🟣अतिशय दुःखदायक.
मुंबईतील तरूण पत्रकाराचे धुळ्यात अपघाती निधन.
( भरधाव ट्रकने दिली कारला जोराची धडक)
धुळे :- प्रतिनिधी
धुळे शहरात एक भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोनजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
🔴अपघातात मृत्यू झालेले पत्रकार हर्षल भदाणे मुंबईतील एका टिव्ही चँनेलमध्ये कार्यरत होते. ते धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी आहेत. सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांची कार उभी होती. त्यावेळी भरधाव ट्रकनं त्यांच्या वाहनाला धडक दिली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी कारमधून उडी मारली. मात्र, सुसाट वेगानं आलेल्या ट्रकच्या चाकाखाली येऊन ते चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
🟥धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालकाला व त्याच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे हर्षल भदाणे यांचं अकाली जाणं संपूर्ण पत्रकारितेसाठी मोठी हानी आहे. हर्षल हे केवळ एक पत्रकार नव्हते, तर एक संवेदनशील आणि कणखर व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पत्रकारितेतून समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडील आहेत.
