राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा.-
गारपिठीमुळे शेतीचे मोठं नुकसान. – वीज पडून एकाचा मृत्यू तर दोघे जखमी
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यामध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अनेक ठिकाणी शेतपिकांसह घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आज देखील राज्यातील अकोला, बुलडाणा, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले
🟥अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला गारपिठीसह अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांना अवाकाळी पावसाचा मोठा फटका बसला. हवामान खात्याने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानूसार आज अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर आणि तेल्हारासोबत बार्शी-टाकळी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. एकीकडे वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहिसा दिलासा मिळाला आहे.
🔴आज दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेगाव शहरात मुख्य रस्त्यावर आणि रेल्वे स्टेशन परिसरात अनेक झाडे उन्मळून पडल्याने त्यात ३ वाहनांचे नुकसान झाले तर तिघे जण जखमी झाले. तसेच जिल्ह्यातील खामगाव संग्रामपूर परिसरातसुद्धा अवकाळी पाऊस पडत आहे. आता बुलडाण्यात देखीलपावसाला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये माळीवाडा शिवारात आंब्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या एका शेतमजुराचा अंगावर वीज पडून मृत्यू झालाय. तर इतर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
🟥रावसाहेब खंडू निळ असं या शेतमजुराचे नाव असून शेतात कांद्याच्या पिकाची काढणी सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली आणि हे तिघेही जण आंब्याच्या झाडाखाली जाऊन उभे राहिले. अशाच वीज पडून एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. दरम्यान याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. मागच्या चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाला मोठा फटका बसला. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीतील 500 केशर आंब्यांची झाडे जमीनदोस्त झाली. ऐन काढणीला आलेला आंबा मातीमोल झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी जोराचा पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांचे ताबडतोब पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.