१३ नक्षलवादी ठार,
⭕ जंगलात पोलिसांची कारवाई;
⭕ मोठा शस्त्रसाठा जप्त……….
गडचिरोली : प्रतिनिधी. २२
नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोलीच्या जंगलात मोठी कारवाई करण्यात आली.
उपविभाग एटापल्ली येथील कोटमी हद्दीत सकाळी पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.
मृतांमध्ये विभागीय समिती सदस्य आणि जहाल नक्षलवादी सतीश याच्यासह सहा पुरुष व सात महिलांचा समावेश आहे.
घटनास्थळाहून एके ४७ बंदुकीसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी एकत्र येतात.
याही वेळी पैडी जंगलात मोठ्या संख्येने कसनसूर व कंपनी क्र. चार दलमचे नक्षलवादी विभागीय समिती सदस्य सतीशच्या नेतृत्वात एकत्र येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
याच माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलीस लक्ष ठेवून होते.
तसेच पैडी जंगल परिसरात पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते.
त्याच वेळी ही चकमक झाली.
चकमकीनंतर तेरा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले.
मृत १३ नक्षलवाद्यांवर ६० लाखांचे बक्षीस होते.
त्यांची ओळख पटली आहे.
यामध्ये नक्षलवाद्यांच्या कंपनी चार दलमचा जहाल नक्षलवादी सतीश ऊर्फ अडवे देवू मोहंदा याच्यावर सोळा लाखांचे बक्षीस होते.