कोरोना आपत्ती. – कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकलं. दैनंदिन रुग्णसंख्या व मृतांच्या यादीत गाठला उच्चांक
नवी दिल्ली. वृतसंस्था ११
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते. दुसरी दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी मागील पंधरा दिवसातील सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 26 एप्रिलला 3.19 लाख रुग्ण आढळले होते. दरम्यान, सोमवारी 3,877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, कर्नाटकमध्ये सोमवारी सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच कर्नाटकने दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृतांच्या यादीत महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं असून नकोसं पहिलं स्थान मिळवलं आहे. भारतात फेब्रुवारीच्या मध्यात करोनाची दुसरी लाट आल्यापासून पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. कर्नाटकमध्ये सोमवारी २४ तासांत ३९ हजार ३०५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एकूण ५९६ जणांचा मृत्यू झाला. एकीकडे देशातील एकूण रुग्णसंख्या दोन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच साडे तीन लाखांपेक्षा कमी झाल्याची नोंद होत असताना कर्नाटकमध्ये मात्र चिंता वाढवणारी संख्या समोर आली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात सोमवारी ३७ हजार २३६ रुग्णांची तर ५४९ मृत्यूंची नोंद झाली.