मराठा आंदोलनाला हिंसक वळण,- मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश.
जालना.- प्रतिनिधी.
जालन्यातील शहागड येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांनी आंदोलकांनावर लाठीमार केला आहे. तर याठिकाणी जाळपोळीची घटनाही घडली आहे.मात्र ही जाळपोळ कोणी केली, हे अद्याप स्पष्ट नाही. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळल्यानंतर पोलिस त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही लाठीमार व अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझी पर्वा फोनवर चर्चा झाली होती. जिल्हाधिकारी यांनीही घटनास्थळी जाऊन त्यांची भेट घेतली.ते म्हणाले की, मनोज यांना मी सांगितलं की उपोषण करू नका. तुमच्या मागणीवर आपले अधिकारी काम करत आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी जे उपाय करायचे आहेत, ते सरकार करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका सरकारचीही आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत
