सांगली हादरलं!
एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या,- विष घेत आयुष्य संपवलं.- मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे.
यात दोन कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं
सांगली. प्रतिनिधी.20 जून :-
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे.या सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे. संपूर्ण सांगली या घटनेने हादरली आहे.आत्महत्या केलेल्या कुटुंब हे एका पशुवैद्यकीय डॉक्टरचं होतं. या डॉक्टरशी बराचवेळ फोनवरुन संपर्क केला जात होता. मात्र संपर्क होऊ न शकल्यानं संशय व्यक्त करण्यात आला. तसंच सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजाही उघडण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोनवरुन सातत्यानं संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. मात्र कुणीच फोन उचलला नाही.
ग्रामस्थांनी पाहणी केल्यानंतर प्रकार समोर
अखेर ग्रामस्थांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतर धक्कादायक चित्र समोर दिसलं. डॉक्टरांच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. विष घेऊन या सगळ्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मिरज ग्रामीण पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा आता कसून तपास केला जातो.
आत्महत्या का केली?
आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या घटनेनं संपूर्ण म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरुन गेलाय. पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जातेय. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
कुणी केली आत्महत्या?
आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाचं नाव वनमोरे असून दोन भावांनी आपलं अख्खं कुटुंब संपवलंय. या आत्महत्येनं खळबळ माजलीय. माणिक वनमोरे आणि पोपर वनमोरे असं आत्महत्या केलेल्या दोघा भावांची नावं आहे. ज्यांचे मृतदेह आढळून आलेत, त्यात या दोघा भावांसह आई, पत्नी आणि मुलांचा समावेशही आहे.
कुठे आहे म्हैसाळ?
म्हैसाळ गाव हे सांगली जिल्ह्यातील मिरज गावात आहे. मिरज तालुक्यापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. आत्महत्या केलेले दोघेही सख्खे भाऊ आहे. म्हैसाळ गावातील अंबिकानगरमध्ये ही घटना उघडकीस आल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे , मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे राजधानी हॉटेलजवळ तर दुसरीकडे घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीत पोपट वनमोरे , मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांचे मृतदेह आढळून आले आहेत.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी फौजफाटा घेऊन भेट देत पंचनामा केला आहे.

