🟥कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग.- अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.
( संपूर्ण नाट्यगृह जळून खाक.)
कोल्हापूर :- प्रतिनिधी.
कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत नाट्यगृहातील अर्ध्याहून अधिक सामान जळून खाक झाले.तर या भीषण आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून कलाप्रेमींसाठी ही अत्यंत दु:खद घटना आहे.
🟥केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याचे कळताच कलाकारांनी नाट्यगृहाकडे धाव घेतलीये. मात्र, कलाकरांना गेटच्या आतमध्ये सोडले जात नाहीये. नाट्यगृहाला आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप कळू शकले नाहीये. या आगीमुळे नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले असून सर्व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. अजूनही नाट्यगृहाला लागलेली आग आटोक्यात आली नाही. केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा इतिहास आहे. नाटकाचे अनेक प्रयोग इथे होत असतात. अनेक कलाकार इथे, या नाट्यगृहात घडले आहेत. मात्र या नाट्यगृहाला आग लागल्याने अनेकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. अनेक कलाकार, आमदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह जळताना बघवत नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
🔴दोन दिवस होते कार्यक्रम
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऐतिहासिक मान आहे. अनेक अजरामर नाटकांचे इथं प्रयोग झाले आहेत. उद्या आणि परवा याच नाट्यगृहात केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.केशवराव भोसले यांचा जीवनप्रवास आणि गानशैली तसेच त्यांच्याशी संबंधित छायाचित्रांचं प्रदर्शन असे कार्यक्रम इथं पार पडणार होते. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं. पण तत्पूर्वीच ही दुर्घटना घडल्यानं कोल्हापूरकरांनी खंत व्यक्त केली आहे.
🟥राजर्षी शाहूंनी उभारलं थिएटर.

कला आणि खेळप्रेमी असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकारानं या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती. १९१३ ते १९१५ या काळात ते बांधलं गेलं. याचा रंगमंच २० फूट बाय ३४ फूट इतका प्रशस्त आहे. या नाट्यगृहाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रेक्षकांना रंगमंच पाहताना अडथळा ठरेल असा एकही खांब इथं नाही. या नाट्यगृहाची रचना देखील एखाद्या पॅलेस प्रमाणेच आहे. त्यावेळी या थिएटरचं नाव पॅलेस थिएटर असं होतं. सध्या त्याचं नामकरण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं.