भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल
मुंबई – प्रतिनिधी.
सद्या पोलिसांच्या ताब्यात असलेले आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांवर काल रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला होता. खार पोलीस ठाण्यात गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकले होते. तसेच चप्पल आणि बाटल्याही भिरकावल्या होत्या. दरम्यान, यावेळी सोमय्यांच्या ड्रायव्हरने घाईगडबडीत तिथून गाडी काढली होती. मात्र आता सोमय्यांच्या ड्रायव्हरवर शिवसैनिकांवर गाडी घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २७९ आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.