सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवले. – एन. डी. स्टुडिओचीही होणार होती जप्ती!- तर बॉलिवूडवर शोककळा.
मुंबई :- प्रतिनिधी.
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवले आहे. त्यांच्या निधनाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचे समजते. तिथे ते मृतावस्थेत सापडले आहेत.नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर कलाक्षेत्र, राजकीय क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नितीन देसाई यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी भव्य-दिव्य सेट उभारले होते. दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं होतं. असं असताना त्यांच्यावर मृत्यूपूर्वी तब्बल २४९ कोटींचं कर्ज होतं, अशी माहिती आता समोर आली आहे.
दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृतदेह बुधवारी सकाळी एन. डी. स्टुडिओमधील त्यांच्या खोलीत आढळून आला. सफाई कर्मचारी खोलीत साफसफाईसाठी गेले असताना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने पोलीसांना या घटनेची माहिती कळवली. यानंतर कर्जत आणि खालापूर येथील पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या घटनेचे सर्व पैलू तपासून पाहत असल्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.
९० च्या दशकांमध्ये बहुचर्चित तमस या दुरदर्शनवरील आपल्या कारकिर्दिला प्रारंभ केला होता. त्यानंतर १९९४ मध्ये १९४२ लव्ह स्टोरी या चित्रपटाने त्यांनी स्वतंत्रपणे बॉलिवूडमध्ये काम करण्यास प्रारंभ केला. यानंतर बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून त्यांची अल्पावधीत ख्याती झाली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दित हम दिल दे चुके सनम, लगान, जोधा-अकबर, देवदास, प्रेम रतन धन पायो आदी चित्रपटाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता.
गेल्या काही नितीन देसाई यांचे एन. डी. स्टुडिओत वास्तव्य होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड हादरले आहे. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २००५ मध्ये त्यांनी कर्जत येथे ५२ एकरमध्ये एनडी स्टुडिओ उभारला. त्यांनी रिअॅलिटी शो बिग बॉस होस्ट केले होते.
देसाई यांचा ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. ते या आठवड्यात ५८ वर्षात पदार्पण करणार होते. पण वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांनी आपले जीवन संपवले आहे. दोन दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि इतरांसह अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले होते.केवळ चित्रपटच नाही तर ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे अनेक सीझनही त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आले होते.
कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचं पाऊल?
दरम्यान, कर्जबाजारीपणाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलणं चुकीचं असून कुणीही असा विचार करू नये, असं आवाहन सातत्याने सामाजिक, राजकीय व प्रशासकीय स्तरातून केलं जात आहे. मात्र, नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात नेमकं काय घडलं? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
एन. डी. स्टुडिओवर कारवाईचं संकट
ठराविक मुदतीसाठी घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे नितीन देसाई यांच्या कर्जत चौक येथील एन. डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचे संकट ओढावले होते. कलिना येथील एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने एन. डी. स्टुडिओ जप्तीसाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही केला होता. पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्तीच्या कारवाईला अंतिम मंजूरी दिली गेली नव्हती. रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी एन. डी. स्टुडिओच्या जप्तीसंदर्भात अर्ज कार्यालयाकडे आला असल्याचे सांगितले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?

नितीन देसाई यांनी काही कारणास्तव सीएफएम या वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१६ आणि २०१८ अशा दोन वर्षांत या कर्जाचा करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी तीन वेगवेगळ्या अशा चाळीस एकरच्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला १८० कोटींवर असणारी कर्जाची रक्कम व्याजासह २४९ कोटींच्या आसपास पोहोचली. त्यामुळे देसाई हे आर्थिक विवंचनेत होते. खालापूरचे आमदार महेश बालदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भातील चर्चाही केली होती.
