पालघर मध्ये एसटी बस 25 फूट खोल दरीत कोसळली पालघरमध्ये भीषण अपघात. – 20 जण गंभीर जखमी
पालघर :- प्रतिनिधी.
पालघर येथील वाघोबा खिंडीत एस टी महामंडळाच्या रातराणी बसचा भीषण अपघात झाला.भुसावळ ते बोईसर या एसटी बसचा पालघर खिंडीत अपघात होऊन ही एसटी बस थेट दरीत कोसळली. बस चालकचे नियंत्रण सुटल्याने बस 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील 15 ते 20 जण गंभीर जखमी झालेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. बस चालक दारु पिऊन बस चालवत असल्याचा आरोपा काही प्रवाशांनी केलाय. दरम्यान, सध्या अपघातातील जखमींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रातराणी बस सेवेअंतर्गत एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा चालवली जाते. दरम्यान, भुसावळ-बोईसर या मार्गावरील एसटी बसचा सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातानंतर एसटी बसमधील प्रवाशांना चालकावर गंभीर आरोप केले आहेत.
नाशिक मध्ये बदललेला चालक.
भुसावळ-बोईसर मार्गावर वाघोबा खिंडीत एसटी बस आली असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एसटी थेट 20 ते 25 फूट खोल दरीमध्ये कोसळली. दरम्यान, त्याआधी नाशकात या बसचा चालक बदलण्यात आला होता. बदलण्यात आलेल्या चालकानं दारुचं सेवन केलं असल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. याबाबत कंडक्टरकडे तक्रारही करण्यात आली होती. मात्र मद्यधुंद चालकाबाबतच्या तक्रारींकडे कंडक्टरने दुर्लक्ष केलं असल्याचं प्रवाशांचं म्हणणंय.नशेत असलेल्या बस ड्रायव्हरने वेगाने गाडी चालवली होती. भयंकर पद्धतीनं बस चालवत असलेल्या या चालकाचं अखेर वाघोबा खिंडीत नियंत्रण सुटलं आणि त्यामुळेच हा अपघात घडला, असा आरोप जखमी प्रवाशांनी केलाय.
