🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे मराठी भाषा दिन व शालेय नाटयछटा स्पर्धा संपन्न.
🛑भादवण हायस्कूलमध्ये शुभेच्छा, सत्कार समारंभ संपन्न.
🛑श्रीपती देसाई उर्फ आबाजी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन.
आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे मराठी भाषा दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ अशोक वाचुळकर यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मराठी भाषा दिनानिमित्त के शुभांगी गजानन वायंगणकर यांच्या स्मरणार्थ शालेय नाट्यछटा स्पर्धा व ग्रंथालयातील नविन पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. ग्रंथालयाच्या संचालिका डॉ. अंजनी देशपांडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शालेय नाट्यछटा स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक कु. अंतरा कृष्णा पाटील – विद्यामंदिर होणेवाडी हिने मिळवीला व्दितीय क्रमांक कु. जान्हवी विश्वास कांबळे – विद्यामंदिर वाटंगी तर तृतीय क्रमांक कु. अन्वी राहुल नेवरेकर रोझरी हायस्कुल आजरा यांना मिळाला. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु. आर्या संदिप वाटवे आजरा हायस्कूल हिने मिळवीला. व्दितीय क्रमांक कु. ओवी विशाल रेळेकर रोझरी हायस्कूल आजरा तर तृतीय क्रमांक कु. वेदिका विजय पोतदार आजरा हायस्कुल आजरा यांना मिळाला. विजेत्या स्पर्धकांना डॉ. अंजनी देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. आजरा तालुक्यातील विविध शाळातील ४५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री अनिल कांबळे व सौ. वृषाली वाळके यांनी काम पाहिले. यावेळी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सौ. गीता पोतदार, संचालक बंडोपंत चव्हाण, रविंद्र हुक्केरी, विजय राजोपाध्ये, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विद्या हरेर, प्रभाकर नेवरेकर, राजश्री पाटील, श्रध्दा वाटवे, सुनील कांबळे, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, महादेव पाटील, निखिल कळेकर, शिवाजी नाईक, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उपस्थीत होते.


भादवण हायस्कूलमध्ये शुभेच्छा, सत्कार समारंभ संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील भादवण हायस्कूल भादवण येथे एस एस सी मार्च २०२४ परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. या शुभेच्छा समारंभाचे औचित्य साधून शाळेची माजी विद्यार्थिनी दिव्या दयानंद जांभळे हिची पाटबंधारे व बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन सहाय्यक अभियंता वर्ग २ पदी स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या शुभेच्छा समारंभ प्रसंगी तिने विद्यार्थ्यांना “परीक्षेला सामोरे जाताना” या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले. ‘अपयशाने खचून न जाता परिश्रम आणि प्रयत्न अखंड चालू ठेवा व यश नक्कीच संपादन होईल’ असा अनमोल संदेश दिला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजयकुमार पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वर्गशिक्षिका सुजाता पाटील, आर पी होरटे यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेसाठी या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य भेटवस्तुरूपात दिले. तसेच शाळेच्या नावाचा डिजिटल बोर्ड विद्यार्थ्यांनी भेट रुपात प्रदान केला. रुणाली पाटील, श्रेयस खोराटे आर्यन जाधव प्रज्वल केसरकर, पृथ्वीराज देसाई, प्रतीक्षा हारेकर, कस्तुरी तुरुंबेकर, शेजल खवरे, भक्ती मुळीक, वैष्णवी पाटील या विद्यार्थ्यांनी भाऊक मनाने मनोगते व्यक्त केली. श्री दयानंद पाटील यांनी प्रास्ताविक केले व्ही एस कोळी यांनी आभार मानले यावेळी श्रीमती नाईक मॅडम, सौ बी पी कांबळे, सौ व्ही ए वडवळेकर शिक्षकेतर कर्मचारी एस के पवार नामदेव कांबळे व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सौ बी पी कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पेन व फुल भेटवस्तू दिली अल्पोपहार व फोटो सेशन नंतर कार्यक्रम संपन्न झाला.

श्रीपती देसाई उर्फ आबाजी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन.
आजरा.- प्रतिनिधी.

पेरणोली ता. आजरा येथील श्रीपती बचाराम देसाई उर्फ आबाजी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यातील शोककळा पसरली आहे.
मागील दिवस देसाई हे आजारी होते. त्यांना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. नुकतीच त्यांची प्राणज्योत मालवली.
पेरणोलीचे माजी सरपंच, आजरा येथील जनता बँकेचे माजी चेअरमन, बळीराजा संस्था समूहाचे प्रमुख म्हणून आबाजी यांची सहकार व राजकारणात ओळख होती. तसेच स्व. राजारामबापू देसाई, व स्व. बळीरामदादा देसाई यांच्या साथीने त्यांनी सहकारात आपले वेगळे वलय निर्माण केले होते. पेरणोली येथे अनेक सहकारी संस्था उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता. त्याच्या पश्चात, २ मुले, २ मुली, जावई, सूना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
