कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरातच घरे द्या – आमदार प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत लक्षवेधीव्दारे आग्रही मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी,
सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार गतिमानतेने काम करीत आहे. यामुळेच ‘सर्वसामान्यांचे सरकार’ अशी या सरकारची ओळख झालेली आहे. यामुळेच राज्यसरकारकडून गिरणी कामगारांना देखील मोठी आशा असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरातच घरे द्या अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी प्रश्नाव्दारे केली.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राज्यसरकारकडून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. घर हे सर्वांचे स्वप्न असते. मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे पात्र गिरणी कामगारांची यादी तात्काळ निश्चित करून सर्व गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे लवकरात मिळावी अशी मागणी केली. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे आवश्यक असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे देण्याची आग्रही मागणी केली.
यावेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे म्हणाले की, गिरणी कामगारांना हक्काची घरे लवकर मिळावीत यासाठी समिती नेमण्यात आली असून गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्याच्या आणि घरे वाटप करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यामुळे नक्की किती घरे द्यायची आहेत ते समजून त्यापद्धतीने घरांची उपलब्धता निर्माण करता येईल. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्ये घरे देण्यास योग्य ती कार्यवाही करू असे अश्वासित केले.
श्री दत्त मंदीर शेणगांव मंदीराच्या विकास कामांकरीता 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर
- पहिल्या टप्यात 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त
गारगोटी प्रतिनिधी,
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत `ब` वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र असलेल्या शेणगांव (ता.भुदरगड) येथील श्री दत्त मंदिरासाठी 2 कोटी रुपये खर्चाच्या निधीस राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मंजूरी देण्यात आली असून पहिल्या टप्यात 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि याच कुशीत विहंगम वेदगंगा नदी किनारी ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री दत्त मंदिर यामुळे शेणगावची महती दिवसेंदिवस वाढत आहे. श्री दत्तभक्त संप्रदायाचे सर्व संकेत पूर्ण करणाऱ्या व अतिशय प्राचीन असणाऱ्या श्रीक्षेत्र शेणगाव येथील श्री दत्त मंदिरात दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा उत्सव शेणगावच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा आहे. श्री क्षेत्र शेणगावच्या श्री दत्त देवस्थानचा लौकिक दिवसेंदिवस वाढत असून येथील विविध विकास कामे करणे गरजेचे होते. याकरीता येथील विविध विकास कामांना निधी मिळावा याकरीता प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. याकरीता करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 13 जुन, 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्यातील कामांकरीता 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे सांगितले आहे.
या निधीमधून भक्तानिवास व पुरष शौचालय बांधकाम, कंपाऊंड वॉल, पेव्हींग ब्लॉक, पोहोच रस्ता, भक्तनिवास व शौचालय विद्युतीकरण, घनकचरा व्यवस्थापन आदी कामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांसाठी निधी मिळावा पाठपुरावा करण्यात आला असून याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
