळे पुढची वार्षिक सभा ही वरील सभागृहातच होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेला अहवाल सालात 19 लाखांवर नफा झाला असून 15 कोटींच्या ठेवी असून आतापर्यंत सर्वांनी जी साथ दिली, विश्वास ठेवला तसाच याहीपुढे ठेवावा. आपल्या सुचनांचा नेहमीच सन्मान केला जाईल. तालुक्यातील गोरगरीब घरात उच्चशिक्षित विद्यार्थी घडविण्यात, प्रगत शेतकरी व व्यवसायिक घडविण्यात आमच्या संस्थेचा अग्रक्रमाने भाग असेल असेही अध्यक्ष शिंपी यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला श्री रवळनाथ देवाच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल सालातील दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. श्रध्दांजली वाचन संचालक श्री किरण कांबळे यांनी केले. त्यानंतर दहावी, बारावी परीक्षेतील यश मिळविलेल्या सभासदांचे पाल्य पार्थ दयानंद चौगुले व ज्ञानेश्वरी यशवंत पोवार यांचा गुच्छ व रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मानसी नाईक, श्रीमती ज्योत्स्ना हरमळकर, मृणालिनी देसाई, तेजस पारपोलकर, सुशांत पारपोलकर, इनायत इंचनाळकर, मोहम्मदसाब काकतीकर, ॲड. डी. जे. देसाई यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. 65 वर्षावरील शिला करजगी, अरुण बिरजे, सोपान परीट, शिवाजी जाधव, शंकर पारपोलकर, जानबा गुरव, मारुती आजगेकर या ज्येष्ठ सभासदांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर सभेपुढील विषय व अहवाल वाचन मॅनेजर विश्वास हरेर यांनी केले. यावेळी सभासदांनी सभेपुढील विषयांना एकमुखी मंजुरी दिली.

यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना जयवंतराव शिंपी म्हणाले, 40 वर्षापुर्वी सर्वसामान्य माणसांनी संस्थेच्या लावलेल्या या रोपट्याचे रुपांतर आता वटवृक्षात होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. मध्यंतरीच्या काळात काही आमच्या सहकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जशी संस्थेने प्रगतीची गती घ्यायला हवी होती तशी गती घेतली नाही. पण गेल्या चार ते पाच वर्षापासून नवीन तरुण पिढीकडे संस्थेचा कारभार हाती आल्यानंतर संस्थेचे समाधानकारकपणे कामकाज सुरु झाले आहे. सर्व समाजातील नागरिक या संस्थेमध्ये आहेत. संस्थेने आजपर्यंत अगदी खेडोपाड्यातील गरीब व गरजू लोकांना कर्ज वाटप करुन त्यांना मदतीचा हात देण्याचे काम केले आहे. सभासदांच्या सुचनेनुसार लवकरच संस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्रही करुन घेतले जाणार आहे असे स्पष्ट केले. यावेळी माजी अध्यक्षा सौ. सुरेखा फडके, संचालक इब्राहीम इंचनाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला उपाध्यक्ष समीर गुंजाटी, सर्व संचालक, के. जी. पटेकर, सचिन शिंपी यासह सभासद उपस्थित होते. आभार संचालक विक्रम पटेकर यांनी मानले.
