साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी
( शिंदे गटाचे रामदास कदम यांच्या भावाला न्यायालयाने सुनावली ५ दिवसांची ईडी’ कोठडी )
मुंबई :- प्रतिनिधी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू उद्योजक सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ‘ईडी’ने केलेल्या युक्तीवादानंतर कदमांना १५ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे.
दापोलीतील साई रिसोर्टप्रकरणी सदानंद कदमांना ईडीकडून काल अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आज कदम यांना न्यायालयात हजर करण्यात आले. कदमांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्याची मागणी ‘ईडी’ने केली होती. ‘ईडी’चा युक्तीवाद कोर्टाकडून मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार सदानंद कदम यांना चौकशीसाठी १५ मार्चपर्यंत ‘ईडी’ची कोठडी सुनावण्यात आली आहे
सदानंद कदमांना ‘ईडी’ने सुमारे चार तास चौकशी केल्यानंतर काल शुक्रवारी (दि. १०) अटक केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी-विक्री प्रकरण राज्यात अनेक दिवसांपासून गाजत आहे. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. ‘ईडी’ने त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परबांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजता कुडोशी येथे अनिकेत फार्म हाऊस या सदानंद कदम यांच्या निवासस्थानी ‘ईडी’चे पथक आले होते. सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन हे पथक मुंबईच्या दिशेने गेले होते. उद्धव ठाकरे यांची खेडमधील सभा यशस्वी करण्यासाठी सदानंद कदम यांचा पुढाकार होता, म्हणूनच सुडबुद्धीने ही कारवाई झाली असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.आता सदानंद कदमांना अटक झाल्यामुळे अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदानंद कदम यांच्यावर झालेली ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
