एसटी संपाबाबत मोठी बातमी!
२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा.- हायकोर्टाचा आदेश
मुंबई हायकोर्टाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे.
मुंबई .- प्रतिनिधी. ०७
ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा अखेर सुटला आहे. मुंबई हायकोर्टाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे. तसंच सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा अशी कृती करणार नाही असा इशारा देऊन सेवेत सामावून घ्यावे असे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
ज्या कर्मचाऱ्यांवर संपादम्यान गुन्हे दाखल झाले ते मागे घेणार नाही, अशी भूमिका यावेळी महामंडळाने मांडली. मात्र ते मागे घेण्याबाबत आम्ही आदेश देऊ असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. आम्हाला या संपामुळे एकही मृत्यू झालेला नको आहे. सिंह आणि कोकरूच्या वादात आम्हाला कोकरूला वाचवावे लागेल असं कोर्टाने यावेळी सांगितलं.
याआधी बुधवारी झालेल्या सुनावणीत सध्याच्या कसोटीच्या काळात आपले उपजीविकेचे साधन गमावू नका आणि जनतेला त्रास होऊ देऊ नका, असे आवाहन करत कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना केली होती. संपकऱ्यांना एक संधी देऊन त्यांच्यावरील कारवाईच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबरोबरच त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या, अशी सूचनाही कोर्टाने महामंडळाला केली होती.
कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या काळात प्रत्येकाला काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागले आहे. संपकरी कर्मचारीही सारासार विवेकबुद्धीला पटणार नाही असे वागले. परंतु अशा कर्मचाऱ्यांना एकदा संधी द्यायला हवी. त्यामुळे त्यांना परत घेण्याचा विचार करा. त्यांच्या उपजीविकेचे साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, असं कोर्टाने म्हटलं होतं.