HomeUncategorizedपंतप्रधानांच्या दौऱ्यात लटकला पुणे मेट्रो!- विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा.. लांबणीवर 🛑राज्यातील...

पंतप्रधानांच्या दौऱ्यात लटकला पुणे मेट्रो!- विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा.. लांबणीवर 🛑राज्यातील दुष्काळाची व्याप्ती वाढली.- दुष्काळग्रस्त भागात आणखी २२४ महसूल मंडळांचा समावेश.

🛑 पंतप्रधानांच्या दौऱ्यात लटकला पुणे मेट्रो!- विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर
🛑राज्यातील दुष्काळाची व्याप्ती वाढली.- दुष्काळग्रस्त भागात आणखी २२४ महसूल मंडळांचा समावेश.

पुणे – प्रतिनिधी.

पुणे मेट्रोचे रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मोदींचा दौरा लांबणीवर पडला असल्याने उद्घाटनाचा मुहूर्तही पुढे ढकलावा लागला आहे. त्यामुळे रामवाडीपर्यंत मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
🟥मेट्रोची विस्तारित सेवा गेल्या वर्षी १ ऑगस्टला सुरू झाली. वनाज ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी या मार्गावर वनाज ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. नंतर हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला. आता वनाज ते रुबी हॉल मार्ग आता रामवाडीपर्यंत विस्तारण्यात आला आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याची अंतिम तपासणीही केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गाच्या उद्घाटनाची औपचारिकता केवळ शिल्लक आहे. या विस्तारित मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आखण्यात आले होते.
🟪सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी १९ फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या हस्ते अनेक विकासकामांची पायाभरणी या दौऱ्यात होईल. यानंतर मोदी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे मोदींचा पुणे दौरा लांबणीवर पडला असून, मेट्रोच्या उद्घाटनाची मुहूर्तही हुकणार आहे.

🔴अद्याप हिरवा कंदील नाही

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी १९ ते २१ जानेवारी या कालावधीत केली. या तपासणीदरम्यान त्यांनी या मार्गातील काही त्रुटी उपस्थित केल्या. या त्रुटी दूर करून महामेट्रोने त्याचा अहवाल आयुक्तांना पाठविला. त्यानंतर या मार्गाला अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग खुला झाला. मात्र, अद्याप आयुक्तांनी या मार्गाला हिरवा कंदील दिलेला नाही, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.

🟪रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग.
अंतर – ५.५ किलोमीटर
स्थानके – बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी

🛑राज्यातील दुष्काळाची व्याप्ती वाढली.- दुष्काळग्रस्त भागात आणखी २२४ महसूल मंडळांचा समावेश

मुंबई:- प्रतिनिधी.

राज्यातील दुष्काळाची व्याप्ती हळूहळू वाढू लागली आहे. राज्य सरकारने आणखी 224 महसूल मंडळांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश केला आहे. गेल्या वर्षी या भागात पावसाचं प्रमाण सरासरीच्या 75 टक्के पेक्षा कमी असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. अशारितीने राज्यातील 2292 महसूल मंडळापैकी 1532 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
🔴राज्यातील 2292 महसूल मंडळांपैकी 2068 मध्ये परिसरातील पाऊस मोजण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 356 पैकी 40 तहसीलमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. ज्यामध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 287 महसूल मंडळांचा समावेश आहे. त्यानंतर सर्वपक्षीय आमदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये 1021 अतिरिक्त महसूल मंडळांचा समावेश करून दुष्काळग्रस्त भागांचा विस्तार केला. आता 16 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने आणखी 224 महसूल मंडळांचा दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत समावेश केला आहे.
🟪स्वयंचलित हवामान केंद्र नसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यामुळे पूर्वीच्या महसूल मंडळांच्या विभाजनानंतर निर्माण झालेल्या आणि कमी पाऊस पडलेल्या दुष्काळग्रस्त भागात 224 महसूल मंडळांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सर्व 224 दुष्काळग्रस्त भागांना शेतकऱ्यांना वीज बिलात 33.5 टक्के सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसुलीला स्थगिती इत्यादी फायदे मिळतील. दुष्काळी महसुली मंडळांची संख्या आता 1532 झाली आहे. 224 महसूल मंडळे विविध 19 जिल्ह्यांतील असून त्यापैकी 17 जिल्हे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दोन जिल्हे विदर्भातील आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.