कॉम्रेड संपत देसाई यांचे एका लोकलढ्याची यशोगाथा
शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात…
आजरा – प्रतिनिधी.
श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष आणि रस्त्यावरचा लढाऊ बाण्याचा कार्यकर्ता अशी ज्यांची ओळख आहे. त्या कॉम्रेड संपत देसाई यांचे एका लोकलढ्याची यशोगाथा हे पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला लावले असून या पुस्तकामुळे आजरा परिसरात लढला गेलेला कष्टकऱ्यांचा लढा विद्यापीठीय पातळीवर अभ्यासाला जाणार आहे.
सर्वार्थाने फाटकी असलेली माणसं नैतिकता आणि आत्मविश्वासाच्या बळावर शासनासारख्या सर्वशक्तिमान अशा बलाढ्य व्यवस्थेला कशी नामोहरण करू शकतात, आपल्या न्याय मागण्यांसाठी संविधानाच्या चौकटीत राहून सूत्रबद्ध आणि रचनात्मक संघर्ष कसा उभा करू शकतात याचे संयत दर्शन या पुस्तकातून घडते. आपली बाजू न्याय असेल तर अशावेळी परस्परविश्वासने आणि लोकशाही मार्गाने लढा कसा उभारावा आणि तो कसा यशस्वी करावा याचे शास्त्र या पुस्तकात लेखक संपत देसाई यांनी उलगडून सांगितले आहे. लोकांच्या प्रश्नावर मोठे लढे होतात आणि नोंदी अभावी काळाच्या उदरात ते गायब होतात किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जातात, या दृष्टीने या पुस्तकाचे अनन्यसाधारण महत्व आहे.
या पुस्तकात जस लढ्याबद्दल तसच या परिसराच्या स्थानिक संस्कृतीबद्दलही हे पुस्तक तितक्याच आत्मीयतेने बोलते. आजरा परिसरातील रूढी, परंपरा, प्रथा इथलं समाजजीवनही या पुस्तकात सुंदररीत्या आलं आहे. अनेक व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह या परिसरातील जशी माणसं भेटतात तसा इथला निसर्गही भेटतो. इथल्या माणसांचं निसर्गाशी असलेलं अतूट नातं, या माणसांचं अभावग्रस्त जगणं याबद्दलची आस्था या लेखनात पाझरत राहते. तीच आस्था तोच कळवळा संपूर्ण पुस्तकभर पसरला आहे.
मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या अशी मने असे नमुने या पुस्तकानंतर हे दुसरे पुस्तक शिवाजी विध्यापठाच्या मराठी विभागात अभ्यासक्रमाला लागले असल्याने आजरा परिसराचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास या निमित्ताने विध्यापठातील अनेक विद्यार्थी अभ्यासणार आहेत. अशी माहिती प्रकाश मोरुस्कर यांनी दिली आहे.