आजऱ्यात ९ ऑगस्टला होणार कवी संमेलन. –
कवयित्री शरयू आसोलकर अध्यक्ष तर – कवी-कादंबरीकार प्रवीण बांदेकर उदघाटक
आजरा – प्रतिनिधी.

आजरा येथे नुकत्याच स्थापन झालेल्या प्रागतिक जनवादी साहित्य मंचचे उदघाटन क्रांतीदिनाचे औचित साधून आजरा, गडहिंग्लज, चंदगड परिसरातील कवींचे कविसंमेलन गंगामाई वाचनालय आजरा येथे दु. १२.०० वाजता आयोजित केले आहे. सुप्रसिध्द कवी, कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते या मंचचे उदघाटन होणार असून सुप्रसिध्द कवयित्री डॉ शरयू आसोलकर या कवी संमेलनाच्या अध्यक्ष राहणार आहेत. या कार्यक्रमाला आजरा येथील जेष्ठ साहित्यीक राजाभाऊ शिरगुप्पे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रा बांदेकर हे मराठीतील नामवंत कवी आणि कादंबरीकार आहेत. चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन अनिमल फार्म या त्यांच्या कादंबऱ्या बरोबर येरु म्हणे, खेळ खंडोबाच्या नावानं, चिनभिन हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. घुंगुरकाठी, हरवलेल्या पावसापाण्याच्या शोधात हे त्यांचे ललीतलेख संग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र फौंडेशन, पद्मश्री वि खे पाटील पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार यासह डझनाहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. डॉ शरयू आसोलकर तुटलेपण पुन्हा बांधून घेतांना, अनवट वाटा, पुढल्या हाका हे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विध्यापिठ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांचा विशाखा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करतात. या परिसरातील लिहत्या हातांना बळ मिळावे, महाराष्ट्रातील उत्तमोत्तम साहित्यिकांचे इथल्या नव्याने लिहणाऱ्यां लेखक कवींना मार्गदर्शन मिळावे हा या साहित्य मंचच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. मंगळवार दि ९ ऑगस्ट क्रांतिदिनी गंगामाई वाचनालय आजरा येथे दुपारी ठीक १२. वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात ज्यांना आपली कविता सादर करायची आहे त्यांनी आपली नावे प्रा सुभाष कोरे (9923088463), संजय साबळे (9356443875) आणि अनुष्का गोवेकर (7588620526) यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन संपत देसाई, संतोष पाटील, मधुकर जांभळे, संजय घाटगे, युवराज जाधव, सुनीता खाडे यांनी केले आहे.
