बोरिवलीच्या चिकुवाडीत. – खा.गोपाळ शेट्टी यांच्या खासदार निधीतून स्व.बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदान व क्रीडांगण उभारणर…
मुंबई(शांताराम गुडेकर )
पश्चिम उपनगरातील बोरिवली पश्चिम येथील शिंपोली, चिकुवाडीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य “स्व.बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदान व क्रीडांगण” उभे राहत आहेत. हे नामकरण येत्या ८ दिवसात करण्यात येणार आहे. हे मनोरंजन मैदान आणि क्रीडांगण उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी हे त्यांच्या खासदार निधीतून होत आहे. कांदिवली पूर्व येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ठाकरे सरकारने परवानगी न दिल्यामुळे अटलजींचा पुतळा गेल्या दीड वर्षांपासून उभारता आलेला नाही. ही खूप मोठी सल खा.शेट्टी यांच्या मनात असताना ते स्व. बाळासाहेबांच्या नावाने भव्य मनोरंजन मैदान व क्रीडांगण उभारत आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.खा.शेट्टी हे नगरसेवक ते खासदार म्हणून या विभागात गेली ३०-३५ वर्षे कार्यरत आहेत. बोरिवली विभागात त्यांनी अनेक उद्याने, क्रीडांगणे उभारली आहेत.त्यांना थोर पुरुषांची नावे देण्यात आली आहेत.या मालिकेत त्यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्थान दिले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे उदघाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. चिकुवाडीत १५ एकर भूखंडावर होणाऱ्या या मनोरंजन मैदान व क्रीडांगणावर भव्य आकर्षक प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू आहे. जॉगिंग ट्रॅक बांधून पूर्ण झाला आहे. तसेच मैदानाला संरक्षण भिंत ही बांधून झाली आहे. विविध खेळासाठी मैदाने, तसेच या मनोरंजन मैदान व क्रीडांगणात लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळाची साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक परगोला, स्वच्छता गृह , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वृक्षारोपण कार्यक्रम, तसेच आकर्षक दिव्यांची सोय ही केली जाणार आहे.हा प्रकल्प दिवाळीपर्यंत पूर्ण होणार असून या मनोरंजन मैदान व क्रीडांगणाला स्व.बाळासाहेबांचे नाव असल्याने ते उभारणीसाठी खूप कमी खर्च केला जाणार आहे. कमी म्हणजे मुंबई महानगर पालिका जिथे ५ कोटी रुपये खर्च करते तिथे मी फक्त १ कोटीच्या खर्चात हा प्रकल्प पूर्ण करणार आहे.असे खा.गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.