५० खोक्यांचा खोकासूर,धोकासूर आहे.- पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा. – शिवसेनेचा दसरा मेळावा.
मुंबई :- प्रतिनिधी.
उद्धव ठाकरेंनी भावूक होत दसरा मेळाव्याच्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर घणाघात केला . उद्धव ठाकरे म्हणाले, “आजचा दसरा मेळावा अभूतपूर्व, मी भारावून गेलोय. अनेक वर्षांचा दसरा मेळावा लक्षात आहे, पण हा दसरा मेळावा पहिल्यांदाच. अभूतपूर्व. मी भारावून गेलोय. भाषणासाठी अनेक मुद्दे. पण किती बोलू शकेन माहित नाही. तुमचं हे प्रेम पाहून शब्द सुचत नाही. हे विकत नाही. मिळत. हे ओरबाडून नाही घेता येत. ही कोरडी गर्दी नाही. ही अंत:करण असलेल्या माझ्या शिवसैनिकांची गर्दी आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करत उद्धव ठाकरे म्हणाले, ” दरवर्षी प्रमाणे मेळाव्यानंतर रावणदहन होणार आहे. यावेळी रावण वेगळा आहे. आतापर्यंत रावण दहा तोंडाचा होता. आता किती झाला? 50 खोक्यांचा खोकासूर आहे, धोकासूर आहे. वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि संतापसुद्धा होतो. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो तेव्हा बोटंसुद्धा हालत नव्हती, तेव्हा ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा हो जे कट करणारे आप्पा ते कटाप्पा. पण त्यांना कोणाला कल्पना नाही. हा फक्त उद्धव ठाकरे नाही, हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, हा तेजाचा शाप आहे. ज्यांना आपण सगळ्यांनी सगळं काही दिलं. मंत्रिपदं दिली. आमदारकी, खासदारकी दिली. ज्यांना दिलं ते नाराज होऊन गेले. पण ज्यांना काहीच दिलं नाही ते निष्ठेने माझ्यासोबत आहेत. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत शिवसेना आहे. जोपर्यंत तुम्ही सांगाल तोपर्यंत मी शिवसेनाप्रमुख आहे. पण हे तुमच्यापैकी कोणीतरी सांगितलं पाहिजे. गद्दारांनी नाही.”
ठाकरे म्हणाले, “बाप मंत्री, कारटं खासदार. नातू नगरसेवक. कोणाचा आमदार. सगळं काही एकच. माझ्याचकडे पाहिजे. का मी झालो मुख्यमंत्री? का केली आघाडी. ही काही लपवण्याची गोष्ट नाही. भाजपाने पाठीत वार केला म्हणून महाविकास आघाडी केली. तुम्ही साक्ष आहात. जर मी हिंदुत्त्व सोडलं असेल तर तुम्ही मला सांगा खरंच मी हिंदुत्त्व सोडलंय. ”
ठाकरे म्हणाले “तेव्हा बोलताना स्वतःची दाढी स्वतःच्या तोंडात जात होती. तेव्हा माहित नव्हतं का राष्ट्रवादी काँग्रेसवाले मांडीला मांडी लावून बसले आहेत. भाजपाने अडीच-अडीच वर्षांची ठरवलं होतं, हे मी आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायांची शपथ घेऊन सांगतोय.अडीच वर्ष तुमची, अडीच वर्ष शिवसेनेची. म्हणे संभवही नही. आता जे केलंत ते तुम्ही तेव्हा का नाही केलं, सन्मानाने का नाही केलं. आता जे केलं ते तेव्हा का नाही. पण शिवसेना संपवायची. तेवढ्यावरच नाही थांबले. इतरांना बाजूला सारून मंत्रिपदं दिली. आता मुख्यमंत्री झाला. आता याला शिवसेना प्रमुख व्हायचं.
ठाकरे म्हणाले ” बाप चोरणारी औलाद. बापाचा तरी विचार करायचा. त्यांना काय वाटलं असेल. आनंद दिघे. 20 वर्षे होऊन गेली एकनिष्ठ शिवसैनिकाला जाऊन. पण आज त्यांना आठवण येतेय. आनंद दिघे एकनिष्ठ होते. ते जातानासुद्धा भगव्यातून गेले. भगवा नाही सोडला नाही.”
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ” देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना बोलून गेले मी पुन्हा येईन. ते पुन्हा आले. पण दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं. पण पुन्हा उपमुख्यमंत्री पदी आले. मी टोमणा मारला? कायदा पाळायचा तर तो सर्वांनी पाळायचा. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाडायची. कोणी गणपतीच्या मिरवणुकीत गोळीबार करतोय, कोणी हातपाय तोडायची भाषा करतोय. हाच कायदा पाळायचा असेल तर आम्ही नाही कायदा पाळणार.नवी मुंबईचे मढवी, प्रेस कॉन्स्फरस घेतली. त्यांना पोलिसांच्या धमक्या येत आहेत, की या गटात ये नाहीतर जीव घेऊ. रायगडच्या नेत्यांना धमक्या आल्या. हॉटेल फोडण्याच्या धमक्या. हा तुमचा कायदा. तडीपार करत आहेत. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीतही धमक्या. त्या गटात जा नाहीतर केसेस बाहेर काढू. सलून काढलंय का तुम्ही. मी शांत राहा सांगतोय म्हणून हे शांत आहेत. जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत राहु द्या. त्यांना पिसाळायला लावू नका. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवळायला बसवा. आज तिकडे जे काही चाललंय, इकडे जिवंत मेळावा आहे. ग्लिसरीनच्या बाटल्या गेल्यात तिकडे. शिवसेना कशी चालवायची.”
ते म्हणाले, ” हिंदुत्त्व कसं पुढे न्यायचे हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही. भाजपाकडून हिंदुत्त्वकाडून शिकायची गरजच नाही. भाजपाची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदुत्त्व सोडलेलं नाही. आजसुद्धा हिंदू आणि उद्यासुद्धा राहू. भाजपाने आमच्यावर शिंतोडे उडवायचे. पाकिस्तानच्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता केक खाणारा तुमचा नेता. तुम्ही आम्हाला हिंदुत्त्व शिकवता. मुफ्तीसोबत साटंलोटं करणार आणि आम्हाला हिंदुत्त्व शिकवणार.”
👉ठाकरे म्हणाले ”हिंदुत्त्व खणखणीत असलं पाहिजे. हिंदुत्त्वावर मी बोलणारच आहे. हिंदुत्त्वावर बोलताना गाईवरच का बोलताय? महागाईवरही बोला. अमुक महागले , तमुक महागलं. जय श्रीराम. हृदयात राम आणि हाताला काम पाहिजे.”
