🛑राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद.- भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार.
( भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी.)
🛑आजरा – भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार विरोधात – अधिकाऱ्यांची झाडाझडती… शिवसेना ( शिंदे गट. यांनी विचारला जाब. )
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना अनोखी ओवाळणी दिली.
🔴विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले.यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पात राज्यातील महिला- भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा शासन निर्णय देखील तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या 1 जुलैपासून भगिनींना देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहुन जास्त महिलांना होणार आहे.
🅾️महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल 15 हजारावरून वाढवून 30 हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा, 10 हजार महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, 50 टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे, राज्यातील सर्व माता-भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले. यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
🛑आजरा – भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार विरोधात – अधिकाऱ्यांची झाडाझडती… शिवसेना ( शिंदे गट. यांनी विचारला जाब. )
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील नागरिकांकडून येणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील अनेक तक्रारीबाबत भूमी अधीक्षिका विद्या तांगडे यांना जाब विचारण्यासाठी आजरा शिवसेना पदाधिकारी आज भूमी अधीक्षक कार्यालय आजरा येथे पोहोचले. यावेळी शिंदे गट ( शिवसेनेचे ) तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी फेरफार नोंद करताना पुन्हा जाब जबाबदासाठी कार्यालयात पक्षकारांना कशासाठी बोलवले जाते यातून तुमच्या कार्यालयाकडून आर्थिक व्यवहार घडवून आणले जातात व पक्षकारांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात असा आरोप केला. आजरा शहर प्रमुख विजय थोरवत यांनी आजरा येथील एका प्रकरणाचा हवाला देत जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातून पोटहिस्या संदर्भात नोंदी घालण्याचे आदेश झाले असून सुद्धा केवळ अधिकाऱ्यांना नोंदीसाठी पैसे खायचे असल्याने पक्षकाराच्या नोंदी अवधी संपून गेला तरी घालण्यात आल्या नाही व पक्षकाराला नाहक त्रास दिला जात असल्याबाबत जाब विचारला आजरा तालुका कृषी समिती अध्यक्ष इंद्रजीत देसाई यांनी देवर्डे ग्रामपंचायतने गावठाण नोंदी चुकीच्या झाल्या असून त्याबाबत तक्रार निरसन करण्यासाठी जानेवारी २०२४ ला आपल्या कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्याचे कोणतेच उत्तर तुम्ही ग्रामपंचायतला लेखी दिले नाही ग्रामपंचायतला तुम्ही जर जुमानणार नसाल तर सर्वसामान्यांना काय न्याय देणार तसेच किटवडे येथील एका प्रकरणात २०२३ साली दोन्ही पक्षकारांच्या समोर मोजणी करून हद्दी दाखउन संमती घेण्यात आली पण सदर बाबतीत पुन्हा तक्रार दाखल झाल्यावर ज्या हद्दीत २०२३ साली दाखवण्यात आल्या त्या बदलून दुसऱ्याच हद्दी दाखवण्यात आल्या याचा अर्थ तुमचाच विभाग एक वर्ष आधी एक हद्द दाखवतो व दुसऱ्या वर्षी तुमचाच विभाग दुसरीकडे हद्द दाखवतो याबाबत अशा अधिकाऱ्यांवर आपण काय कार्यवाही केली यामुळे पक्षकारांच्या मध्ये होणाऱ्या वादास तसेच त्यांचे होणारे अर्थिक नुकसान कोण भरून देणार असा जाब विचारन्यात आला. यावेळी एकूणच भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराबाबत साळगाव सरपंच धनंजय पाटील, लाटगाव उपसरपंच रणजीत सरदेसाई,संतोष भाटले, सुनील दिवेकर,दयानंद नीऊनगरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले
सदर प्रश्नांची समाधानकारक उत्तर अधीक्षकांकडून न मिळाल्यामुळे या संदर्भात आमदार आबिटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीची मागणी करणार असल्याचे पदाधिकाऱ्यानी सांगितले. यावेळी जयंत पाटील, अमर चव्हाण, मंदार बिर्जे, नागोजी तानवडे, अमझत मानगावकर, आबा पाटील, दिलीप तानवडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
