टोल नाक्याचे काम तात्काळ थांबवावे.- १० रोजी टोल हद्दपार सर्वपक्षीय मोर्चा .
( टोल विरोधी कृती समितीचे आजरा तहसीलदार यांना निवेदन.)
आजरा.- प्रतिनिधी.
संकेश्वर – बांदा महामार्गावर आजरा शहराजवळ होत असलेला टोल नाका बंद करावा यासाठी तालुक्यातील जनतेच्यावतीने संकेश्वर-बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दि. १० जुन २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपासून आपल्या कार्यालयावर टोल विरोधात निघणारा मोर्चा. असल्याबाबत आजरा तहसीलदार व आजरा पोलीस निरीक्षक यांना टोलविरोधी कृती समितीचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१) दि. ३१/०५/२०२४ रोजी संकेश्वर-बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीची झालेली बैठक आणि त्यानंतर आपल्याला दिलेले निवेदन.
२) दि. ३/६/२०२४ रोजी श्री रवळनाथ मंदिर आजरा येथे टोल मुक्ती संघर्ष समिती व तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची झालेली व्यापक बैठक. संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम गेले दिडवर्षा पासून सुरु आहे. या रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत. खरेतर कोणत्याही प्रकल्पाचे काम सुरु करत असताना त्या प्रकल्पाने बांधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे संपादीत करुन त्याचा योग्य मोबदला दिल्या नंतरच काम सुरु करावे असा कायदा सांगतो. पण इथे कायदा बाजुला ठेवून रस्त्याचे काम जमिन संपादन न करताच सुरु आहे. या महामार्गासाठी वड, पिंपळ, जांभुळ आणि अशा स्थानिक प्रजातीच्या शेकडो वर्षांच्या हजारो झाडांची अक्षरशः कत्तल केलेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक जनतेच्या मनात तीव्र असंतोष आहे. त्याची भर म्हणून रस्त्याचे काम अपुर्ण असतानाच या महामार्गावर आजरा शहराजवळ टोल नाका उभारणेचे काम मात्र वेगाने सुरु आहे. खरेतर संकेश्वर-बांदा हा १०८ कि.मी. लांबीचा रस्ता केंद्र सरकारच्या निधीतून दोन पदरी विकसीत होणार आहे असे वर्तमानपत्रातुन सरकारने राजपत्र जाहिर केले. या रस्त्याची मुळ किंमत ५०० कोटी असलेचे सांगितले जाते. परंतु सद्या चालु असलेल्या रस्त्याची किंमत कागदोपत्री २९९ कोटी होत आहे. हा रस्ता काही ठिकाणी दोन पदरी तर वनखात्याच्या जागेतून सिंगल पदरी ५२ कि.मी. इतकाच विकसीत झाला आहे. मुळातच हा रस्ता शासन बांधत असलेने आणि बांधा-वापरा व हस्तांतरीत करा (बी.ओ.टी.) तत्वावर नसल्याने टोल नाका उभारुन टोल वसुल करणेची नाही. असे आमचे मत आहे. टोल नाका उभारुन कोणत्या तरी खाजगी कंपनीला लुट करण्यास परवानगी दिल्यासारखाच हा प्रकार आहे.

यापूर्वी संदर्भ क्र. १ ने आम्ही आपल्याला या टोलनाक्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नेमके काय धोरण असणार याची अधिकृत माहिती मागीतली आहे. त्यामध्ये स्थानिक वाहनधारकां बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काय धोरण रहाणार याची अधिकृत माहिती अपेक्षित आहे. आजरा साखर कारखाना हा या प्रस्तावित टोल नाक्यापासून अवघ्या ८ ते १० कि.मी. अंतरावर आहे. कारखान्याचा हंगाम सुरु झाल्यानंतर रोज शेकडो वाहनातून ऊस वाहतुक होणार आहे. त्याचा फटका परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. याबाबतची स्पष्टता आम्हाला हवी आहे. या टोल नाक्याची उभारणी करताना लोकप्रतिनिधी व स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन व्हायला हवी होती पण तसे कांही झाले नाही. त्यामुळे या टोलनाक्याबाबत स्थानिक जनतेच्या मनात संभ्रम आहे. स्थानिक जनतेचा या टोल नाक्याला असलेला विरोध लक्षात घेऊन जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यासोबत स्थानिक जनतेशी निर्णायक बैठक होत नाही तोपर्यंत चालु असलेले टोल नाक्याचे काम तात्काळ थांबवावे. तसे न झाल्यास स्थानिक जनतेचा असंतोष कधीही उफाळून येऊ शकतो. यासाठी आम्ही संकेश्वर-बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यालयावर दिनांक १० जुन २०२४ रोजी मोर्चाने येत आहोत. जोपर्यंत टोलमुक्ती होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालुच रहाणार आहे. त्यामुळे मोर्चावेळी संबंधीत विषयांचा निर्णय घेऊ शकणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना चर्चेसाठी उपस्थित रहाणेसाठी आपले कार्यालयाकडून योग्य त्या सूचना दिल्या जाव्यात असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर क्राॅ.संपत देसाई, प्रभाकर कोरवी, परशुराम बामणे
पांडूरंग सावरतकर, राजू विभूने अल्बर्ट डिसोझा, गौरव देशपांडे
जोतीबा आजगेकर यांच्या सह्या आहेत. यावेळी टोल विरोधी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.