पर्यावरण पूर्वक पारंपारिक वाद्याचा वापर करून श्री. गणेश उत्सव साजरा करावा.- आजरा सपोनि नागेश यमगर.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील पोलीस स्टेशनच्या वतीने आजरा तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांना श्री गणेश उत्सव सणाच्या अनुषंगाने प्रशासकिय इमारत आजरा तहसील कार्यालय येथे दि.१७ रोजी गणेश मंडळे, पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले होते. स्वागत व प्रास्ताविक सहा. पोलीस निरीक्षक आजरा पोलीस ठाणे नागेश यमगर यांनी केले.
यावेळी बोलताना सपोनि श्री यमगर म्हणाले सालाबाद प्रमाणे २०२४ सालात होणाऱ्या श्री गणेश उत्सव सण हा पर्यावरण पूर्वक पारंपरिक वाद्याचा वापर करून शांततेत साजरा करायचा आहे. डॉल्बी मुक्त, व नागरिकांना त्रास होईल व नियमाचे उल्लंघन होईल असे कोणतेही कृत्य मंडळाकडून घडू नये. यापूर्वी देखील आपण चांगल्या पद्धतीने मंडळाच्या वतीने गणेश उत्सव सण साजरा करून एक आदर्श तालुक्यात निर्माण केला आहात. असेच आपले सहकार्य राहून २०२४ मधील गणेश उत्सव सण हा चांगल्या पद्धतीने पार पाडावा. तसेच सद्यस्थितीत तालुक्यातील एकूण गावांपैकी ५० गावात एक गाव एक गणपती आहे. उर्वरित गावामध्ये एक गाव एक गणपती होऊन. तालुक्यातील प्रत्येक गावात एक गाव एक गणपती व्हावा व हा सण अगदी आनंदाने शांततापूर्वक व पर्यावरणपूर्वक पारंपरिक वाद्याच्या गजरात होण्यासाठी मंडळाने सहकार्य करावे असे आवाहन यावेळी सपोनी श्री यमगर यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार मासाकांत देसाई, आजरा नगरपंचायत प्रतिनिधी, सर्व पोलीस पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष, गणेश मंडळाचे अध्यक्ष साऊंड सिस्टिम मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अनंत देसाई यांनी मानले.